काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा. वाद्यांचा अथवा आवाजाचा गलबला हा फक्त भटजी बुवांनी " वाजंत्री बहु गलबला न करणे....." या ओळीचा निषेध म्हणुन एकदम ढणा ढणा वाजवणे या वेळीच दिसुन यायचा.
अश्या वैभवी शांत जीवनात उत्सव म्हणजे खरोखर उत्सवी रुप धारण करुन यायचे. अन असाच उत्सवी असायचा गणपती!
या उत्सवाची सामाजिक कार्य म्हणुन सुरवात जरी लोकमान्य टिळकांनी केली असली; तरी ती सामाजिक भावना गल्लोगल्ली पसरली, ती आमच्याच लहाणपणी! कोल्हापुरात कुठे लक्ष्मीपुरीत व्यापार्यांचा, अन मग प्रत्येक पेठेतल्या तालमीचा गणपती बसायचा. शिवाजी पुतळ्याचा कायम एकवीस फुटी गणपती ही सुरवातसुद्धा आमच्याच लहाणपणीची. हा गणपती, गणपती विसर्जनापर्यंत तयार करणे, एव्हढी एकच शर्त असावी त्या मंडळाची. आम्ही एकदा रात्री गणपती पहात फिरत असताना हा गणपती बर्नर लावुन वाळवायच काम सुरु असलेले याची देही याची डोळा पहाणे झाले आहे.
गणेश चतुर्थीची सुरवात ही सकाळी सकाळी "गणराऽऽज रंऽगी नाऽचऽतोऽऽ" न व्हायची. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रेडीओवर आपल हेच. मग ती गणपतीची आरती, ती रोज सकाळी अन संध्याकाळी रेडीओवर लागलीच पाहिजे. पुढे दोन चार वर्षांनी "अशी चिक मोत्याची माळ.." या गाण्यानंतर कोळी गीतांचा जमाना सुरु झाला. तोवरही ठिकच म्हणायच. घरात गणपती आणायची गडबड सुरु असायची. स्वयपाक घरात मोदक अन अख्ख्या सडलेल्या गव्हाची खीर हे पक्वान्न असायच. अजुनही पेढे, निदान गणपतीच्या प्रसादात तरी नव्हते. प्रसादात असायचे ताज्या फोडलेल्या नारळाचे काप, साखरेत घोळवुन, पंचामृत अन मोदक. तेंव्हा या मोदकांची अन त्या खीरीची एव्ह्ढी लज्जत नव्हती जी आज जाणवते. प्रत्येक घरात आरतीच निमंत्रण असायच. निमंत्रण म्हणजे आरतीची तयारी ज्या घरात पहिला होइल तो दारात येउन ओरडायचा," ओ बाईच्या आई, माईऽऽ मुलांनो चला आरतीला!" की सगळे धावत त्या घरात शिरत, मग त्यांची झाली की बाजुची, पलीकडची अशी करत करत ही सगळी मंडळी आमच्याही घरात शिरत. एकुण दहा दिवसात स़काळ संध्याकाळ "जय देव जयदेव.." अस निदान पाचसहा वेळा तरी घडायचच. त्यातल्या त्यात आठवतात ते भोगुलकर आप्पा! त्यांच अगदी लंबोदराशी स्पर्धा करणारे दोंद होतं. अन ते आरतीच ताट कायमच त्या भल्यामोठ्या पोटावर धरुन एका हाताने नुसते सपोर्ट करायचे, सगळ्या लोकांचा सूर कुठेही असुदे, यांचा आपला धीर गंभीर ओढुन लावलेला,"जय मंगलमुर्ती.." कायमच सगळ्यांच्या शेवटी ऐकु यायचा. त्यात आणि भर म्हणुन त्यांची लाडकी मनी "डायना" कायम त्यांच्या टाचेला कडाडुन चावत असायची. त्यामुळे एका पायाने तिला बाजुला ढकलत, आप्पांची आरती सुरु असायची. मग अश्याच एखाद्या संध्याकाळच्या आरतीत गणपती बघायला जायचा घाट घातला जायचा.
