निवळशंख डोळे
क्षितिजावर पसरलेली लाली
सूचिपर्णीवृक्षांनी पांघरलेले गडद धुक्याचे अस्तर
आणि तुझे निवळशंख डोळे
बस्स.. इतकचं लक्षात आहे आता
----
तुझे हात माझ्या हातातून सुटले
तेव्हापासून फक्त
थोडेसे शब्द आणि थोडे जास्त मौन
इतकचं उरल होते माझ्या हातात...
----
सागर तीरावरच्या वाळूवर लिहिलेली
अक्षरे जशी लाटेगणीक पुसट होत जातात
तसाच तुझ्या हाताचा स्पर्श मिटत गेला
माझ्या हातावरुन....
कधीकाळी त्या स्पर्शाने माझ्या हातातली
अबोलीची फुले मोहरुन यायची
याची आठवण तरी आहे का तुला?
मला मात्र आता फक्त
ती अबोली मोहरतांना विलक्षण
विस्मयतेने पाहणारे
तुझे ते निवळशंख डोळे
तेवढेचं लक्षात आहेत
----
गडद धुक्याचे अस्तर पांघरलेल्या
घनदाट सूचिपर्णाखाली
एकाच शालीत घालवलेले ते क्षण
आता त्या धुक्यासारखेच धूसर झाले आहेत
पण मला तर त्याक्षणी माझ्यात विरघळणारे
फक्त ते तुझे निवळशंख डोळे
तसेच्या तस्से आठवतात
----
कदाचित ते तुझे निवळशंख डोळे
परत एकदा भेटले तर
सगळं सग्गळं आठवेल..
----
पण आत्ता याक्षणी मात्र
मला ते तुझे निवळशंख डोळे
बस्स… तेवढेचं लक्षात आहेत
-(पराग मांडे)