सिंधी कोकी

नमस्कार मिपाकर्स :)

आपल्या मिपावर मी बर्‍याच पाककृती दिल्या, दरवेळेस तुम्ही माझ्या पाककृतींचे, त्यांच्या फोटोंचे कौतुक केले, उत्स्फुर्त प्रतिसाद दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद :)

मिपामुळे बर्‍याच मित्र-मैत्रीणींशी ओळख झाली,त्यांनी ही पदार्थ आणखीन चांगला कसा होईल असे वेळो-वेळी मार्गदर्शन केले.

मिपा खूप जवळचा असा मित्रपरीवार आहे आणी म्हणूनच ह्या नव्या वर्षात तुम्हा सर्वांसाठी जेव्हा-जेव्हा जमेल तेव्हा-तेव्हा पाकृची चित्रफीत देण्याचा माझा विचार आहे आणी आज त्याचा शुभारंभ मी करत आहे. तुम्ही मला सांभाळून घ्याल व माझ्या पाककृती गोड मानून घ्याल अशी आशा करते. (काही सुधारणा असतील नक्की कळवा बरं का )

चला तर मग पाकृकडे वळूया :)

साहित्यः

२-१/२ वाट्या कणीक
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
पाव वाटी बारीक चिरलेली कोथींबीर
पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात (ऐच्छिक)
१ टीस्पून जीरे
२ टेस्पून तेल
मीठ चवीनुसार
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून अनारदाना पावडर (नाही मिळाल्यास आमचूर पावडर वापरु शकता)

पाकृ:

एका भांड्यात कणीक घेऊन त्यात मीठ, अनारदाना पावडर, लाल तिखट, जीरे, हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथींबीर, चिरलेली कांद्याची पात व तेल घालून सगळे एकत्र करा.
लागेल तसे पाणी घालून कणीक भिजवून घ्या व ५-१० मिनिटे तिंबवून ठेवा.
कणकेचे सारखे ७-८ गोळे करुन घ्या.
सुक्या पिठात कणकेचा गोळा घोळवून हलक्या हाताने कोकी जाडसर लाटा.
नॉन-स्टीक तवा तापवून कोकी एक मिनिटासाठी दोन्ही बाजूने हलकी भाजून घ्या.
कोकी तव्यावरून उतरवून त्याचा पुन्हा गोळा करा. (हात सांभाळून)
गोळ्याला पुन्हा हलक्या हाताने लाटा व मंद आचेवर तव्यावर टाकून भाजा.
वरुन थोडे तेल लावून एक बाजू चांगली खरपुस भाजा.
उलटवून दुसरी बाजू ही तेल लावून भाजून घ्या.
गरमा-गरम कोकी तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस व पापडासोबत सर्व्ह करा.

.

नोटः

कोकी तुम्ही पराठ्याप्रमाणे लाटून तव्यावर शेकून घेऊ शकता पण वरील पद्धतीने बनविल्यास कोकी खुसखुशीत होते.
जर पराठ्याप्रमाणे बनवणार असाल तर तव्यावर कोकी घालताच काट्याने टोचे मारा, कोकी फुगु द्यायची नाही.
तेला ऐवजी तुम्ही तुपाचा वापर ही करु शकता.