माझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप

याआधीच्या दोन भागांत आपण मावळते पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (भाग १), भाजपा/एन्डीएचे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र मोदी व काँग्रेस उपाध्यक्ष व त्या पक्षाचे संभाव्य उमेदवार श्री राहुल गांधी (भाग २) यांच्यावरील माझ्या आक्षेपांचे विवेचन वाचले. या शेवटच्या भागात पंतप्रधानपदाच्या उर्वरित इच्छुक व काही प्रमाणात संभाव्यता असणार्‍या पक्षनेत्यांवरील माझे आक्षेप विशद करणार आहे. अर्थात लेखात व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत.

भाजपा व काँग्रेस या पक्षांव्यतिरिक्त समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत. पैकी यावेळी डाव्यांची ताकद केरळ व बंगाल दोन्हीकडे रोडावल्याने त्यांच्या नेत्याला पंतप्रधानपद मिळणे कठीण वाटते. शिवाय डाव्यांची कोणतीच आर्थिक नीती मला रुचत नाही. शिवाय डाव्या विचारसरणीच्या मर्यादा व फायदे हे इतिहासात अनेकदा स्पष्ट झाले आहेत त्यामुळे डाव्या पक्षांपैकी कोणीही पंतप्रधान झालेले मला आवडणार नाही. त्यांचे भारतीय राजकारणात एक विवक्षित स्थान आहे हे नाकारण्यात अर्थ नाही पण तरीही देशाचे सर्वोच्च पद एका डाव्या पक्षातील नेत्याने भूषवण्याकडे जाणारा रस्ता बराच मागे पडला आहे असे वाटते.
उर्वरितांपैकी, श्री शरद पवार यांची राजकीय ताकद खूप असली तरी १०-१२ च्यावर शीटा मिळतील का नाही हेच समजत नसल्याने त्यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणून आक्षेप मांडायची गरज वाटत नाही. श्रीमती ममता बॅनर्जी यांचे डाव्यांपेक्षाही डाव्या असणे त्यांना बंगालात आवश्यक असेलही देशाचा पंतप्रधान म्हणून अगदीच अडसर ठरते.या व्यतिरिक्त जयललिता, बिजु पटनायक, नितीश कुमार/शरद यादव वगैरे मंडळीही आहेत पण इतक्या लोकल नेत्यांनी पंतप्रधान होऊ नये असे वाटते.

आता उरलेल्या पक्षांपैकी सपा व बसपा असे पक्ष आहेत ज्यांची मोठी ताकद उत्तरप्रदेशात आहे + इतरही राज्यांत १-२ सीट्स ते मिळवत असतातच. त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे आहे.

समाजवादी पक्षाचे श्री मुलायमसिंह यादव यांनी प्रकटपणे आपल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेचे सूतोवाच केले आहे. माझा त्यांच्यावरील सर्वात प्रमुख आक्षेप आहे तो म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्या पक्षाला येणारे अपयश(आक्षेप सपा-१). सध्याचे त्याच्या मुलाचे उत्तरप्रदेशातील राज्य असो की पूर्वीचे खुद्द मुलायमसिंहांचे राज्य असो कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत राजकीय हस्तक्षेप प्रचंड असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुली छुट असणे, त्यातून वाढणारी गुंडगिरी वगैरेचा इतिहास फार जुना नाही. या बाबतीत सापत्न वागणूक ठेवणार्‍या नेत्याने पंतप्रधानपदी बसावे असे अजिबात वाटत नाही.

यांच्याबद्दल दुसरा आक्षेप आहे, जुनाट विचारसरणीचा.(आक्षेप सपा-२) समाजवादी पक्ष हा "समाजवादी" असल्याने म्हणा किंवा लोहियावादी असल्याने म्हणा आधुनिकतेकडे त्यांची पाठ असणार हे स्पष्ट आहे. पण कंप्युटरचा वापर टाळणार, कायद्यात धार्मिक हस्तक्षेपाची सोय वगैरे त्यांच्या घोषणा कोणत्याही प्रगतिशील देशाला मानवणार्‍या वाटत नाहीत. केवळ आर्थिकच नाही तर त्यांची राजकीय विचारसरणी, अनुशासन पद्धती सगळेच जुने आहे. काळाबरोबर बदल घडवणारा हा नेता नसल्याने त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी वेळोवेळी समोर येत असतात.

