'अन्न हे पूर्णब्रह्म'च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सर्व मिपाकरांचे व रेवतीचे खास अभिनंदन. ह्या सदरामुळे आम्हाला वेग-वेगळे पदार्थ बनवता व शिकता आले, त्यात मिपाकरांचे प्रतिसाद नवीन, वेगळे काही बनवण्यास प्रोत्साहित करत होते. कोकणातले निवडक पदार्थ घेऊन चवीने खाणार्यांसाठी मी कोकणी मांसाहारी थाळी सादर करत आहे , आशा आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल.
कोकणी मांसाहारी थाळीत भात, तांदळाच्या भाकर्या, त्याबाजूला घावने, तळलेले पापलेट, कांद्याच्या चकत्या, वाटपाचे वरण, सोलकढी, तळलेले पापलेट, सुकं चिकन, मालवणी पापलेटचे कालवण व गोडात मालवणी सोजी.
सुरुवात वाटपाच्या वरणाने करुयात. आता तुम्ही म्हणाल मांसाहारी थाळीत वरणाचे काय काम तर त्याचे असे आहे की आमच्याकडे हे वरण खास मांसाहार असेल तर बनवतातच म्हणून त्याची पाककृती देतेय :)
वाटपाचे वरण
साहित्यः
१ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून, १० मिनिटे भिजत ठेवणे
अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ / सुकं खोबरे
पाव वाटी कांदा बारीक चिरुन
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
पाकृ:
तुरीची डाळ कुकरला नेहमी प्रमाणे शिजवून घ्यायची.
खोबरे + जीरे + कांदा + हळद एकत्र करुन, थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
हे वाटण शिजवलेल्या तूरीच्या डाळीत घालून चांगले शिजवून घेणे.
चवीप्रमाणे मीठ घालणे.
सुकं चिकन
साहित्यः
अर्धा किलो चिकन साफ करुन घेणे
१/२ वाटी दही
३ टेस्पून कोथींबीर + पुदिना + हिरवी मिरची + आले + लसूण पेस्ट
दीड टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१ टीस्पून हळद
२ टेस्पून गरम-मसाला
१/४ वाटी सुके खोबरे किसून घेणे
१/२ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या
चवीप्रमाणे मीठ
पाकृ:
साफ केलेल्या चिकनला दही, कोथींबीर + पुदिना + हिरवी मिरची + आले + लसूण पेस्ट लावून २-३ तास मॅरिनेट करणे.
थोड्या तेलात किसलेले सुके खोबरे + कांदा + लसूण एकत्र लालसर परतून घेणे.
थंड झाले की त्यात थोडे पाणी घालून मुलायम वाटून घेणे.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले चिकन, हळद, लाल तिखट, गरम-मसाला व मीठ घालणे.
चिकन वाफेवर शिजवायला ठेवावे, साधारण शिजले की त्यात कांदा-खोबर्याचे वाटप घालणे व परतून परतून शिजवणे.
शिजल्यावर चिरलेली कोथींबीर वरून पेरावी.
मालवणी पापलेटचे कालवण
साहित्यः
पापलेट साफ करुन, तुकडे करुन हळद + मीठ लावून ठेवावे
१ वाटी खोवलेला ओला नारळ
१०-१२ बेडगी मिरच्या
२ टीस्पून धणे
१-२ लसूण पाकळ्या
१ छोटा कांदा बारीक चिरुन
१/२ टीस्पून हळद
७-८ कोकमं (आबंटपणानुसार कमी - जास्तं)
मीठ चवीनुसार
पाकृ:
बेडगी मिरच्या + धणे अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवावे.
ओला नारळ + कांदा + हळद + भिजवलेल्या मिरच्या + धणे + लसूण एकत्र करुन मुलायम वाटून घेणे.
पातेल्यात १ चमचा तेल गरम करून वाटण, मीठ, कोकमं व थोडे पाणी घालावे.
