त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥
आज अनेक दिवसांनी गीतेमधील पहील्या ओळींची आठवण झाली. कारण काय म्हणून कोणी विचारेल असे वाटत नाही! आता लोकशाहीतले सत्तासंपादनाचे युद्ध केवळ कुरूक्षेत्रापुरतेच मर्यादीत राहीलेले नाही अथवा सर्व देशच कुरूक्षेत्र झाला आहे, असे कसेही म्हणता येईल. मात्र आपण राजकारण, राजकीय व्यक्ती-पक्ष, समाजाची अवस्था, अमुक-तमुक... या सर्वाचा कितीही उपहास करत असलो तरी भारतीय निवडणुक प्रक्रीया ही एक भारतीय म्हणून अभिमानास्पद वाटावी अशी गोष्ट आहे.
युरोपची लोकसंख्या ७३९.२ मिलीयन्स इतकी आहे तर भारतातील नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ८१४ मिलीयन्स इतकी आहे. साधारण साठ टक्के जरी मतदान होईल असे गृहीत धरले तर त्याची तुलना ही अमेरीका आणि पश्चिम युरोप ह्या दोन लोकशाही भूभागांमधील सर्व जनतेने मतदानासाठी जाण्याशी करता येईल. या (भारतीय) मतदारांमध्ये आणि भूभागामध्ये जे काही वैविध्य आहे त्यामुळे रस्ते, रेल्वे, विमान, जेथे विमाने जाऊ शकत नाहीत तेथे हेलिकॉप्टर्स, आणि जेथे गाड्या जाऊ शकत नाहीत तेथे बैलगाड्या, उंट आणि हत्ती यांच्या मदतीने सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो.
हे झाले मतदानाचे... ज्यांनी कोणी मतमोजणीची प्रक्रीया जवळून अथवा माध्यमांद्वारे पाहीली असेल त्यांना कल्पना असेल की पुर्वीच्या काळात म्हणजे २००० च्या आधी... मतमोजणीसाठी वेळ खूप लागायचा, भरपूर सरकारी कर्मचारी त्यासाठी बसत आणि त्याव्यतिरीक्त प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी बसत. आता देखील प्रतिनिधी बसत असतीलच पण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स मुळे वेळ लागणे हा प्रकार मला वाटते एक चथुर्तांश झाला असेल. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे निव्वळ स्टॅटीस्टीकली नाही तर प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही.
१९८५ च्या निवडणुका - त्या वेळेस दूरदर्शन देखील किंचित मोकळे होऊ लागले होते. पत्रकार नलीनी सिंग यांनी निवडणुकांनंतर तयार केलेला एक वृत्तपट पाहीला होता. त्यातील केवळ एक घटना: बिहार मधला एक माणूस पाठमोरा बसलेला. नलीनी सिंग त्याला (असे काहीसे) प्रश्न विचारतात, "आप क्या कर रहे है?" त्याचे उत्तरः "हम बम बना रहे है!". मग पुढे, कशासाठी? उत्तर, निवडणुकीत वापरण्यासाठी. कारण काय? आमच्या जातीसाठी वगैरे... निवडणुक प्रक्रीयेचेच अपहरण करणे (रिगिंग) भरपूर चालत असे. तरी देखील स्टॅटीस्टीकली बर्यापैकी लोकशाहीनेच देशाचे सरकार निवडून आले म्हणायला जागा होती. शेषन आणि त्यांच्या नंतर आलेल्या निवडणूक आयुक्तांनी मात्र बर्याच गोष्टी चांगल्यासाठी कायमच्या बदलल्या. निवडणू़क आचारसंहीता, सुरक्षा, पक्षाला मिळणार्या मतांवरून पक्षाचे पुढील भवितव्य ठरवणे आदी अनेक लहान-मोठ्या गोष्टी त्यात येतील.
थोडक्यात राजकारण आणि राजकीय पक्ष-व्यक्तींबद्दल जरू भरपूर बोलता येत असेल तरी ज्या एका प्रमुख गोष्टीवर लोकशाही टिकू शकते त्या लोकांना हक्क देणार्या, मतदाराला राजा म्हणणार्या या निवडणूक प्रक्रीयेने मात्र एक पावित्र्य पाळलेले आहे. आता परत एकदा कर्तव्यपूर्तीची वेळ आली आहे ती या मतदार राजाची! इतर माध्यमांप्रमाणेच मिसळपाव.कॉम वर पण आपण माहितीपूर्ण चर्चा करूयात. त्यासाठी राजकारण हे एक विशेष दालन चालू केलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणेतरी आपल्यातले कोणीच प्रत्यक्ष निवडणूका लढवणार नाही. तेंव्हा व्यक्तीगत चिखलफेकी ऐवजी निवडणूकांच्या निमित्ताने आणि त्या संदर्भाने - राजकीय, सामाजीक, धोरणात्मक, आर्थिक आदी विविध विषयांवर चर्चा करूयात अशी विनंती...
आता हे नमन थांबवताना आपल्याकडून एक नारळ फोडावा म्हणून खालील (जालावर येथून माहीती घेऊन मीच तयार केलेला) नकाशा टाकत आहे. माहिती एकदम अद्ययावत नाही तरीदेखील त्यातून आपले खासदार काय दिवे लावत आहेत याची झलक दिसेल अशी आशा आहे.