मी पाहिलेले मस्कत - भाग १ - सलालाह
गेली ३२ वर्षे मी व्यवसायानिमित्त सल्तनत ऑफ ओमान उर्फ मस्कत येथे राहातो आहे. ह्या वास्तव्यात ह्या देशाच्या नयनरम्य प्रदेशांचे दर्शन घेतले आहे. त्यावरच एक लेखमाला लिहावी अशा विचाराने आज कळफलक बडवायला घेतला आहे.
भारताच्या पश्चिमेस १६०० कि.मी. वर आणि दुबईपासून ३५०-४०० कि.मी. अंतरावर अरबस्थानात हा देश आहे. 'मस्कत' हे ह्याचे पूर्वापार आणि रुढ नांव असले तरी कागदोपत्री 'सल्तनत ऑफ ओमान' हे नांव आहे. संक्षिप्तपणे ह्याला 'ओमान' असेही म्हणतात. 'ओमान' (मस्कत)च्या सीमा उत्तरेस युएई (दुबई), पश्चिमेस सौदी अरेबिया आणि दक्षिणेस येमेन ह्या देशांना जुळलेल्या आहेत. एकेकाळच्या रखरखीत वाळवंटात मनुष्यनिर्मित निसर्ग खूप आहे. ओमानची राजधानी मस्कत आहे. पूर्वीच्या काळी मस्कतच्या दक्षिणेस असलेले 'सलालाह' हे शहर देशाची (मस्कतची) राजधानी होते. परंतु, सध्याच्या राजाने राज्यभार स्विकारल्यावर (१९७०) आपली राजधानी 'मस्कत' ह्या शहरी केली. लोकसंख्येच्या दृष्टीने 'मस्कत' क्रमांक १ वर आहे तर 'सलालाह' क्रमांक २ वर. संपूर्ण देशभर वाळवंटी रखरखाट असला तरी मधे मधे 'ओअॅसिस' म्हणजे गोड्यापाण्याचे साठे आहेत. बहुतेक अशा पाण्याच्या साठ्यांच्या अवतीभवती शहरं वसली आहेत. परंतु ह्याला अपवाद 'सलालाह' हे शहर. इथे हिरवा निसर्ग आणि गोडे पाणी तुरळक नाही तर, मुबलक प्रमाणात आणि सर्वत्र आढळते. त्याचे कारण म्हणजे ह्या एकमेव प्रदेशाला लाभलेले 'पावसाळा' ह्या ऋतुचे वरदान. सलालाहचे ऐतिहासिक महत्व आणि राजाचे जन्मगाव म्हणून आपण आपल्या मालिकेची सुरुवात 'सलालाह' पासून करीत आहोत.

सलालाह विमानतळाबाहेर पडल्या पडल्या नजरेस पडणारा आखीवरेखीव हमरस्ता
'ओमान' देशाच्या दक्षिणेस आणि मस्कत ह्या राजधानीपासून (जी ओमानच्या उत्तर प्रदेशात आहे) १२०० कि.मी अंतरावर आहे. ह्या शहराचे ऐतिहासिक महत्त्व अशाकरीता की पूर्वीच्याकाळी इथूनच राज्यकारभार चालायचा. राजसिंहासन इथे होते. हा प्रदेश निसर्गसंपन्न होता/आहे आणि 'धूपा' ची जंगले इथे होती. धूपाच्या झाडाला चिरा देऊन चीक गोळा केला जातो. तो वाळवतात. हाच 'धूप'. हा नंतर इथून उर्वरीत अरबस्थानात, भारतात आणि चीनमध्येही निर्यात व्हायचा. इमारती लाकूड आणि दर्यावर्दी लाकूड इथे भरपूर प्रमाणात मिळायचे. त्यामुळे युद्ध नौका, व्यापारी नौका आदी नौका बांधणीतही हा प्रदेश अग्रेसर होता. विशाल समुद्रकिनारा लाभलेल्या ह्या प्रदेशात मासेमारी व्यवसाय फोफावला नसता तर नवलच. तसा तो भरपूर फोफावला. आज युरोपात जाणार्या बोटींवरील मालवाहू कंटेनर्सचे मोठे यार्ड इथे आहे. सलालाहची जमीन सुपीक आहे. 'खरीप' हंगाम जून ते सप्टेंबर असा असून ह्या हंगामात सतत पाऊस पडतो. अगदी धो धो नसला तरी सतत रिपरिपत असतो. आणि ह्या प्रदेशाला आपल्या केरळ सारखे सौंदर्य प्राप्त होते.


