मिसळपाव आणि आपण सारे...

खरं तर सविस्तर लेख लिहायचा होता. तो तसा अर्धा लिहूनही झाला पण आता वेळ कमी आहे. म्हणून केवळ मुद्दे लिहीतो.

१) झाल्या प्रकारात चूक आपली आहे. आपण जाहीर धाग्यात अनावश्यक अवांतर करून घासकडवींच्या हाती कोलीत दिलं.
२) तेही कमीच म्हणून पुढे त्याच धाग्यावर संपादकीय अस्त्रांचा वापर झाला, यात तयारीच्या घासकडवींना त्याचं त्यांच्या बाजूने उत्तम प्रोजेक्शन केलं. आपण कमी पडलो.
३) घासकडवी काय विचार करतात त्याने आपल्याला फरक पडणार नाही कदाचित पण, विमे, आणि प्रास यांच्या सारख्या सदस्यांच्या चिडण्याचा विचार नक्कीच केला पाहिजे. आपलं चुक असेल तर ते निदान येथे तरी मान्य करून विषय पुढे जाईल असा प्रयत्न व्हायला पाहिजे होता.

४) सर्वात महत्वाचं म्हणजे आज पर्यंत असे खुप कमी वेळा झालेलं आहे की सर्वच संपादकांचं एक मत आहे मात्र तरी सुध्दा आपलं ठाम मत मांडायला कुणालाही मनाई नव्हती आणि कुणी केवळ आपल्या विरोधी मत मांडतंय म्हणून त्यांना टोमणे मारण्याचे प्रकार कधीही झाले नाहीत. माझं मत जे आहे ते स्पष्ट सांगून बहुमताचा आदर आहेच असे सांगण्याची आपली पध्दत होती ती आता विसरली जातेय असं दिसतंय हे खुपतंय.

५) असे प्रसंग आपल्यावर येत असतात की आपल्याला नेमकं काय करावं ते कळत नाही. अशा वेळी आपण त्या सदस्याच्या किंवा त्याच्य चर्चेच्या मागे लागण्यात आणि आपली अवस्था राजा आणि उंदीराच्या कथे सारखी करून घेण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला सदस्यांचा फोकस बदलता आला पाहिजे किंवा त्या चर्चेचा रंग मवाळ करता आला पाहिजे.

६) यावेळी झालेल्या वादळाने एवढा काही फरक पडलेला नाही, झालं ते चुकीचं झालं मिपाच्या सर्वसमावेशक प्रतिमेच्या विरूध्द चित्र रंगलेलं आहे, थोडक्यात काय तर आम्ही म्हणू ते लिहा नाही तर आम्ही अप्रकाशित करू असा संदेश गेला. थोडा दूर होऊन विचार केलात तर अशी व्याख्या आपण इतर ज्या संकेतस्थळांची करतोय तसे झालोय. इतर वेळी असं होत नाही का? थोडं फार होतं मात्र येथे घासकडवी सारख्या तेल लावलेल्या पैलवानाशी गाठ आहे हे आपण विसरलो. मला वाईट दोन गोष्टींचं वाटतंय, एकतर जाहीर दखल घ्यावी एवढे महत्व का दिले आणि दुसरे म्हणजे चुक झाली तर त्यावर आपल्यापैकी काही लोक वेगळा पक्ष मांडताहेत त्यांचे मत ऐकले का नाही?

७) मुख्य बोर्डावरील प्रकाराचा धुराळा खाली बसेलही, पण मला खरी चिंता आहे ती संपादकांतील चुकलेल्या ट्युनिंगचे. याआधी संपादकांमध्ये कायम एकमत नव्हतं मात्र कुणाच्याही बोलण्यात टोमणे नव्हते. संपादकांत मुद्दाम अनेक विचारांचे लोक असावेत जेणे करून संपादकीय कामात समतोल राहील अशी अपेक्षा आहे. अश्यावेळी केवळ कुणी एक संपादक आपल्या विरोधी मत मांडतोय म्हणजे तो लागलीच त्या सदस्याचा समर्थक होत नाही. मात्र असे बोलल्या गेलंय किंवा टोमण्यांतून सांगीतल्या गेलंय. हे चुक आहे. अजिबात अमान्य आहे.

८) सदस्यांवर कारवाई फारच नाईलाज झाल्यावर होते. शेवटचा उपाय तो असतो. सदस्याचं लेखन केवळ मला पटत नाही असा विचार करून मी कारवाई करीत गेलो असतो तर मिपा आज येथे नसतं.
९) शेवटी आपण संपादक आहोत. तुम्ही लोकांनी सर्वानुमते निर्णय घेतला तर मी त्याचे पालन करतो. कुणावर कारवाई करणे कठीण नाही की तुम्हा लोकांशिवाय कुणाला स्पष्टीकरण द्यावेच एवढाही मी विनयशील नाही. मी नियमाने वागतो पण त्या नियमांचे अस्तीत्व ज्यासाठी आहे ती मुख्य बाब आधी महत्वाची आणि त्यासाठीच नियम आहेत असे माझे मत. त्यामुळे मिपाच्या हितासाठी धोरणे आहेत आणि मिपासाठी ती बदलल्या जाऊ शकतात. ह्यात शंका नाही.

१०) धोरणे लिखीतस्वरूपाची या साठी हवीत की ती आपली किमान अपेक्षा आहे. ज्यांना ती मान्य नाहीत त्यांचा ती मान्य नसण्याचा आणि मिपापासून दूर राहण्याचा हक्कं आपल्याला मान्य असावा यासाठी आपण धोरणे स्पष्ट केली आहेत. जर धोरणांत कुठे कमतरता असेल किंवा धोरण चुकत असेल तर ते बदलायला हरकत नाही.

११) झाल्या प्रकारात आता करण्यासारखे खुप नाही. आणि मी आता काही दिवस आर्वजून सक्रिय राहतो. कुणाला काही चुकीचे जाणवल्यास चावडीत दूवा द्या. यापुढे मिपावर फोकस बदलल्या जावा यासाठी आपण प्रयत्न करूया.

१२) कुठल्याही सदस्याला काही सुचना द्यायची असल्यास संपादक मंडळाद्वारे व्य नि ने देऊया. आणि त्याची चर्चा चावडीत करूया.

१३) एकतर व्हॉट्सप वरील ग्रुप बंद करूया किंवा तातडीच्या संदेशांसाठी त्याचा वापर करूया. निर्णयासाठी चर्चा ही चावडीतच व्हावी.

१४) आपण परत एकदा सोबत काम करूया. अपर्णा ताई आणि अन्य कुणी माझ्या बोलण्याने नाराज झाले असाल तसेच कुण्या एका संपादकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलण्याने तुम्ही दुखावले गेले असाल तर मी स्वतः त्यांच्या कडून व माझ्याकडून सुध्दा तुमची माफी मागतो. मनात काही ठेवू नका. मिपा उत्तम चाललं आहे. ते पुढे नेऊया.

- नीलकांत