बहुजन समाज पक्षाच्या कु. मायावती यांच्याबद्दल मला एक मोठा आक्षेप आहे तो म्हणजे (बसपा-१) सरकारी पैशाचा गैरवापर. अर्थात हा आक्षेप इतरही पक्षांवर घेता येईल पण बसपाचे वैशिष्ट्य हे की हा वापर एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी वगैरे फारसा न होता मायावतींच्या प्रतिमा वर्धनासाठी होतो. जसे हत्तीचे ढीगभर पुतळे उभारणे, स्वतः मायावतींचे सर्वत्र पुतळे उभारणे.

मायावती यांच्यावर दुसरा आक्षेप असा (आक्षेप बसपा-२) की त्यांची आर्थिक, परराष्ट्राशी संबंधित भूमिका स्पष्ट नाही. देशाचा पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यात परराष्ट्रसंबंध हा मोठा फरक असतो. त्याच बरोबर आर्थिक धोरणे, कल्पना स्वच्छ असणेही गरजेचे असते. कु. मायावती यांच्यामध्ये दोन्हीचा अभाव जाणवतो. स्थानिक/अंतर्गत राजकारणात त्यांची एक ठाम भूमिका/स्थान आहे पण आंतरराष्ट्रीय मंचावर त्या भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील का या बद्दल साशंक आहे.

या सगळ्यांनंतर कानामागून येऊन तिखट झालेल्या आम आदमी पक्षाबद्दल म्हणा किंवा केजरीवाल यांच्याबद्दल म्हणा लिहिणे आता गरजेचे झाले आहे.

पंतप्रधानपदासाठी म्हणून माझा श्री.केजरीवाल यांच्यावरील सर्वात प्रमुख आक्षेप होता एकाधिकारशाहीचा. मात्र गेल्या महिन्याभरात विशेषतः निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षाचा कारभार पूर्वीइतका व्यक्तीकेंद्रीत वाटत नाहीये. तरी इतक्या नवख्या व अननुभवी (आआप-१) व्यक्तीने थेट देशाचा पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही हे ही खरे.

अजून एक आक्षेप म्हणजे पक्षाची आर्थिक नीती व राजकीय स्थान (आआप-२). यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय म्हणा किंवा व्यक्त केलेली भूमिका म्हणा, मला यांच्यात व सौम्य डाव्या पक्षांत विलक्षण साम्य दिसते. लोहियावादी पक्षांचा आयडियलिझम यांच्यात पुरेपूर उतरला आहे आणि म्हणूनच यांच्या आर्थिक धोरणावर सतत शंका वाटत असते. झोपडपट्ट्या अधिकृत करणे काय किंवा मोफत पाणी वा विजेवरील सबसिडी काय डावीकडे किंवा सरकार केंद्रित दिवसांकडे अर्थात परमिट राजकडे यांची वाटचाल चालली नाहीये ना अशी शंका येते.

तिसरे व सर्वात महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हे (आआप-३) व्यक्तीकेंद्रीत निवडणुका लढतात. समोरच्या व्यक्तीविरुद्ध राळ उडवून द्यायची इतकी की लोकांच्या डोळ्यात जाऊन त्यांना खरे-खोटे समजेनासे व्हावे. भारतीय राजकारणात हे सर्वत्र चालते हे खरेय पण जेव्हा एखादा पक्षा 'आदर्शवाद' हीच आपली कार्यप्रणाली आहे असे म्हणतो तेव्हा निवडणुका लढवायची ही पद्धत नक्कीच आदर्श वाटत नाहीत. काँग्रेस व भाजपापेक्षा वेगळा म्हणवणार्‍या पक्षालाही टीकेचा स्वीकार सकारात्मक रितीने करता येत नसेल तर हे इतर पक्षांची मोठे साम्य दाखवणारे ठरते.

शेवटचा मोठा आक्षेप असा की (आआप-४) लवचीकतेचा अभाव. आम्हालाच सगळे कळते, बाकी सगळे मूर्ख आहेत असा यांचा आविर्भाव असतो. योग्य वेळी लवचीकता दाखवणे केजरीवाल यांच्या क्षणिक राजकीय फायद्याचे असेलही मात्र एक पंतप्रधान म्हणून हे एककल्ली वागणे मला घातक वाटते.

असो. या पक्षांवरही तपशिलांत लिहेन असे वाटले होते पण याहून अधिक वेळ या पक्षांवर व प्रमुखांवर घालवावा असे वाटले नाही. थांबतो.

(समाप्त)