चावडीत धागा काढण्यास कारण की एक प्रश्न मला बराच काळ पडलेला आहे आणि त्याची चर्चा करायला संपादक मंडळ हीच योग्य जागा आहे.
जगभरात पसरलेले सदस्य हा मिपाचा खास अॅडव्हांटेज आहे. इतर चर्चामाध्यमांपेक्षा ऑनलाईन माध्यमांना असलेला हा वेगळा पैलू आहे. अमेरिकेच्या विविध भागात, नॉर्वेमधे, रशियात, अगदी अनवट देशांमधेही आपले मेंबर आहेत. बर्फाळ प्रदेशापासून आफ्रिकेतल्या वाईल्डलाईफने भरलेल्या विषुववृत्तीय देशांमधेही.
आपापल्या परिसराविषयी लिहीणारे काही धागे माझ्या वाचनात येत असतात. पूर्वी नॉर्वे भ्रमंतीवर आलेली एक मालिका, खोबारविषयी बिकांची सुंदर लेखमाला, रिओ दि जानेरो शहराजवळच्या एका शिखराला सर करण्याविषयीचा अप्रतिम फोटोयुक्त धागा, फार पूर्वी टारझनने लिहिलेले आफ्रिकेविषयीचे लेख आणि अशी आणखी काही उदाहरणं.
पण एकूण लिखाणाच्या तुलनेत आणि परदेशस्थ सदस्यांच्या मोठ्या संख्येच्या तुलनेत अशा लेखांची संख्या नगण्य आहे. हल्ली तर हे प्रमाण फारच कमी झालंय. जे थोडेफार धागे आहेत ते पर्यटन, म्हणजे टूरचं वर्णन इतके मर्यादित आहेत. पण आपल्या रोजच्या आयुष्यातले अनुभव (त्या त्या देशाची प्रतिमा दाखवणारे), तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली शहरं, तिकडची पोलिटिकल बॅकग्राऊंड (मधे अमेरिकेविषयी असं लिखाण आलं होतं बहुधा), सांस्कृतेक फरक आणि अशाच खूप इतर गोष्टी त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग असूनही लिहील्या जात नाहीत.
सर्व देशातल्या लोकांना इतर सर्व देशांची इनसाईट मिळण्याचा हा सुंदर मार्ग हवा तितका वापरला जात नाही.
यामागे बहुधा परदेशी असणं याचा उल्लेख टाळण्याची वृत्ती असावी असं मला वाटतं आहे ते बरोबर असेल का.? आणि याचं मुख्य कारण बहुधा परदेशात असण्याच्या उल्लेखाला एतद्देशीय लोकांकडून "झायरात", "वा.. अमेरिकेत असता का?" ," तिकडे राहून भारताची चिंता करु नका" किंवा तत्सम कुत्सित / खोचक प्रतिक्रिया येणं कारणीभूत आहे का?
परदेशात जाऊन पोचलेल्या माणसाने अन्य कोण मिपाकर इथे आहेत, किंवा इथे सेटल होण्याविषयी टिप्स मिळाव्या म्हणून काढलेल्या धाग्यांना योग्य प्रतिसाद मिळतो का? की परदेशात असण्याविषयी तिरकस उल्लेख मिळतात?
यामागे कुठेतरी परदेशात गेलेल्यांच्या समृद्धीविषयी न्यूनगंड असू शकतो का? अशा वेळी परदेशातल्या लोकांनी आपलं परदेशात असणं अंडरप्ले करण्यामागे अन्य काही कारणं असू शकतात का?
संपादक म्हणून आपण ही भौगोलिक बाजू उजळवून खूप विविधता आणू शकतो का?
माझा विचार बेसलेस आहे आणि योग्य प्रमाणात असं लेखन येतं आहे, असं आहे का?