नमस्कार मंडळी! मिपाची सदस्य संख्या २२००० च्या पुढे गेली आहे आणि आता आपण मायबोली सोडता इतर संस्थळांच्या बरेच पुढे आहोत. यात स्त्री सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. मला वाटते की निदान १००-१५० तरी चांगल्या अॅक्टिव्ह स्त्री सदस्या असाव्यात.
लिहित्या व्हा शा कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की मायबोलीवर संयुक्ता नावाचे एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी उपलब्ध आहे. मिपावर तसे दालन सुरू व्हावे. हल्लीच संक्षी, दादा कोंडके आणि इतर काही सदस्यांच्या सतत अश्लील प्रतिक्रियाना कंटाळून गेलेल्या स्त्रियांना अशी सोय मिळाली तर हवी आहे. मुख्य बोर्डावर चालणार्या टवाळक्यांमुळे काही स्त्रिया लिहायला भितात. काही फॅशन्स, कपडे, स्रीयांचे काही खास प्रॉब्लेम, किंवा नुसत्याच घरच्या तक्रारी यासाठी स्त्रियाना एक व्यासपीठ हवे आहे. पण मुख्य बोर्डावर असे धागे आले तर हळदीकुंकू, मंगळागौर अशा शेलक्या श्ब्दात त्याची टवाळी होते. ते टाळावे आणि ज्या स्त्रियांना राजकीय किंवा अन्य पुरुषी चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील
मायबोलीवर या दालनाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
ग्रूपच्या उपक्रमांचे साधारण स्वरुप खालीलप्रमाणे आहे, पण यातही सदस्यांकडून आलेल्या नवीन कल्पनांची भर पडलेली आहे आणि ह्यापुढेही पडेलच.
१. माहिती संकलन (उदा. स्त्री जगतातील महत्वाच्या घडामोडी, आधारगटाची माहिती, वेबसाईट, सेवाभावी संस्था, फायनान्शिअल, कायदेविषयक माहिती, आरोग्यविषयक माहितीचे स्त्रोत इ.)
२. चर्चा - सदस्य स्वतःच्या किंवा परिचितांच्या समस्यांविषयी चर्चा करु शकतील.
३. वेगळ्या क्षेत्रात करीअर करणार्या स्त्रियांच्या मुलाखती. (या स्त्रिया प्रसिद्ध व्यक्ती असतीलच असे नाही.)
४. सहकार्य (कोणत्याही प्रकारचे, मग ते एक गट म्हणून आर्थिक मदत गोळा करुन गरजूंना देणे, स्वयंसेवक म्हणून काम करणे इ. असू शकते.'संयुक्ता' मध्ये चाललेल्या उपक्रमांची थोडक्यात माहिती अधूनमधून सर्वांसाठी देण्याचा विचार आहे. काही उपक्रम वा माहिती, उदा. एखादी मुलाखत, सर्वांसाठीही उपलब्ध करु शकतो. पण बहुतेक वेळेला ही माहिती, उपक्रम सभासदांपुरतेच मर्यादित असतील.
हा ग्रूप फक्त स्त्रियांसाठी असून याचे सदस्यत्व फक्त आमंत्रितांसाठी आहे. सदस्य आमंत्रित करण्याची सध्याची पद्धत पुढे दिल्याप्रमाणे-
१. संयुक्ता परिवारात सामील व्हायचे आहे त्या मायबोलीकर सदस्येने आपली माहिती (आपला मायबोली आयडी, खरे नाव, फोन नंबर, इमेल, राहण्याचे गाव, देश) आणि तिच्या ओळखीच्या किमान २ संयुक्ता सदस्यांच्या मायबोली नावासहित संयुक्ता-अॅडमिन टीमसाठी असलेल्या पुढील इ-मेल आयडीवर पाठवायची आहे. इमेल आयडी sanyukta@maayboli.com.
संयुक्ता प्रतिनिधीशी फोनवर बोलणे झाल्यावर तिला संयुक्ता सदस्यत्व देण्यात येईल.
ज्या इच्छुक स्त्रिया दुसर्या कुठल्याही संयुक्तांना ओळखत नाहीत त्यांनी संयुक्ता ह्या उपक्रमाबद्दल कुठून माहिती मिळाली हे लिहिण्यास हरकत नाही.२. इमेल मिळाल्यावर संयुक्ता अॅडमिन टीमपैकी कुणीतरी किंवा ज्या भागात ती राहते तिथली संयुक्ता-प्रतिनिधी फोनवरुन संपर्क साधून माहितीबद्दल खात्री करेल आणि सदस्यत्व देईल.
३. ज्यांना काही वैयक्तिक कारणास्तव sanyukta@maayboli.com इथे संयुक्ता व्यवस्थापनाशी संपर्क साधणे शक्य नाही त्यांनी व्यवस्थापनातल्या एखाद्या सदस्येशी मायबोली संपर्क सुविधा वापरून संपर्क साधावा.
यासंबंधी प्राथमिक चर्चा काही स्त्री सदस्यांनी केली आहे. त्यात काही मुद्द्दे पुढे आले आहेत. ते असे.
१.जे कोणी ह्याचे व्यवस्थापन सांभाळेल त्यानी अतिशय नि:पक्षपाती असणे आवश्यक आहे. माझी मैत्रिण वा मित्र म्हणून किंवा ही व्यक्ती मला चांगली वाटते म्हणून.. अशा कारणांना थारा देऊन उपयोगी नाही.
२.एक नीलकांत आणि मिपा व्यवस्थापनातील स्त्री संपादक सोडल्या तर इतर पुरुष संपादकांनाही ह्या विभागाला अॅक्सेस नको.
३.ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीज वा इतर कोणी स्त्रीआयडीरुपे असल्या तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अॅक्सेस देऊ नये.
४. मिपावर इतर वेळी ऑलमोस्ट प्रत्येक धाग्यावर जो दंगा आणि बर्याचदा टवाळी चालते तसे स्वरुप इथे असू नये, गंमात, मजा ठीकच आहे पण विषयाच्या अनुरुपतेनुसारही पोस्टी असाव्यात.
५. ह्या विभागाबाहेरची मिपावर इतरत्र काही कंपूबाजी असेल तर ती तिथेच ठवून ह्या विभागात यावे.
६. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.
याबद्दल तुम्हा सर्वांची मते पाहिजे आहेत. आणि मुख्यतः नीलकांत, मिपा अंतर्गत असा एखादा ग्रुप करणे शक्य आहे का हेही बघ. कारण मायबोली आणि मिपा दोन्ही द्रुपलवर असले तरी थीम्स वेगळ्या आहेत. अर्थात मिमराठीवर ग्रुप्सची संकल्पना काही काळ चालवली गेली होती. तेव्हा ते फार कठीण नसावे.