दम आलू काश्मिरी

मंडळी, सध्या या विभागात आपण काश्मिरी पदार्थांचा आस्वाद घेत आहोत. 'दम आलू काश्मिरी' हा पदार्थ देण्याचे ठरवले तेंव्हा पदार्थाची जी चव जिभेवर होती त्यापेक्षा मूळ पदार्थ वेगळ्याप्रकारे कसा केला जातो हे लक्षात येण्यासाठी बर्‍याच पाककृती जालावर व पुस्तकात पाहिल्या. मूळ 'दम आलूच्या' अगदी जवळ जाणारी कृती शेफ संजीव कपूर यांची आहे. त्यात गरजेनुसार थोडेफार बदल करून कृती येथे देत आहे.

साहित्य: छोटे बटाटे ४०० ग्रॅम, १ टेबलस्पून बडीशेपेची पूड, १ टेबलस्पून काश्मिरी मिरचीचे तिखट, एक टीस्पून सुंठपूड, मध्यम वाटीभर दही, २ वेलदोडे, तीन लवंगा, इंचभर दालचिनीचा तुकडा, ४ मिरे, फोडणीसाठी शहाजिरे व हिंग, मीठ, बटाटे तळण्यासाठी तेल, पाणी.

कृती: बटाटे न फुटतील असे उकडून घ्यावेत. तळणी तापत घालावी. बटाटे सोलून तळून घ्यावेत. आता कढईत फोडणीसाठी अगदी चमचाभर तेल घ्यावे. शहाजिरे व हिंगाची फोडणी करावी. चमचाभर पाणी घालावे म्हणजे फोडणी जळणार नाही. नंतर तिखट, अख्खे मसाले, बडीशेपेची पूड, सुंठपूड घालून परतावे. वाटीभर दही घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मीठ घालावे. आता त्यात दोन कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी. नंतर तळलेले बटाटे सोडावेत. झाकण ठेऊन १५ मिनिटे मध्यम आचेवर भाजी उकळू द्यावी. चविष्ट दम आलू काश्मिरी तयार आहे.

a

टीपा: १) मूळ कृतीमध्ये ५०० ग्रॅम बटाटे घेतले आहेत, जे मसाल्याच्या मानाने मला जास्त वाटले म्हणून येथे ४०० ग्रॅम घेतले आहेत.
२)दही थोडे जास्त घेऊन चव आवडली म्हणून मूळ कृतीपेक्षा जास्त घेतले आहे.
३)बटाटे घातल्यानंतर १५ मिनिटे उकळणे आवश्यक आहे. त्याने चव जास्त चांगली आली. तळलेल्या बटाट्याचे तेल भाजीत येते व भाजी तेलकट वाटते म्हणून फोडणीसाठी तेल थोडे कमी घ्यावे.
४)गोल बटाटे मिळत असल्यास वापरावेत. मला ते मिळाले नाहीत. मोठ्या बटाट्यांच्या फोडी करूनही आपण वापरू शकतो.