साहित्य: लाल भोपळा, कणीक, तांदूळ पिठी, गूळ, वेलदोडे, हळद, मोहनासाठी व पुर्या तळण्यासाठी तेल.
कृती: पारंपारिक पद्धतीमध्ये लाल भोपळा किसून घेत. त्यात हळद व तेल घालून मिश्रण शिजवून घेत असत.
मी मायक्रोवेव्हचा वापर केल्याने पद्धत थोडी वेगळी आहे.
लाल भोपळ्याची मोठी फोड सालासकट मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडावे.
आता हा भोपळा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये झाकण ठेवून उकडावा.
दोन मिनिटे तसाच ठेवून नंतर भोपळ्याची वरची बाजू खाली करून पुन्हा पाच मिनिटे उकडावा.
कोमट झाल्यानंतर गर चमच्याने काढून घेता येईल. तो गर वाटीने मोजून घ्यावा.
उकडलेल्या भोपळ्याचा गर १ मोठी वाटी झाला.
त्यात एक अष्टमांश चमचा हळद व तेलाचे मोहन दोन मोठे चमचे घातले.
आता हे मिश्रण दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.
बारीक तासलेला एक मोठी वाटी गूळ त्यात मिसळावा.
गूळ विरघळल्यावर त्यात सात आठ वेलदोड्यांची पूड घालावी व एक वाटी तांदूळ पिठीही मिसळावी.
या मिश्रणाचा गोळा तयार होईल इतपत म्हणजे मावेल तेवढी कणीक घालावी.
साधारण दोन ते सव्वादोन मोठ्या वाट्या कणीक लागते. हा गोळा पंधरा मिनिटे झाकून ठेवावा.
तळणी तापत घालावी. तेल तापले की भिजवलेल्या पिठाच्या दोन ते तीन पुर्या जाडसर लाटून तळणीत सोडाव्यात. मध्यम आचेवर खरपूस तळाव्यात. अश्याप्रकारे सर्व पुर्या तळून, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
हा पदार्थ पाच ते सहा दिवस टिकतो.
टिपा: १)मोहनाचे तेल गरम करण्याची गरज नाही.
२)जास्त गोड आवडत असल्यास सव्वा वाटी गूळ घेता येईल.
वरील प्रमाणाने पुर्या बेताच्या गोड होतात.
३)पुर्या देताना बरोबर ताजे लोणी, कैरीचे लोणचे द्यावे.