कांद्याचा वास जाईपर्यंत उकळावे.
उकळल्यावर पापलेटचे तुकडे सोडून शिजवून घ्यावे.
पापलेट फ्राय
साफ केलेल्या पापलेटच्या तुकड्यांना कोथींबीर + हिरवी मिरची + लसूण + चिंचेचा कोळ ही पेस्ट, लाल तिखट , हळद व मीठ लावून १५-२० मिनिटे मॅरिनेट करुन ठेवावे. फ्राय पॅनमध्ये तेल गरम करुन घेणे. तुकड्यांना तांदळाच्या पिठात किंवा ज्वारीच्या पिठात घोळवून दोन्ही बाजूने खरपूस तळून घेणे.
घावने
घावन करायचे असल्यास सुवासिक तांदूळ स्वच्छ धुवून ५-६ तास भिजत घालावे व नंतर मुलायम वाटून घ्यायचे. त्यात पाणी किंवा दूध किंवा नारळाचे दूध , मीठ घालून पातळ मिश्रण तयार करायचे. नॉन-स्टीक तव्यावर कांद्याने तेल पसरवून घावने घालावीत. कोकणात बिडावर घावने बनवली जातात.
हल्ली सुवासिक तांदळाची (बासमती) मोदक पिठी विकत मिळते बाजारात, चांगल्या प्रतिची घेऊन त्यात पाणी, मीठ घालून ही घावने बनवता येतात.
सोलकढी:
एक नारळ वाटून दूध काढून घेणे. त्यात कोकमाचे आगळ, हिरव्या मिरच्या +लसूण + जीरे वाटून घालणे.
चवीनुसार मीठ घालावे.
आगळ नसल्यास कोकमं गरम पाण्यात तासभर भिजवून ठेवावी, थोडी पिळून, गाळून त्याचा रस घ्यावा व तो नारळाच्या दुधात मिसळावा.
तांदळाची भाकरी:
दीड वाट्या तांदळाचे पीठ
गरम पाणी
तांदळाचे पीठ परातीत घेऊन , गरम पाणी घालून भिजवावे. त्याचे सारखे भाग करुन घ्यावे, एक गोळा परातीत घेऊन पाण्याच्या हाताने चांगले मळून घ्यावे. कोरडे पीठ घेऊन भाकरी थापावी. तव्यावर भाकरी टाकून, पाण्याचा हात फिरवून घ्यावा. पाणी सुकले की उलटावे व चांगली भाजली की आचेंवर टाकून सर्व बाजूंनी सारखी भाजून घ्यावी.
तुम्ही उकडीचीही तांदळाची भाकरी बनवू शकता.
मालवणी सोजी (गोड पदार्थ)
साहित्यः
१ वाटी लापशी रवा
१ वाटी गुळ
१/२ वाटी ओला नारळ
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
मीठ चिमूटभर
१ टीस्पून वेलचीपूड
२ टेस्पून साजूक तूप
पाकृ:
कढईत तूप गरम करुन त्यात लापशी रवा मंद आचेवर परतून घ्यावा.
एकीकडे पाणी गरम करायला ठेवावे.
ओला नारळ + हळद +जीरे ह्यांचे मुलायम वाटण करुन घ्यावे.
रवा खमंग भाजला की त्यात डावाने थोडे-थोडे करुन गरम पाणी घालावे व रवा शिजवून घ्यावा.
सोजी खीरीप्रमाणे पातळ हवी असल्यास आणखीन पाणी घालावे.
रवा शिजला की त्यात वाटण, गुळ घालून शिजू द्यावे.
चिमूटभर मीठ व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
वरुन हवे असल्यास एक चमचा साजूक तूप सोडावे.
ही सोजी गरम छान लागते, हवे असल्यास थंड ही सर्व्ह करता येते.
आवडत असल्यास तुम्ही ह्यात सुकामेवा ही घालू शकता.
अन्न हे पुर्ण्ब्रह्मला अनेक शुभेच्छा !!