मिसळपावचे आरोग्य आणि एवढ्यातील विश्रांतीअवस्था.

नमस्कार,

गेल्या रविवारी मी प्रवासात असताना किसन शिंदेंचा फोन आला की मिसळपाव बंद आहे. मी महत्वाच्या कामात असल्याने लागलीच इन्टरनेटवर येणे शक्य होणार नव्हते. शेवटी प्रशांतला फोन करून काही सूचना देऊन पाहिल्या मात्र तेवढ्याने अडचण दूर झाली नाही. शेवटी काहीतरी गंभीर आहे हे लक्षात आलं. सोमवारी दूपारी मी सर्व्हर चेक केला असता प्रोसेस ओव्हरलोड होताना दिसत होत्या. याचा अर्थ असा की सिस्टीम मेमरी कमी पडतेय.

यावर उपाय दोन आहेत. एक तर सिस्टीम मेमरी वाढवणे आणि दुसरा म्हणजे अशी कुठली प्रोसेस आहे जीला एवढा सिस्टीम रिसोर्स लागतोय ते शोधणे आणि ती गरजेची नसेल तर त्या प्रोसेसचा सिस्टीम युझ ऑप्टीमाईज करने. मात्र आधीच ३६ तास बंद असलेलं मिपा सुरू करण्यासाठी मी सिस्टीम मेमरी वाढवली. त्यामुळे मिपा सुरू तर झालं. मात्र आपण मुळ अडचण सोडवणे तर दूर मात्र शोधलीसुध्दा नव्हती त्यामुळे दोन दिवसांत हा त्रास परत सुरू झाला. शेवटी पुन्हा तेच होत होतं. सिस्टीम रिसोर्स कमी पडून प्रोसेस ओव्हरलोड होत होती आणि सर्व्हर रिस्टार्ट होत होता. कधी मध्येच अडकत होता.

खरं तर मिपासारख्या आणि दोन चार साईट्स सुरळीत चालाव्यात एवढ्या क्षमतेचा आपला क्लाऊड सर्व्हर आहे. मात्र आपला डेटाबेस ऑप्टीमाईझ केलेला नाहीये. आणि आपण ड्रुपलच्या ४.८ पासून दर वेळेस अपग्रेड करतोय. त्यामुळे आज ड्रुपल ७ वर आल्यावर डेटाबेसमध्ये अनेक बदल झालेले आहेत.

साध्या भाषेत बोलायचं झालं तर आपण आपलं सामान एका खोलीत व्यवस्थित रचवून ठेवू शकतो मात्र सामान रचवून ठेवणारा माझ्यासारखा गबाळा असल्यामुळे थोडं सामान या खोलीत तर थोडं सामान त्याखोलीत असा सर्वत्र पसारा आहे. आता हे आवरून एका खोलीत आणण्याचा प्रयत्न आहे. शक्यतो हे मला जमेल असं वाटतं. मात्र नाहीच जमलं तर मी या क्षेत्रातील तज्ञाची मदत घेईल. अश्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. मात्र मला शक्यतो जमेल असं वाटतं. बघुया.

हे सर्व किमाण मिपाच्या संपादकांना ठाऊक असावे असे वाटते. खरं सांगूका , मिपा बंद असल्यावर तुम्हा लोकांना जो त्रास होतो ते बघुन वाईट वाटतं. मात्र एक सांगू इच्छीतो की मी कधीही आळसापोटी मिपाच्या अडचणींकडे दुर्लक्ष करीत नाही. जे शक्य आहे ते पुर्ण करतो. कधी कधी माझी क्षमता उत्तर देते तेव्हा असा विश्रांतीकाळ येतो.

सध्या मिपा सुरळीत चालू आहे आणि मी सुध्दा कायम ऑनलाईन आहे. येत्या काळात मिपाचा डेटाबेस ऑप्टीमाईज करतो. शक्यतो आपल्या सर्व्हरवर वेगळा कॅशिंग सर्व्हर जोडतो (वार्णीश) आणि काय करता येते ते बघतो. एवढा विश्वास ठेवा की मी काळजी करतोय आणि काम सुध्दा.

- नीलकांत