रात्री आठ किंवा नऊच्या सुमारास गणपती बघायला सारे शेजारी पाजारी मिळुन आम्ही निघत असू. रस्त्यावर दहा-पंधरा जणांचे असे घोळके बिनधास्त फिरत असायचे. कुठे टोळ्या बनवुन धारमाड करणारे ते दिवस नव्हते. साधे कपडे घालुन त्यावर शाली अथवा स्वेटर्स घातलेल्या बहुतेक सगळ्या उत्साही स्त्रीया अन त्यांची १०-१२ वयोगटातली मुले अशी, अन एखाद दुसरा पुरुष म्हणता येइल असा मोठा माणुस असा एकुण थाट असायचा. पुढचा गणपती "इथेच" असल्याने रिक्षा अथवा कोणतेही वाहन बिनकामाचे ठरत असे. मग आपली ११ नंबरची गाडी दामटवत सगळेजण गणपतीच्या मांडवांना भेटी देत रात्री १२-१ पर्यंत फिरत असत. बहुतेक मंडळे लाईव्ह सिन्स "जीवंत देखावे" ठेवत असत. म्हणजे मंडळातली हौशी मंडळी काहीतरी वेषभुषा करुन तासन तास उभी असायची. काहीजण स्टेजच्या खाली बसुन दोर्या ओढुन ओढुन काही गाड्या, काही भावल्या हलवण्याचा प्रयत्न करायचे. एकदोनदा त्या गाड्या अडकुन बसल्याने जोरात ओढल्यावर हिसका बसुन प्रेक्षकात येउन पडल्याचेही आठवते आहे. काहीजण सुरेख आरास करायचे. एका मांडवात भक्त प्रल्हादाचा सीन लावला होता. त्यात हिरण्यकशपू प्रल्हादाला उकळत्या तेलात फेकतो अन प्रल्हादाला हातात घेउन विष्णु अवतरतो असा काहीसा यांत्रीक सीन होता. नेमके आम्ही पोहोचलो तेंव्हा काहीतरी बिघडल होतं. मंडळाचा कार्यकर्ता दुसर्याला सांगत होता, "आयला काय झालयां कुणास ठाउक, त्यो प्रल्हाद शिजला आंसल आत!"
मग सुरु झाले गणपतीच्या मुर्तीचे वेगवेगळाले अवतार. शिव मुद्रेतला गणपती, विष्णु अवतारातला गणपती, अन चक्क कपिलदेवच्या अवतारातला गणपती (विश्वचषक!)!!
मग आला डिस्कोचा जमाना. ढिंच्याक ढिंच्याक म्युझिकवर मिथुन, जितेंद्र कमल हसन थिरकु लागले. आत्ता पर्यंत ऐकत असलेल्या गाण्यात नव्हती अशी झींग या गाण्यांनी आम्हाला आणली. अन मग राजारामपुरी दुसर्या गल्लीत पहिल्यांदा गणपती बसवुन, म्युझीकल लायटींगची आरास केली गेली. घरातुन अगदी पळत पळत जाउन अगदी एकट्याने मी ती रिदम अन झगमगाटाची झिंग अनुभवली आहे. अनेकदा. कोणत गाण बर?...साऽऽरा जमानाऽऽऽ हसिनो़ंका दिवानाऽऽ. मग बरीच पण सगळी अशी ड्र्मबिट असलेली गाणी अन त्याबरहुकुम तालात नाचणारे लाखो लाईटस! त्या बांबुच्या कठड्यांमध्ये भान हरपून उभी असलेली मी. पण तरीही गणपतीत "नाचणे" हा प्रकार नव्हता आला. जास्तीत जास्त लेझीम पथक अथवा झांज पथ़क! दोन्ही हात वर करुन शरीराला जमेल त्या तालात नाचायचा धिटपणा अजुनही अस्तीत्वात नव्हता.(या हात वर करुन नाचण्याचा सगळ्यात वाईट झटका आमच्या गावाला बसला. पाऊस संपला की हलगीच्या तालावर रोज संध्याकाळी घुमणारं लेझीम जाउन, वर्गणी काढुन टेपरेकॉर्डर आणला गेला. आता त्याच्यावर कॅसेटा टाकुन नुसते हात वर करायचे! झालं!)
