द गोल्डन सिटी जैसलमेरची ही पाककृती आपण अन्न हे पूर्णब्रह्मच्या राजस्थानी पाककृती विशेषमध्ये पाहणार आहोत :)
चला तर मग राजस्थानच्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात करुया.
साहित्य जैसलमेरी चने:
१ वाटी काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणे. सकाळी पाणी उपसून कुकरला बोटचेपे शिजवून घेणे.
१ वाटी दही
३ टेस्पून बेसन
२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
१-१/२ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून जीरेपूड
१/२ टेस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून गरम मसाला
मीठ चवीनुसार
१ टेस्पून साजूक तूप
पाकृ:
एका बाऊलमध्ये फेटलेले दही+ हळद+ लाल तिखट+ धणेपूड व थोडे पाणी घालून एकत्र करा.
कढईत तूप गरम करून जीरे, हींग व हिरव्या मिरच्यांची फोडणी तयार करा.
त्यात आता दह्याचे मिश्रण घालून सतत ढवळत रहा. गॅस मंदचं असू द्या नाहीतर दही फाटू शकतं.
दह्याच्या मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात शिजवून घेतलेले काळे चणे घाला व ४-५ मिनिटे शिजवा.
वेगळ्या बाऊअलमध्ये बेसन+ आमचूर पावडर+ जीरेपूड + हळद व थोडे पाणी घालून एकत्र करा.
हे बेसनाचे मिश्रण आता उकळत्या ग्रेव्हीमध्ये घाला व सतत ढवळत रहा.
ग्रेव्ही थोडी दाट होत आली व बेसन शिजले की त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.
सगळ्यात शेवटी वरून गरम मसाला भुरभुरा.

गरमा-गरम जैसलमेरी चने तयार आहे, तुम्ही चपाती, पुर्यांबरोबर सर्व्ह करु शकता. आपण हे खोबा रोटी बरोबर सर्व्ह करणार आहोत.
साहित्य व पाकृ खोबा रोटी:
नेहमी चपात्या/ पोळ्यांकरीता कणीक भिजवतो तशी मीठ व तेलाऐवजी तुप घालून घट्ट भिजवून घ्यावी.
कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटावी.
तवा मध्यम आचेवर तापत ठेवावा.
जाडसर लाटलेली पोळी तव्यावर दोन्ही बाजूने जेमतेम शेकून घ्यावी.
जेमतेम शेकलेल्या पोळी तव्यावरुन काढून घ्यावी व त्यावर एका बाजूने हलके चिमटे काढावे.
पुन्हा पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यावी.
शेवटी गॅसच्या विस्तवावर खुसखुशीत शेकावी व वरून तूप पसरवून घ्यावे.

जैसलमेरी चने खोबा रोटी व कांद्याबरोबर सर्व्ह करा :)