मिपा अंतर्गत नव्या पुरुष गटाची स्थापना..!!

नमस्कार मंडळी! मिपाची सदस्य संख्या २२००० च्या पुढे गेली आहे आणि आता आपण मायबोली सोडता इतर संस्थळांच्या बरेच पुढे आहोत. यात पुरुष (वास्तव आणि सदृश) आयड्यांची संख्या लक्षणीय आहे. मला वाटते की निदान १२०००-१५००० तरी बरेवाईट अ‍ॅक्टिव्ह पुरुषसदस्य असावेत.

काही पुरुषांशी व्यनिचर्चा करताना असा एक प्रस्ताव पुढे आला की एका मराठी संस्थळावर "गुप्तता" नावाचे एक बंदिस्त दालन फक्त पुरुष सदस्यांसाठी उपलब्ध आहे. मिपावरही तसे दालन सुरू व्हावे या उद्देशाने जनहितार्थ हा प्रस्ताव ठेवत आहे. हल्लीच ३_१३, अल्पा क, आणि इतर काही सदस्यांच्या सतत स्त्रीवादी प्रतिक्रियाना तसेच सानिकास्वप्नील, मृणालिनी, रेवती, खादाड अमिता इत्यादि स्त्रियांच्या रेसिप्यांच्या मार्‍याने भंजाळून गेलेल्या पुरुषांना अशी सोय मिळाली तर हवी आहे. मुख्य बोर्डावर चालणार्‍या संस्कृतिरक्षण अतएव गालिप्रदानविरोधामुळे काही पुरुष लिहायला संकोचतात.

सदैव स्वयंपाक, फॅशन्स, कपडे, स्त्रियांचे कोणतेच प्रॉब्लेम्स आपल्याला कधीच कसे समजणार नाहीत, किंवा आपापल्या स्त्रियांच्या घरच्या तक्रारी, लग्न केल्याच्या घोडचुकीचा पश्चात्ताप या सर्व समस्यांनी पुरुषमंडळी वेंगली आहेत.. त्यांना मुक्त होण्यासाठी एक बंदिस्त व्यासपीठ हवे आहे. पण मुख्य बोर्डावर असे धागे आले तर स्त्रीविरोधी, अश्लील, अनुचित, असभ्य, स्त्रियांना लज्जा वाटेल असे, ताळतंत्र सोडलेले अशा किणकिणत्या शब्दात त्याची टवाळी होते. ठराविक परीघाच्या बाहेर जाणारा प्रत्येक पुरुष दारुडा, बाईबाज, लंपट, संस्कृतिरक्षक मुतव्वा, मॉरल पोलीस, मेल शोवेनिस्ट पिग की काय ते यांपैकी एक किंवा सर्व ठरतो.

हे टाळावे आणि ज्या पुरुषांना स्त्रैण चर्चांमधे रस नसतो पण इतर पुरुष सदस्यांशी तातडीने वेव्हलेंग्थ जुळेल अशा विषयांवर बोलण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी पुरुषदालन चालू करावे अशी रास्त मागणी मांडत आहे.

या दालनाचे नियम पुढीलप्रमाणे असावेत:

-चर्चा - पुरुषसदस्य स्वतःच्या परिचित स्त्रियांविषयी (किंवा त्या स्त्रियांच्या समस्यांविषयी) चर्चा करु शकतील.
-अन्य पुरुषांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या करीअरविषयी अन्य पुरुषांना रस नसल्याने असे करियर करणार्‍या स्त्रियांच्या मुलाखती घेण्याचे काम पुरुष करु शकतील. (या स्त्रिया प्रसिद्ध व्यक्ती असतीलच असे नाही पण मुलाखतीनंतर होतील.)
-सहकार्य - सहानुभूति (कोणत्याही प्रकारची, मग ती विडीकाडीची देवाणघेवाण असो किंवा ड्युटी फ्री मधून येतायेता एक बाटली आणण्याची विनंती असो की पत्नीमुळे आलेली सांसारिक विरक्ती शांतपणे ऐकून घेणं असो... सर्व पुरुषसुलभ कार्यांत एकमेकांचे मदतनीस म्हणून काम करणे इ. असू शकते.

हा ग्रूप फक्त पुरुषांसाठी असला तरी याचे सदस्यत्व फक्त आमंत्रितांसाठी वगैरे बिलकूल नसावे.

केवळ पुरुषांचा ग्रूप आहे इतका डिस्क्लेमर टाकल्यावरच "ई..SSS" म्हणत जेन्युईन स्त्री सदस्या दूर होतीलच. कारण पुरुषांच्या दालनात काही सकारात्मक, उपयुक्त, सोज्वळ चर्चा होऊ शकते यावर त्यांचा जन्मजात विश्वास नसेल.

तरीही पुरुषत्वाचे व्हेरिफिकेशन करायचेच असेल तर इच्छुक सदस्याने कोणत्याही पुरुष संपादकाला व्यनि करुन एक प्रश्नावली मागवावी. त्या प्रश्नांची उत्तरे योग्य रितीने देऊ शकणारी व्यक्ती पुरुष आहे याविषयी संदेह नसावा याची खात्री देता येईल. (प्रश्नावली आवश्यकतेनुसार शेअर केली जाईल.) फोन वगैरेची गरज नाही.

हे आपलं उगाचच.. खरं तर या पुरुषदालनात येण्यासाठी कोणत्याच व्हेरिफिकेशनची गरज नाही ही बाब उघड आहे. दालनात जे काही असेल ते वाचणे आणि पाहणे ही पूर्णपणे आत येणार्‍याची जबाबदारी असल्याने लज्जा, अब्रू इत्यादिचा सारासार विचार करुनच सदस्य आत येतील.

नीलकांत आणि मिपा व्यवस्थापनातील पुरुष संपादक सोडता तर इतर स्त्री संपादकांनाही ह्या विभागाला अ‍ॅक्सेस नसावा.

ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीजना जरुर प्रवेश द्यावा. मजा येईल.

मिपावर इतर वेळी ऑलमोस्ट प्रत्येक धाग्यावर जो दंगा आणि बर्‍याचदा टवाळी चालते तसेच डिट्टो स्वरुप इथे असावे कारण त्याचसाठी हा विभाग सुरु करावयाचा आहे.

विभागाबाहेरची कंपूबाजी इथे ग्राह्य धरली जाणार नाही. इथे नवा कंपू जमवावा लागेल. इथले स्कोअर बाहेर किंवा बाहेरचे इथे सेटल करता येणार नाहीत, किंवा कसेही.

विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर बोलणे शक्यच होणार नाही याची स्त्रीवर्गाला खात्री असेलच्..पुरुषवर्गाचे सर्वकाही आतल्याआतच बोलून होईल.. त्यामुळे बाहेर चर्चागळती होण्याची काळजी नाही.

याबद्दल तुम्हा सर्वांची मते पाहिजे आहेत. आणि मुख्यतः नीलकांत, मिपा अंतर्गत असा एखादा ग्रुप करणे शक्य आहे का हेही बघावे.