काल चुकून काही फोटो जनातले मनातले मधे टाकले. काही लोकांनी अपेक्षेने तो धागा उघडल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल. त्यांची क्षमा मागतो. माझ्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकराला ते उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा आहे. संपादकांना तो धागा येथे हलावायची विनंती केली आहे. श्रेष्ठ, जेष्ठ व मुरलेल्या मिपाकारांची परवानगी न घेता हा धागा भटकंती येथे टाकायचे धाडस करत आहे कारण कलादालन बरेच दिवस बंद आहे. त्याबद्दल मालक क्षमा करतील अशी आशा आहे. अर्थात त्यांनीही दटावल्यास असे धाडस पुन्हा होणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी.....
मी फेसबूकवरही फोटो टाकतो व येथेही टाकतो ( माझ्या दृष्टीने चांगले) . त्यात फरक कसा करावा हे कळत नाही. जेष्ठ, श्रेष्ठांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. ( क्रुपया फेसबूक वर फोटो टाकणे आणि येथे टाकणे यातील फरकाबद्दलच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे हे लक्षात घेणे).
परवा भिगवणला गेलो होतो तेथे काढलेले काही पक्षांचे फोटो आहेत. खाली पक्षाची माहीतीही दिली आहे.
पुण्यापासून सोलापुरच्या रस्त्यावर ९० किमि. अंतरावर डाव्या बाजुला वळून परत उजवीकडे वळून साखरकारखान्याच्या रस्त्याला जावे. (पाटी आहे) तेथे उजनीच्या बॅक वॉटरमधे हे परदेशी पाहूणे आलेले आहेत. तेथील मासेमारी करणारे आपल्याला बोटीतून घेऊन जाऊन आपल्याला पक्षी दर्शन घडवतात. पक्षांवरचे पुस्तक जरूर घेऊन जाणे. नावाड्याबरोबर घासाघीस करावी.
सकाळी साधारणतः ५ वाजता निघावे म्हणजे पक्षी बघून झाल्यावर भुलेश्वरही बघता येईल.
चमच्या../ स्पूनबिल.......
याची चोच चमच्यासारखी असते म्हणून हे नाव पडले असावे. आपल्या येथे हे पक्षी युरोप किंवा रशियाच्या काही आशियाच्या भागातून येतात. दलदलीतील किडे हे यांचे मुख्य अन्न असते व घरटी बरीच मोठी असतात. उडताना हा पक्षी फार भव्य दिसतो.

टीट (ग्रेट इंडियन टीट)
चिमणीच्या आकाराचा हा पक्षी दिसायला अत्यंत देखणा आहे. झाडाच्या टोकावर हा कधी येत नाही. खालच्या फांद्यावर सतत वावर असल्यामुळे फोटो काढायला तसा अवघड. कडक वस्तू खायची आवड.

Northern Shoveler (Anas clypeata)
बदक एवढे वेगाने उडते हे मला माहीत नव्हते.

काळ्या पंखाचा स्टिल्ट
काटकुळ्या पायाचा हा पक्षी आपले पाण्यातील प्रतिबींब पहात असतो. खरे तर तो भक्ष शोधत असतो. स्तब्ध पाण्यावर याचा वावर जास्त.

ब्राउन हेडेड गल....याला असे का म्हणतात माहीत नाही. मला तर याच्या डोक्यावर तसा काही रंग दिसला नाही. पण पक्षांचे रंग व त्याच्या छटा हळुहळु बदलत जातात..कदाचित त्याच्या डोक्याचा रंग बदलायचा असेल.... एकदम गुटगुटीत..

यांच्या चोचीतील आतील भाग लाल भडक असतो व यांना सारखे तोंड उघडायची सवय असते. जणू ते सारखी जांभई देतात त्यावेळी जो लाल रंग पसरतो त्याची मजा औरच...

'कॉमन रेडशँक' (Tringa totanus).........पण संध्याकाळच्या प्रकाशात मला यांचे शांतपणे उडणे मोठे गुढरम्य वाटले.

पेंटेड स्टॉर्क......मला हा पक्षी रोहीत पक्षापेक्षा जास्त आवडतो कारण याचे शरीर अक्षरशः रंगविल्यासारखे दिसते. याच्या माने पर्यंत असलेली पिसे जणू काहे त्याने स्वतःला कशात तरी लपेटून घेतलए आहे असे वाटते.

व शेवटी रोहीत...उडायच्या तयारीत.........

आशा आहे माझा हा फोटोचा धागा आपण सहन कराल.......
जयंत कुलकर्णी.

