बुंदीचे लाडू

साहित्य: दोन मोठ्या वाट्या हरभरा डाळीचे पीठ (बेसन), दोन टीस्पून मोहनासाठी गार तेल, दोन वाट्या साखर, कक्ष तापमानाचे पाणी, तेल अथवा तूप, वेलदोड्यांची पूड भरडसर, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे, असल्यास बुंदी पाडायचा झारा, नसल्यास नेहमीचा झारा, डाव.
कृती: एका पातेल्यात डाळीचे पीठ पाणी घालून कालवून ठेवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात दोन चमचे तेल घालून पीठ घोटत रहावे. दोन वाट्या बेसनाला साधारण दीड वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी लागले. पाण्याचे प्रमाण थोडेफार वेगळे असू शकेल. पिठाची चांगली धार पडू लागली व पीठ चकचकीत झाले की थांबावे. तळणी तापत घालावी. तेल/तूप तापल्यावर आच मध्यम ठेवावी. डाव्या हातात झारा पकडून उजव्या हाताने डावभर पीठ त्यावर ओतत रहावे. त्याचवेळी झारा तळणीवर फिरवत रहावा. फार उंच किंवा अगदी तेलाजवळ झारा नेऊ नये. कढईच्या काठावर ठेवावा. जमल्यास झारा कढईच्या काठावर हलकेच आपटावा म्हणजे बुंदी हलकी होते. न जमल्यास पीठ नुसते ओतावे. या बुंदीच्या कळ्या खमंग तळाव्यात. हे बराच वेळ चालणारे काम असल्याने घाई न करता एकेक घाणा काढावा. सर्व बुंदी तळून झाल्यावर दुसर्‍या पातेल्यात साखर व पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. आपल्याला अगदी एकतारी पाक करावयाचा आहे. पाक होत असताना त्यात बेदाणे, काजू, वेलदोड्याची भरड पूड घालावी. आता आच बंद करून बुंदीच्या कळ्या घालून नीट हलवावे. साधारण अर्ध्यातासाने लाडू वळता येईल इतपत मिश्रण तयार होते. ते परातीत काढून घेऊन जरा फेसावे. मिश्रण फार कोरडे वाटल्यास किंवा लाडूची गोडी कमी वाटल्यास आणखी अर्धी वाटी किंवा आवडत असल्यास एक वाटी साखरेचा पाक करून वरून ओतावा. आता मिश्रण बरोबर वाटल्यास पाण्याच्या हाताने लाडू वळावेत. मला दोन वाटी बेसनाला तीन वाटी साखरेच्या पाकाची गोडी जास्त आवडली.
a