नमस्कार मंडळी,
मिपावरचा हा माझा पहिलाच लेख आहे. आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल. युरोपमधे माझी चालु असलेली भटकंती यावर आधारीत हा लेख आहे. मागील वर्षी आम्ही केलेल्या क्राकोच्या सफरीचे थोडक्यात वर्णन लिहित आहे.
दिवस पहिला :
ख्रिसमस आणि युरोपचे एक वेगळेच नाते आहे आणि ते अनुभवायचे असेल तर युरोपमधील कोणत्याही शहराला त्या दरम्यान भेट देणे हे आलेच!! तर अशीच मागील वर्षी ख्रिसमसच्या आठवड्यात मी, सपत्नीक व मित्रपरिवारा बरोबर Central Europe मधील Poland ह्या देशात, ७व्या शतकात वसलेल्या Krakow या अतीशय टुमदार शहराला भेट द्यायचे ठरवले.

* Bratislava - Krakow रोड ट्रिप
Bratislava या Slovakia च्या राजधानी पासुन ७ तास कारने प्रवास करुन Krakow ला पोहोचलो. होस्टेलचे बुकिंग आधीच केले असल्यामुळे गाडी थेट होस्टेल जवळच उभी केली. बाहेर तापमान साधारण -७ degree celcius एवढे होते. नजर जाईल तिथ पर्यंत बर्फ पसरला होता आणि वरुन पावसाची रिपरिप चालुच होती. एकदाचे होस्टेलमधे चेक-इन केले, सामान खोलित ठेवले आणि मग क्राकोच्या मेन सेंटर मध्येच फेरफटका मारायचे ठरले.
पाषाणयुगापासुन अस्तिवात असलेले आणि ७व्या शतकात वसलेले हे युरोप मधील एक ऐतिहासिक शहर आहे. त्यात आपल्या शहरांचे जुनेपण टिकवुन ठेवणे यात युरोपियन लोकांचा खासच हातखंडा आहे., त्यामुळे शहरात फिरताना आपण भुतकाळात कधी पोचलो हे समजतच नाही. आमचे होस्टेल, क्राकोच्या "Ryneck glowny" (रायनेक ग्लाउनी) अर्थात मेन मार्केट स्क्वेएर पासुन जवळच असल्याने, बाहेर पडताच आम्ही थेट स्क्वेएर मधे पोचलो.

* मेन स्क्वेएर - डाव्या बाजुला सेंट मेरीज कॅथिड्रल आणि त्या समोरील ख्रिसमस मार्केट
क्राकोचा हा स्क्वेएर १५व्या शतका पर्यंत युरोप मधला सर्वात मोठा स्क्वेएर मानला जायचा. या एकाच स्क्वेएरमधे एकिकडे सेंट मेरीज चर्च, मधे टाउन हॉल आणि बाजुला सर्वत्र ख्रिसमस मार्केट थाटले गेले होते. त्याच्या मधोमध होता लाईट्स आणि ग्लिटरने सजवलेला उंच ख्रिसमस ट्री.
St.Merry's Basilca अर्थात सेंट मेरीज चर्च हे लाल दगडात बनवलेले १४व्या शतकातील चर्च आहे. युरोपमधील इतर cathedral's इतके भव्य नसले तरी ह्या चर्चचे ऐतिहासीक महत्व आहे आणि एक गंमत अशी की, ह्या चर्चच्या मनोर्यावरुन दर तासाला trumpet वाजवले जाते. परंतु त्याचे सुर पुर्ण केले जात नाहीत (थोडक्यात एखाद्या टेप वर चालु असणारे गाणे मधेच बंद केल्या सारखे). ह्याचे कारण असे की कोणे एकेकाळी क्राकोवर शत्रुने चाल केली होती आणि ते सैन्य ह्या चर्च वरच्या trumpet वादकाने बघितले आणि लोकांना सावध करण्यासाठी ह्या पठ्ठ्या जोरजोरात trumpet वाजवु लागला. त्याचे सुर ऐकुन क्राकोवासी आणि त्यांचे सैनिक सतर्क झाले व त्यांनी शहराचे रक्षण केले. पण ह्या सगळ्या भानगडीत शत्रुने मात्र ह्या trumpet वादकाचा तीराने खात्मा केला. त्यामुळे त्याच्या प्रित्यर्थ अशी हि trumpet वादनाची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.
चर्च आतुन साधारणच होते. चर्चच्या आत फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे, कॅमेरा म्यान करुन ठेवला होता. चर्च मधुन निघुन मग पुढे पेटपुजे साठी आम्हि भारतीय होटेल कडे वाटचाल केली. होटेल मधे ऐन भुकेच्या वेळी पोचल्याने बिर्याणी, पनीर, चिकन कढाई, रोटी ह्यावर यथेच्छ ताव मारुन आम्ही गाव भटकंतीला पुन्हा सुरवात केली.
आमच्या ग्रुपमधे २ बायका असल्याने आमची वारी थेट वळली ती shopping mall कडे. १४व्या शतकातुन थेट २१व्या शतकात प्रवेश झाल्या सारखे वाटले. मॉल मध्ये नेहमीची शॉपिंग झाली आणि आम्ही परत होस्टेल मध्ये पोचलो ते दुसर्या दिवशी लवकर उठुन भटकंतीला निघायचे या विचारानेच.

* शॉपिंग मॉल मधे
दिवस दुसरा :
सकाळी ९ च्या सुमारास Wawal castle वर पोचलो. हा castle, wawal नावाच्या टेकडीवर बांधलेला असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. हा किल्ला जरी ११व्या शतकातला असला, तरी इथे अगदी ५०,००० वर्षापुर्वीपासुन वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत आणि ज्याचे जतन ह्या किल्ल्यात केलेले आहे. त्यातल्याच एका दंतकथे नुसार, ह्या टेकडीवरील रहिवाश्यांचे एक dragon संरक्षण करत असे. त्या dragonची आठवण म्हणुन, आता ह्या टेकडी खाली dragonची प्रतिकृती बनवली आहे.

* Wawal castle

* ड्रॅगन
किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य मोहक होते. समोर वाहणारी विस्तुला नदी, त्या पलीकडे न्यु क्राको शहर आणि सर्वत्र पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि बर्फ म्हणजे स्नो फाईट हि आलीच!! मग एकमेकांना बर्फाचे गोळे मारत, आमचा किल्ला बघुन झाला. आता आम्ही पुढे निघालो ते क्राकोचे main attraction असलेले - "Auschwitz-Birkenau" (आउश्वित्स-बर्कनाव) अर्थात दुसर्या महायुद्धातील Death camp.

* किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य

* स्नो फाईट
क्रमशः