नमस्कार,
ही चावडी असली तरी येथे लेखन करीत आहे. तसेच हे लेखन केवळ बंदिस्त दालनातील आहे. तरी सुध्दा यापुढील सर्व लेखन हे केवळ काल्पनिक आहे असे समजावे.
धर्म ही आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत अशी बाब आहे. आपण हिंदू कि़ंवा पश्चिमेतील सुधारणावादी ख्रिश्चन रोजच्या जीवनात जरी धार्मीक कर्मकांडं करीत नसलो तरी आपल्या एकूनच अभिव्यक्तीशी धर्म कुठेतरी जुळलेला असतोच. आपण करतो ती स्वाभाविक निवड किंवा आपण पालन करतो ते नैतीक नियम हे आपल्याला धर्माशी सांगडघालूनच माहिती झालेले असतात. त्यामुळे जाणते - अजाणतेपणी आपण धर्माशी निगडीत असतो हे नक्की. कुणी जाणीवपुर्वक दूर राहत असेल आणि तेवढे वस्तुनिष्ठ असतील ते अपवाद म्हणा.
धर्माचा गजर एवढ्यात होण्यास काही घटना कारणीभूत झाल्या. त्यात हिंदू मुस्लीम, बौध्द आदी धर्माच्या व्यक्तींचे वागणे जवळून बघता आले. त्या मध्ये सध्या बौध्द धर्मीय लोक जे की आता आर्थीक आणि राजकीय पातळीवर बरेचसे स्थिरस्थावर झालेले आहेत. आताशा अमरावतीकडे नवीन प्रकार चालला आहे. एखादी मोकळी जागा दिसली म्हणजे सरकारी मोकळी जागा किंवा एखाद्या नवीन वस्तीतील मोकळी जागा तर लागलीच तेथे हे लोक पंचशीलाचा झेंडा उभा करून त्याची आराधना करायला सुरू करतात. असे करताना तेथील बहूसंख्य हिंदूंचा त्यांला विरोध असतो. आणि यातून वाद होत आहेत. आठ दिवसांपुर्वी एका खेडे गावातील पुनर्वसनात एक मोकळी जागा ही एका हिंदू दलीत व्यक्तीच्या नावे होती त्यात काही तृटी आढळल्याने तहसीलदाराने ती जागा समाजमंदीरासातठी ( कम्युनिटी हॉल) दिली. जेणे करून सर्वांना छोटा मोठा कार्यक्रम या हॉल मध्ये घेता येईल. मात्र तो हिंदू दलीत त्याचा हक्कं सोडायला तयार नाही. जागा समाज मंदीराला दिली असून सुध्दा बौध्द लोकांनी त्यावर काही तासांत नीळा झेंडा उभा करून टाकला. हे घडलं १३ एप्रीलला आणि १४ एप्रीलला मोठी पुजा करायचं ठरवलं. प्रश्न मोठा बाका होता. कारण नेहमी सवर्ण विरुद्ध दलीत असा घडणारा सामना आज हिंदू दलीत विरूध्द बौध्द दलीत असा होता. शेवटी १४ एप्रीलचा मुहूर्त दोन्ही बाजूनी टाळल्या जावा यासाठी सदर जागेत दोन्ही पक्षाला प्रवेश बंदी करण्यात आली.
यात मला हे लक्षात येतंय की एकदा का झेंडा उभा केला की मग कोण एवढी हिंमत करतोय की तो झेंडा काढेल? प्रशासन हे करू शकतं. उपविभागीय अधिकार्याला अशी अतिक्रमणे काढायचे अधिकार आहेत, मात्र लोकांच्या भावनेचा प्रश्न आला की प्रशासन उगाचच दबावाखाली येतं. धर्माच्या नावाखाली चालणारे ब्लॅकमेलींग नाकारण्यासाठी बाबासाहेब बुध्दीप्रामाण्यवाद माननार्या धम्मात गेले आणि आज परत एक चक्र पुर्ण झाल्या सारखं वाटतंय.
