साहित्यः
१ मोठे रताळे उकडून, साल काढून, कुस्करून घ्रेणे
दीड वाट्या गव्हाचे पीठ
१/२ वाटी मैदा (ऐच्छिक)
२ टेस्पून साजुक तूप
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून बडीशेप पावडर
१-१/२ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
पाकृ:
मिक्सींग बाऊलमध्ये कणीक, मैदा, लाल तिखट, बडीशेप पावडर, हळद, मीठ, साजुक तुप व कुस्करलेले रताळे घालून एकत्र करा.
चमच्याने थोडे-थोडे पाणी घालून घट्ट कणीक भिजवून घ्या.
भिजवलेल्या कणकेच्या गोळ्यावर ओला रुमाल किंवा किचन पेपर टॉवेल ठेवून १ तास तसेच ठेवून द्या.
आता कणकेचे छोटे छोटे गोळे करुन जाडसर पुर्या लाटून घ्या.
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा.
एक-एक पुरी सोडून त्यावर झार्याने थोडे तेल उडवून घ्या.
पुरी फुगली की उलटवावी. अशा सर्व पुर्या तळून घ्याव्यात.

ह्या पुर्या तुम्ही कुठल्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर किंवा नुसत्या चहाबरोबर सर्व्ह करा.
नोटः
चवीला तिखट-गोड छान लागतात.
तिखटाचे प्रमाण आवडीनुसार व रताळ्याच्या गोडीनुसार वाढवावे.
इथे मिळणारे रताळे बेताचे गोड असते म्हणून दिलेल्या तिखटाचे प्रमाण पुरेसे आहे.
रताळयाच्या गोड पुर्या करायच्या असल्यास रताळे कच्चे किसून साजुक तुपात परतून, वाफवून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे गुळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळावे. त्यात कणीक, किंचित मीठ घालून घट्ट पीठ भिजवावे व पुर्या लाटून तळावे.