"अन्न हे पूर्णब्रम्ह" ह्या सदरास एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्व मिपाकरांचे व "अन्न हे.." मधील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

ह्या दिना निमित्त मी शाकाहारी थाळी तयार केली आहे. ताटात सगळ्यात वरती आहे मिठ. त्याच्या बाजुला लिंबु, कैरीचे झटपट लोणचे व टोमॅटोची कोशिंबीर. त्याच्या बाजुला घडीची पोळी. पोळीला लागुन शिरा, बटाट्याची सुकी भाजी. वाटीत मोड आलेल्या मुगाची उसळ. मधल्या भागात मसाले भात. त्याच्या वरती कांदा भजी, पालक वडी आणि तांदुळाच्या पापड्या.
आता आपण प्रत्येकाची पाकॄ बघु.
कैरीचे झटपट लोणचे:
साहित्यः
कैरी - १ वाटी बारीक चिरुन
गुळ - १ चमचा बारीक चिरुन
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
मोहरी - १/२ चमचा
हिंग - १ चिमटी
मिठ - चवीनुसार
तेल फोडणीसाठी
कृती:
कैरी बारीक चिरुन एका बाउल मधे काढुन घ्या. हि कैरी तोतापुरी आंब्याची असेल तर जास्त छान लागते. मला इथे तोतापुरी मिळाली नाही, त्यामुळे मी ब्राझीलीयन कैरी वापरली आहे. ;)
आता फोडणीसाठी २-३ चमचे तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाकावी. मोहरी थोडी तडतडली कि त्यात हळद, लाल तिखट व हिंग टाकुन परतुन घ्यावे. हि फोडणी लगेच कैरीवर ओतावी. त्यातच चवीनुसार मिठ व बारीक चिरलेला गुळ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. कैरीचे झटपट लोणचे तयार आहे.
टिपः
तुम्ही आवडत असल्यास त्यात लोणच्याचा तयार मसाला जो बाजारात मिळतो, तो टाकला तरी चालेल.
गुळ एकदम बारीक चिरुन किंवा किसुन घ्यावा, त्यामुळे तो निट मिक्स होतो.
हे लोणचे वरण्-भाता सोबत सुद्धा एकदम मस्त लागते. नक्की करुन बघा.
टोमॅटो कोशिंबीरः
साहित्यः
टोमॅटो - २ बारीक चिरुन
दही - १/२ वाटी
लाल तिखट - १ चमचा
मोहरी - १/२ चमचा
साखर - १/२ चमचा
तुप - १ चमचा
कोथिंबीर सजावटी साठी
मिठ चवीनुसार
कृती:
टोमॅटो बारीक चिरुन बाउल मधे घ्यावे. त्यात दही, लाल तिखट, मिठ व साखर मिक्स करावी. आता फोडणीसाठी १ चमचा तुप गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली कि हि फोडणी टोमॅटो वर ओतावी. वरुन कोथिंबीर टाकुन सजवावे.
टोमॅटो कोशिंबीर खायला तयार आहे.
घडीच्या पोळ्या:
साहित्यः
गव्हाचे पीठ - १ वाटी
तेल - २ चमचे
मिठ - १/२ चमचा
पाणी पीठ मळण्यासाठी लागेल तेवढे
कृती:
गव्हाच्या पीठात तेल व मीठ टाकुन निट मिक्स करावे. त्यात थोडे-थोडे पाणी वापरुन कणिक मळुन घ्यावी. हि कणिक १/२ तास झाकुन ठेवावी.
१/२ तासानंतर कणिक परत एकदा थोडा तेलाचा हात लावुन निट मळुन घ्यावी.
कणकेचा एक छोटा गोळा घ्यावा. त्यास थोडी पिठी लावुन छोटी पुरी लाटुन घ्यावी. त्यात वरतुन परत तेल लावुन थोडे पिठ भुरभुरावे. त्याचा अर्धचंद्र होइल, अशा प्रकारे घडी घालावी. त्या घडीवर परत थोडे तेल व पिठ लावुन, त्रिकोणी आकाराची घडी घालावी. आता ह्या घडीस थोडे पिठ लावुन हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी.
तव्यावर दोन्ही बाजुने पोळी शेकुन घ्यावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यास वरतुन तेल किंवा तुप लावुन घ्यावे. गरमा-गरम घडीची पोळी तयार आहे.
शिरा:
साहित्यः
रवा - १/२ वाटी
साखर - १/४ वाटी (आवडी प्रमाणे कमी-जास्त करु शकता)
दुध - १ ते दिड वाटी
तुप - २ चमचे
बदाम्-काजु-मणुका - १ चमचा
विलायची पावडार - १/४ चमचा
केशर - १ चिमटी
कृती:
रवा तुपा वर निट परतुन घ्यावा. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे. त्याच दुधात साखर, वेलची पावडर व केशर एकत्र करुन घ्यावे. रवा निट परतल्यावर त्यात हे गरम केलेले दुध एकत्र करावे. हे गरम दुध टाकताना काळजी घ्यावी. दुध वरती उडुन भाजण्याची शक्यता असते.