धर्माची गोष्ट निघाल्यावर परत त्याच दरम्यान घडलेला महत्वाचा प्रसंग सांगतो. भारताच्या फाळणीच्या वेळी सर्व हिंदू भारतात परत आले नाहीत. तर काही पाकिस्तानातच राहीले. आता त्यांच्यावर बरेच अत्याचार होत आहेत असं बिबिसीच्या बातम्यांवरून कळते. हे हिंदू भारतात येण्याची संधी शोधत असतात. मात्र भारत सरकार त्यांना व्हिसा देत नाही, कारण काय तर हे लोक परत जात नाहीत. मात्र यावर्षीच्या कुंभमेळ्याच्या मुहुर्तावर या लोकांना भारतसरकारने व्हिसा दिला. मात्र असं ऐकीवात आहे की प्रत्येक घरातील एक व्यक्तीला व्हिसा नाकारण्यात आला आहे जेणे करून आलेले लोक परत जातील. असे जवळपास ७०० लोक भारतात आले आहेत. कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेने भारतभरातून आलेल्या संत महंताना आवाहन केले आहे की या लोकांना सामावून घ्या. ( अर्थात हे आवाहन जाहीर नाहीये)
या प्रकाराची कल्पना होतीच. यातच अचानक रायपुर येथील सिंधी समाजातील महत्वाचे असे समजले जाणारे शदाणी पीठाचे प्रमुख आपल्या दोनशे अनुयायांसमवेत अमरावती व परिसरातील मराठी मठांमध्ये भेटी द्यायला लागलेले दिसताहेत. मी नेहमीप्रमाणे शोधाशोध केल्यावर प्रकार लक्षात आला की हे लोक सुपीक जमीन शोधताहेत जेथे या ७०० पै़की काही लोक येथे सामावल्या जावेत.
हे सर्व घडताना काही प्रश्न पडलेत की भारतीय नागरिकत्वाचा कायदा असं घडू नये असे स्पष्ट निर्देश देतो. मात्र एक असेही लक्षात येतंय की त्या लोकांना तिकडे जगणं अशक्य झालंय. सोबतंच ते कायदेशीर व्हिसावर आलेले आहेत म्हणून आपण त्यांना शोधून परत पाठवू शकू मात्र जे काही कोटीच्या संख्ये बांग्लादेशातून मुस्लीम आले आहेत त्यांना परत पाठवायला आपण काहीच करणार नाही. त्या मुस्लींमांची दुसरी पिढी आज तरूण होतेये.
अश्या वेळी संवैधानिक जवाबदारी अशी आहे की मी हे सर्व वर सरकार दरबारी नोंदवलं पाहीजे मात्र माझं हिंदू मन म्हणतेय की तू मुस्लीम लोकांचा रिपोर्ट दिल्यावर कारवाई झाल्याचे उदाहरण आहे का ? तर नाही! मात्र या हिंदूंना हाकललं जाण्याची दाट शक्यता आहे.
मी माझी घालमेल माझ्या वरिष्ठांना कळवल्यावर ते सहज हसले.... म्हणाले तुम्ही मला रिपोर्ट केलाय म्हणजे तुमची जवाबदारी संपली. आता पुढच्या कार्यक्रमाला जाऊया.. तो तोगडीया काय म्हणतोय ते बघुया...
का कुणास ठावूक पण आज नेहमी प्रमाने वरिष्ठांनी आपण दिलेल्या माहितीला भाव दिला नाही हे बघुन सुध्दा सुखावत होतं.
जंगलात एक बरं असतं की जास्त गुंतागुंत नसते, नागरी जीवणात एकाच वस्तुला बरेच कंगोरे असतात. त्यात जर का गुंता वाढला की मग सोडवताना दमछाक होते. बर्याचदा आधीचे ठराविक छापाचे उत्तरे दिले जातात. मात्र दर वेळी ती उत्तरे समाधानकारक असतीलच असे नाही. असे अनेक प्रसंग समोर येतात. मी प्रत्यक्ष जवाबदार असल्याने वरिष्ठांना नव्हे तर निदान माझ्यासमोर तरी मी उभा असतोच ना !
- नीलकांत