'धूपांच्या' झाडांप्रमाणेच इथे नारळाची आणि केळ्यांची झाडे मुबलक आहेत. वर्षाचे बाराही महिने मधूर शहाळी आणि केळी विकणार्यांच्या टपर्या रस्त्यांच्या कडेला आहेत. टपरीधारक बहुदा आपले केरळीय किंवा तर मग बांगलादेशी असतात. येताजाता पर्यटकांच्या गाड्या थांबतात आणि शहाळ्यांचा, केळ्यांचा आस्वाद घेत असतात. ओमान मध्ये इतर ठिकाणी मिळणार्या शहाळ्या-केळ्यांपेक्षा इथल्या फळांना अतिशय मधुर चव आहे.
स्वच्छ आणि विस्तिर्ण समुद्रकिनारा हे सलालाहचे अजून एक वैशिष्ट्य आणि पर्यटकांचे आकर्षण आहे.



भरतीच्या वेळी, खडकांच्या अंतर्गत पोकळीत दबाव वाढून पाण्याची नैसर्गीक कारंजी तयार होतात. २०-२० फुट उंच उडणारी ही कारंजी हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

ह्याहून विस्मयचकीत करणारा चमत्कार म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा विरोधाभास. एके ठिकाणी रस्त्याला चांगला ६-७ फूट खोल बांक आहे. त्याच्या तळाला वाहन उभे केले (अगदी इंजिन बंद करून) तरी ते वाहन आपसुक चढण चढून वर येते. आम्ही ९ पर्यटक आणि १ बसचा चालक अशा दहा माणसांना घेउन (इंजिन बंद असलेली) ती बस चढण चढून वर आली. ताशी २० कि. मी. चा वेग सुरुवातीला घेतला तो चढण चढून आल्यावर ताशी ५० कि. मी. पर्यंत गेला.
कॅलिफोर्नियातील सांताक्रूजच्या 'मिस्ट्री स्पॉटची' आठवण प्रकर्षाने झाली.
सलालाहचा एक महत्त्वाचा उद्योग, मासेमारी हा आहे.

आज बकरीईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी आहे आणि म्हणून बोटी समुद्रात गेल्या नाहीत.



मासेमारी करून आलेले कोळी बांधव किनार्यावर आल्यावर पकडलेले मासे निवडतात. त्यात नको असलेले मासे फेकून दिले जातात. ह्या फेकून दिलेल्या माशांवर आयता ताव मारणारे हे जीव. आज जेवणासाठी स्वतःच कष्ट करावे लागणार ह्या विवंचनेत दिसत आहेत.
पूर्वीच्या काळी बिलकीस नांवाच्या इजिप्तशियन राणीचा राजवाडा इथे होता. तो तिने यक्षाच्या मदतीने इजिप्तला नेला परंतु यक्षाने कांहीतरी घोळ घातला आणि अर्धाच राजवाडा इजिप्तला पोहोचला. अशी एक दंतकथा आहे. तो उरलेला अर्धा राजवाडा....हा.

तसेच, १०००-१२०० वर्षापूर्वीचे अल बलीद नांवाच्या गावाचे भग्नावशेष पहावयास मिळतात. ह्या गावांत श्रीमंत किंवा राजघराण्यातील उच्चभ्रू आणि गरीब प्रजा असे गावाचे दोन भाग आहेत. दोन्ही वस्त्यांसाठी मशीदी वेगवेगळ्या आहेत. राजवाड्यासाठी संरक्षण व्यवस्था म्हणून खंदक आणि उघडझाप करणारे दरवाजे आहेत. उत्खननात सापडलेल्या ह्या गावाचा बराचसा भाग २००७च्या 'गोनू' नामक चक्रिवादळात जमिनदोस्त झाला. आता उरलेत ते हे 'भग्नावशेषाचे भग्नावशेष'.


