घरात असलेले 'स्वयंपाक' हे सिंधूताई साठे यांचे पाककलेचे पुस्तक माझ्यासाठी महत्वाचे असले तरी त्यातले मेथीगोळ्यांचे सांबार तसे दुर्लक्षितच राहिले होते. फार खटाटोपाची पाककृती वाटल्याने तसे झाले. तीन चार वर्षांपूर्वी भरपूर वेळ हाताशी ठेवून हे सांबार केले आणि ही पाककृती आधी का केली नाही अशी चुटपुट मनाला लागली. वाटले तेवढी वेळखाऊ पाकृ नसल्याने मी येईल त्याला मेथीगोळ्यांचे सांबार करून घालण्याचा सपाटा लावला होता. मिपाकरांसाठी आज ही पाकृ घेऊन आले आहे. आवडल्यास सर्व श्रेय लेखिकेचे.
साहित्य: २ वाट्या धुवून चिरलेली मेथी, तीन मोठे चमचे डाळीचे पीठ (बेसन), एक मोठा चमचा कणीक, एक चमचा गार तेल मोहनासाठी, तिखट, मीठ, हळद असे अगदी कमी पाण्यात भज्याच्या पिठापेक्षा घट्ट भिजवावे.
वाटणासाठी मिक्सरमध्ये आधी एक मोठा चमचा भाजलेली खसखस वाटून घ्यावी. त्यातच अर्धा मध्यम आकाराचा कांदा, इंचभर आलं, लसणीच्या चार मोठ्या पाकळ्या व तिखटपणानुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या असे सगळे वाटून घ्यावे. एक टोमॅटो चिरून घ्यावा. फोडणीचे साहित्य, एक चमचा गोडा मसाला, गूळ, चिंच कोळ, दोन मोठे चमचे दाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तिळाचे भाजून केलेले कूट.
कृती: कढईत तीन मोठे चमचे तेलाची फोडणी करून त्यात वाटण घालून चांगले परतावे. तेल सुटेपर्यंत परतण्याची गरज नाही. त्यात तीन कप पाणी घालावे. पाण्यास उकळी आली की चिंच, गूळ, गोडा मसाला, दाण्याचे व तिळाचे कूट, तिखट, मीठ घालावे. चिरलेला टोमॅटो घालून उकळी येऊ द्यावी. हे सांबार झाले.
आता कढईत वाटीभर तेल गरम करून त्यात वरील भिजवलेल्या पिठाची सुपारीएवढ्या आकाराची भजी तळावीत. सांबारात ही छोटी भजी घालून गरम करावे व लगेच उपयोगात आणावे. जेवणास वेळ असेल तर मात्र वेगवेगळे ठेवावेत. ही भजी सांबारात घातल्यावर मोठी होतात त्यामुळे करतानाच ती लहान करावीत. अतिशय चविष्ट असे सांबार भात किंवा पोळी दोन्हीबरोबर चांगले लागते.
टीप: मेथीला मिठामुळे पाणी सुटते हे लक्षात असू द्यावे व लागेल तसे वरून पाणी शिंपडत पीठ भिजवावे.