सर्व निट मिक्स झाल्यावर त्यात वरतुन ड्रायफ्रुट्स टाकुन झाकण ठेवुन ३-४ मिनिटे शिजवुन घ्यावे. गोड शिरा खायला तयार आहे.
मी मोद्क्याच्या साच्यामधे हा शिरा भरुन त्याला मोदकाचा आकार दिला आहे.
बटाट्याची सुकी भाजी:
साहित्यः
बटाटे - २ उकडुन त्याच्या मोठ्या फोडी करुन घ्याव्यात.
कांदा - १/२ बारीक चिरुन
हिरवी मिरची - २ बारीक चिरुन
मोहरी - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
कडिपत्ता - ३-४ पाने
हिंग
कोथिंबीर सजावटीसाठी
मिठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
कृती:
कढईत तेल गरम करुन घ्यावे. त्यात मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतुन घ्यावे. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कांदा परतुन घ्यावा. कांदा थोडा परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. त्यावर ४-५ मिनिटे झाकण ठेवुन, गॅस बंद करावा. वरतुन कोथिंबीरने सजवुन, बटाट्याची भाजी खायला तयार आहे.
तुम्ही आवडत असल्यास त्यात थोडे लिंबु पिळु शकता किंवा ओले खोबरे टाकु शकता.
हिरव्या मुगाची उसळ
साहित्यः
हिरवे मुग - १/२वाटी
कांदा - २ चमचे बारीक चिरुन
टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन
ओले खोबरे - १ चमचा
हिंग - १ चिमटी
मोहरी - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गोडा मसाला - १ चमचा
कडिपत्ता - २-३ पाने
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
तेल फोडणीसाठी
कृती:
कढईत तेल गरम करुन मोहरी, हिंग, हळद व कडिपत्ता टाकुन १ मिनिट परतावे. त्यात कांदा व टोमॅटो टाकुन २ मिनिट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट व गोडा मसाला टाकुन परतावे. त्यात मोड आलेले मुग, ओले खोबरे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. ह्यात १/२ वाटी पाणी टाकुन, झाकण ठेवुन ५ मिनिटे मुग शिजु द्यावे. ५ मिनिटांनी मुग शिजले असल्यास गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीरने सजवुन, मुगाची उसळ खायला तयार आहे.
मसाले भात:
साहित्यः
बासमती तांदुळ - १/२ वाटी
मटार - ४ चमचे
तोंडली - १ चमचा
टोमॅटो - २ चमचे (थोड्या मोठ्या फोडी कराव्यात)
कडिपत्ता - ३-४ पाने
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
धणे-जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
गोडा मसाला - १ चमचा
मिठ चवीनुसार
तुप - २ चमचे
कोथिंबीर व ओले खोबरे सजावटीसाठी
कृती:
तांदुळ निट धुवुन १५-२० मिनिटे भिजवुन घ्यावेत. कढईत तुप गरम करुन त्यात हळद, कडिपत्ता, टोमॅटो, तोंडली व मटार निट परतुन घ्यावे. त्यात लाल तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला व गोडा मसाला टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे. त्यात भिजवलेले तांदुळ टाकुन परत १-२ मिनिटे परतावे. त्यात १ ते दिड वाटी गरम पाणी ओतावे. त्यात चवीप्रमाणे मिठ टाकावे. झाकण ठेवुन पहिले २ मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर ५-१० मिनिटे मंद आचेवर भात शिजु द्यावा. भात शिजल्यावर वरुन कोथिंबीर व ओले खोबरे पेरुन मसालेभात serve करावा.
कांदा भजी:
साहित्यः
कांदे - २ लांब चिरुन
हिरव्या मिरच्या - १ बारीक चिरुन
बेसन - १/२ - १ वाटी
तांदुळाचे पीठ - २ चमचे
ओवा - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
कोथिंबीर - १ चमचा बारीक चिरुन
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कृती:
कांदा लांब चिरुन घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्या, ओवा, लालतिखट, हळद, कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. आता त्यात बेसन व तांदुळाचे पीठ टाकुन निट एकत्र करावे व १०-१५ मिनिटांसाठी झाकुन ठेवावे. १०-१५ मिनिटांनी कांद्याचे पाणी सुटलेले असेल, त्यामुळे वरुन पाणी टाकावे लागणार नाही. पाणी जास्त सुटले नसल्यास थोडे पाणी टाकु शकता.
कढईत तेल गरम करुन घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यातले १/२ चमचा गरम तेल भज्याच्या पिठात टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे भजी हलकी व crispy होते. आता गरम तेलात भज्या सोडुन २-३ मिनिटे निट तळुन घ्याव्यात. कांदा भजी खायला तयार आहे.
पालक वडी:
पालक वडीची पाकृ तुम्हाला येथे मिळेल.
