मिपाचा ६ वा वर्धापन दिन कालच पार पडला. गणपतीची गडबड असल्याने आपण त्यासाठी खास असे काही कार्यक्रम घेतले नाहीत. पण यशस्वी रीतीने ६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल मिपाचे आणि नीलकांतचे खास अभिनंदन!
मोठ्या प्रमाणात साहित्य आणि नवे नवे मेंबर्स सतत येत आहेत. मात्र या वेळी जरा सावधगिरी बाळगावी लागेल असे वाटत आहे.
सध्या एकूणात मराठी वेबसाईट्सची परिस्थिती फार उत्तम म्हणावी अशी दिसत नाही. मायबोली आणि मिसळपाव या २ साईट्स ना भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. मात्र उपक्रम गेले कित्येक दिवस बंद आहे. मिमराठी.नेट बंद पडण्याच्या बेताला आले होते. नीलकांतने ते पुन्हा उभे करायला मदत केली. मी गेले काही दिवस तिथे न चुकता हजेरी लावते आहे. दिवसात चुकार ४/५ प्रतिसाद, एखादा दुसरा धागा एवढेच नवे येते आहे.
मिपावर नवे धागे येत आहेत. त्यात काही मालिका अतिशय उत्तम आहेत यात वादच नाही. सदस्यांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे. पण गेल्या काही दिवसांत फेसबुकवर यावेत तसे धागेही खूप येत आहेत. ते आपण अप्रकाशित करू शकत नाही. आपोआप मागे पडत जातील हे खरेच असले तरी आवर्जून चांगले काही लोकांकडून लिहून घ्यावे लागेल असे वाटत आहे.
गेल्या काही दिवसांत फेसबुकवर मिपाकरांचेच पुस्तके वाचणारे काही ग्रुप्स अस्तित्वात आले आहेत. श्री गणेश लेखमालेत लेख लिहिण्याबद्दल मी एकीला म्हटले तर "तो *** ग्रुप आहे ना, तिथे सध्या बिझी असते. पण तरी पाहीन" असं उत्तर मिळालं. फेसबुकवरचे ग्रुप्स पूर्वीपासून आहेत आणि नवे ग्रुप्स आल्याने मिपावर भयंकर काहीतरी परिणाम होईल अशी आता परिस्थिती राहिली नाही. पण अनेक चांगले लिहिणारे सदस्य मिपावर लॉग इन न करता तिथे पडीक राहिलेले बघायला मिळतात.
यावर उपाय म्हणून पुस्तक विश्वचे पुनरुज्जीवन करता येईल का? आणखी काही उपाय सुचतो आहे का?