लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा भाग १

नमस्कार मंडळी,

मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरणनिर्मिती करण्यात हातभार लावायच्या उद्देशाने तयार केलेल्या प्रश्नमंजुषेला सुरवात करताना खूपच आनंद होत आहे.

राजकारणात आणि विशेषत: निवडणुकांमध्ये अगदी चौथी-पाचवीमध्ये असल्यापासून अतोनात रस असल्यामुळे सगळ्या घडामोडी मी भक्तीभावाने वाचल्या/बातम्यांमध्ये पाहिल्या आहेत.आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असे कुठेतरी कधीतरी वाचलेले/बघितलेले होते ते एका चिटोऱ्यावर लिहून काढून, आंतरजालावर परत एकदा जुने संदर्भ तपासून २० प्रश्न तयार करण्याइतपत माहिती एकत्र झाली. ती सगळी माहिती अचूक आहे याची खात्री करायचा माझ्या परिने होईल तितका प्रयत्न मी केला आहे.तरीही त्यात काही चूक/त्रुटी असल्यास ती निदर्शनास जरूर आणून द्यावी ही विनंती.

खाली दिलेल्या पहिल्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीला सर्वसाधारणपणे समकक्ष इतर प्रश्नांची काठिण्यपातळी असेल.प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय असतील. दर आठवड्याला एक अशा पध्दतीने ते प्रश्न मी इथे पोस्ट करणार आहे.प्रश्नांची उत्तरे व्य.नि वरच कळवावी ही विनंती.प्रत्येक व्य.नि ला उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच पण तसे करता न आल्यास प्रश्नाचे उत्तर जाहिर करताना कोणी बरोबर उत्तरे दिली हे पण जाहिर केले जाईल. तसेच काही वेळा पर्यायात नसलेले पण बरोबर असलेले उत्तर असेलच.व्य.नि वर उत्तर पाठवताना असे पर्यायात नसलेले कुठले उत्तर माहित असल्यास ते पण पाठवावे ही विनंती.

या २० प्रश्नांसाठी एका धाग्यात प्रत्येकी ४ असे एकूण ५ वेगळे धागे काढायचा सध्याचा विचार आहे. नंतर या आकड्यात गरज पडल्यास नक्कीच बदल करेन. इथे सुरवात पहिल्या प्रश्नापासून करत आहे.

प्रश्न क्रमांक १
आतापर्यंत चार वेगळ्या राज्यांमधून (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि गुजरात) लोकसभेवर निवडून गेलेले अटलबिहारी वाजपेयी हे असे आतापर्यंतचे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. खालीलपैकी कोण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेले आहेत?

अ. कांशीराम
ब. जॉर्ज फर्नांडिस
क. शरद यादव
ड. इंदिरा गांधी
इ. (क) आणि (ड) दोन्ही

या पर्यायांमध्ये नसलेल्या पण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेलेले/ल्या किमान दोन सदस्य मला माहित आहेत.ते उत्तरात जाहिर करणारच आहे.आपल्यालाही अन्य कोणी सदस्य माहित असल्यास जरूर कळवावे.

(उत्तर व्य.नि वरच द्यावे ही विनंती. उत्तर इथेच ५ जानेवारी रोजी जाहिर केले जाईल)