खंत

मैफिली सजल्या तुझ्या पण
मी तिथे वळलोच नाही
चांदणे खुणवीत होते
चंद्र मी झालोच नाही

वेदना त्या जीवघेण्या
क्षीण ना कण्हलो कधी
वार तू केले जिव्हारी
मी तरी हरलोच नाही

भोवताली गाव सारे
मी तरीही एकटा
तुटलो तुजसाठी असा की
मी पुन्हा वसलोच नाही

सागराच्या मी किनारी
दूर तू क्षितिजाकडे
हरवूनी बसलो तुला अन
मी मला दिसलोच नाही

उध्वस्त मी झालो तरीही
दु:ख ना त्याचे मला
खंत ही की मी तुला
किंचितही कळलोच नाही