सलालाह मध्ये भरपूर प्रमाणात विड्याच्या पानांची लागवड होते. शहरात (आणि संपूर्ण देशात) पान खाण्यावर बंदी आहे. पण लागवड करून निर्यात मात्र केली जाते.

केरळचा एक राजा होता. त्याचं नांव चेरामन पेरुमल. इ.स. ६२२ मध्ये तो इस्लामने प्रेरित होऊन प्रोफेट मोहम्मदला भेटायला अरबस्थानात आला. आणि तत्क्षणी त्याने इस्लाम कबूल केला. भारताचा तो पहिला मुसलमान मानला जातो. इस्लाम स्विकारून भारतात परतताना त्या काळच्या येमेन (सध्याच्या सलालाह) मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा हा दर्गाह.

मरते समयी त्याने इश्वराची करूणा भाकली की हा उजाड प्रदेश माझ्या केरळाप्रमाणे हिरवागार होऊ दे. त्याच्या प्रार्थनेला यश येऊन सलालाहमध्ये निसर्ग अवतरला.

दंतकथा कांहीही असोत. अरबस्थानातील रखरखित वाळवंटी पार्श्वभूमीवर सलालाहची ही नेत्रसुखद हिरवळ आपल्या केरळची आठवण नक्कीच करून देते.
सलालाहचा खरिप हंगाम जून ते सप्टेंबर असा ४ महिन्यांचा असतो. फार मुसळधार पाऊस पडत नाही पण रिपरिप सतत चालू असते. हवा मस्त थंड होते. ह्या चार महिन्यांत डोंगरदर्यात राहणारे आदिवासी खाली पठारावर येऊन तंबू ठोकून राहतात. अरेबिक भाषेत 'जेबल' म्हणजे डोंगर आणि डोंगरात राहणारे ते 'जेबली'.
चार महिन्यांचा खरिप सलालाहला वर्षभराचे उत्पन्न मिळवून देतो. नद्या नाले भरतात. जमिनीतील गोड्यापाण्याची पातळी वाढते. त्यावर केळी, नारळ, पानवेलींचे उत्पन्न वर्षभर मिळत राहते. सौंदर्याने नटलेले शहर ह्या काळात अमाप पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांमध्ये जास्त भरणा आजूबाजूच्या अरबी जगतातील आणि युरोपातील पर्यटक ह्यांचा असतो. शहरातील जवळ जवळ ८० टक्के इमारती ह्या 'हॉटेल अपार्टमेन्ट्स' आहेत. ह्या इमारतींमधील सदनिका पर्यटकांना राहण्यासाठी भाड्याने देण्यात येतात. चार महिने सर्व इमारती आणि बंगले पर्यटकांनी गजबजून जातात. बाकी ८ महिने शुकशुकाट असतो. शुकशुकाटाच्या काळात एक सदनिका २४००/- रुपये भाड्यानेही मिळू शकते, तर ऐन मोसमात एखादा बंगला २४०००/- रुपये एवढ्या चढ्या दरात मिळतो. हि भाडी १ दिवसाची आहेत.
सर्व प्रकारची खाद्यसेवा उपलब्ध आहे. पाश्चिमात्य, अरबी, भारतिय, पाकिस्तानी, चीनी आणि अतिपूर्वेच्या देशांची खाद्यसंकृती अनुभवता येते. आता मौसम संपला आहे. पण तरीही उडप्याच्या हॉटेलात अर्धा पाऊण तासाची प्रतिक्षा करावी लागली. मांसाहारी (आणि शाकाहारीही) जेवणासाठी 'बार्बेक्यू नेशन' नांवाचे अति विशाल आणि आलिशान उपहार गृह आहे. त्यांच्याच इमारतीत वरती राहायला सदनिकाही भाड्याने आहेत. रात्री २ वाजे पर्यंत सदनिकेत जेवण पोहोचते करतात. पदार्थ अतिशय रुचकर आणि परवडणार्या दरात होते.
ह्यावेळी खरिप हंगाम संपल्यावर सलालाह्ला भेट द्यायचा योग आला पण आता मात्र ऐन मोसमात सलालाह भेटीची उत्कंठा वाढली आहे.
अशा ह्या नयनरम्य सलालाहला माझा ..... सलाम.