हे ही दिवस सरले. रस्त्याने चालताना रस्त्यावर बिछावलेल्या नजरेवरुन चालण्याचे अल्लड दिवस आले. तोवर दुसरी गल्ली सहाव्वी गल्ली अन तेराव्या गल्लीचा गणपती ही रित मोडुन प्रत्येक गल्लीचा गणपती झाला होता. गणपतीची म्हणुन कौतुकाने वर्गणी देउन सामाजिक उत्सवाला हातभार लावायचे दिवस सरुन वर्गणीच्या दिवसात दार बंद करुन बसण्याचे दिवस सुरु झाले. एक दोन ठिकाणी तालमिच्या पैलवानांनी स्वतःची पैलवानकी दुसर्या तालमिच्या पैलवानांना रस्त्यावर दाखवायला सुरवात झाली. पोरीबाळी घेउन गणपती बघायला जाव की नको असा काहीसा विचार माणसांना पडू लागला. घराघरातुन टी.व्ही अवतरुन बरेच दिवस झाले होते. तरी अजुनही श्रीदेवीचे हावभाव बघुन जनता शरमत होती. चेकाळ अजुन दूर होता. अश्याच दिवसात आम्हा बहिणींना स्कुटरवर बसवुन...चवळीच्या शेंगा होतो आम्ही त्यामुळे तिबल चौबल सिट चालुन जायची...एकदा आमचे मोठे बंधुराज आम्हाला गणपती दाखवायला घेउन निघाले. ( आता ते एकदम असे एव्हढे प्रसन्न कसे काय झाले आमच्यावर? हा एक अजुनही पडलेला प्रश्नच आहे.) सगळ्या घरात मी तशी "दिवटी"! तर पहिले दहा बारा गणपती बघुन आम्ही पोहोचलो शाहुपुरीतल्या कोठल्यातरी गणपतीच्या मांडवात! सिन होता अधांतरी बुवा! मंडळातल एक गोरंगोमटं पोरगं पकडुन त्याला पायघोळ कफनी घालुन एक दंड हातात देउन त्याला अधांतरी बसवल होतं. आता बाकी सारे हा चमत्कार निवांत पहात होते. पण गप्प बसले तर ती मी कसली? मी अगदी पुढे उभी होते. वाकले खाली...अर्थात पहायचे होते ते त्यांनी काय इकडम केलीय ते...पण झाल काय..अशी तरणी पोरगी आपल्याकडे नाही त्या अॅगलने पहातेय म्हंटल्यावर ते अधांतरी बाबा खुदुखुदु हसु लागले...ते हसु लागले तशी त्यांचे अधांतरी दिव्य आसनही गुदुगुदु लागले. मला तर हसायला निमित्त्यच लागायच. खेळ खल्लास! मंडळातली बाकिची तरुण मंडळी येउन त्या बुवावर खेकसु लागली अन त्यांनी मला तेथुन काढता पाय घ्यायला भाग पाडले. बुवाबाजीचा पर्दाफाश करण्याची माझी ती पहिली वेळ!
परत काही गणपती पाह्यले. तोवर मला दम देउन," गप गणपती बघायचे नाहीतर घरी सोडुन येइन" अस बजावल गेलं होतं. मी ही शहाण्यासारखी मान हलवली होती. मग बाकी सारे गणपती मुकाट पाह्यले. एव्हढ्या गर्दीत अजुनही आठवतय दोन चार धक्के बसले असतील. अजुनही "काय जनावर आहेत!" असे उद्गार बाहेर पडत नव्हते. तर शेवटी पोहोचलो गंगावेश तालमीचा गणपती पहायला. जीवंत देखावा! शिशुपाल वध! दोनचार लोक देखावा पहात होते. आम्हीही पोहोचलो! बाजुला कृष्ण हातात फिरत सुदर्शन चक्र घेउन उभा. (ते इलेक्ट्रीक होते) शिशुपालाचे धड मुंडक्याला लालभडक रक्त घेउन उभे. अन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात शिशुपालाचे शिर! जीभ बाहेर काढुन! त्याचे डोळे अजुन जीवंत! पण झाल काय? त्या जीवंत डोळ्यांना दिसल्या दोन तरुण मुली. अन त्यात ही त्यातली एकजण ते लकाकलेले डोळे पाहुन भुवया उंचावतेय! आता मरणप्राय वेदना होताना कुणी मुली पाहील का? हे मुंडक पहात होत. मी नजरेला नजर मिळवली अन त्या मुंडक्याला हसु फुटल. आता मुंडक हसतय म्हंटल्यावर मला पा. पा. नि. म्हणतात ना? तस काहीसं. एकुण सिनचा पार बट्ट्याबोळ झाला राव! अगदी मुंडक नसलेल्या धडाला सुद्धा वाकुन हसु फुटल, अन किस्नातराव सुदर्शनचक्रासह परागंदा झाले. ज्येष्ठ भ्राता हसत अन रागवत अश्या दोन्ही टोकाच्या भुमिका बजावत होते. तेंव्हा गणपती पहायला मिळाले ते शेवटचे !
आजही आठ्वल तरी जाणवत ते; आमच्याच सारखे निरागस असणारे तरुण! लाजरे! भावनावश होणारे! तारुण्याच्या ओढीला आदराचा लगाम घालणारे तरुण! सुंदर दिसणार्या मुलीला चोरुन पहाणारे तरुण! गल्लोगल्लीच्या तालमित संध्याकाळी जोर बैठका घालायची खुमखुमी असणारे, कॉलेज करुन लवकरात लवकर चार पैसे कमवावे अशी धारणा असणारे, त्या जाणीवेखाली चिरडुन निघणारे तरुण! चुकुन कुठे घरातल्या व्यक्तींबरोबर दिसल की खुदकन हसणारे...त्यावेळी अगदी वेगळ्या ग्रहावरचे पण आज मनापासुन उमजणारे तरुण! काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!
__/\__
अपर्णा