दीपावलीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

मिपाकर मंडळी,

नमस्कार!

सकाळची हवीहवीशी थंडी मनाला गुदगुल्या करायला लागलीये; सकाळचा लखलखता सूर्य मऊगरम किरणे फेकून थंडीची लज्जत वाढवतोय; सकाळची प्रसन्न आणि तजेलदार हवा मनाला एक निराळीच उभारी देतेय. हेच ते दिवाळीचे सुखद दिवस. एक नवी प्रसन्न ऊर्जा सगळ्यांना भरभरून मिळावी म्हणूनच दिवाळीसारख्या सणाचे आयोजन करण्यात आले असावे.

दिवाळी म्हणजे चांगला ४-५ दिवसांचा भरगच्च सण! वसुबारस, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, नर्कचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा ५-६ दिवसांची दिवाळी हा एक आनंदसोहळाच असतो. सगळ्यांनी एकत्र यावे; खावे-प्यावे; खूप गप्पा माराव्यात; नेहमीच्या धावपळीच्या दिवसांमधून थोडी उसंत घेऊन थोडा विसावा घ्यावा; मस्त फिरून यावे आणि हा निवांतपणा पुढे वर्षभर पुरवावा...ही कल्पनाच किती भन्नाट आहे!

दिवाळी अंक, फराळाच्या ताटांची होणारी देवाण-घेवाण, अंगणातल्या रांगोळ्या, सड्याचा सुगंध, उटण्याचा सुवास, फटाक्यांचा उग्र दर्प, सगळ्यांच्या चेहर्‍यावर फुललेले हास्य आणि मनमुक्त गप्पा! दिवाळी खरंच सगळ्यांना अधिकाधिक जवळ आणते. दिवाळी एक नुसताच सण नाही तर दिवाळी म्हणजे घरातली प्रेमळ आई वाटते. आपापल्या घरी आतुरतेने आपली वाट पाहणारी, आपल्यासाठी घर लख्ख करून ठेवणारी, आपल्यासाठी गरम-गरम चकल्या तळून देणारी, आपण घरात प्रवेश केल्यानंतर जगातलं सगळ्यात सुंदर आणि अकृत्रिम स्मित देणारी, डोळ्याच्या कडांमधून बाहेर येऊ पाहणारे पाणी रोखून धरतांनाच डोळ्यातच आनंदाचे भुईनळे उडवणारी...आईच करते ना हे सगळं आपल्या लेकरांसाठी? मग दिवाळी आईसारखीच वाटली तर आश्चर्य नको वाटायला.

सकाळी सकाळी आपल्या गावात रस्त्यावरून घरी जातांना दिसते ते आपले बालपण; आपली मुळे, आपली जीवनाची बाराखडी जिथून सुरु झाली ती शाळा, ज्यांनी निरपेक्ष माया दिली ती माणसे...काहीशी थकलेली, म्हातारी झालेली तरी पण चेहर्‍यावरचे नितळ भाव तसेच! मग घर दिसतं. ते नुसतं घर नसतं, ते आई असतं, शिक्षक असतं, आजी आणि आजोबा देखील असतं. त्याच घराच्या अंगाखांद्यावर खेळून आपण मोठे झालेलो असतो. घर तिथंच असतं! आपण पोहोचल्यावर आपल्याकडे बघून हसतं. अगदी हात हातात घेऊन फेर धरायला लागतं आपल्या कटू-गोड आठवणींभोवती! मग आपणही एक थुईथुई उडणारे कारंजे होऊन जातो अगदी!

दिवाळी अशी आठवणींचा पट उलगडून बसते आपल्यासमोर! त्या तिथे मी अभ्यास करायचो; तिथे जेवायला बसायचो; या अश्वासक देवघरासमोर मी 'शुभंकरोति..' म्हणायचो; इथून शाळेत जायचो; जातांना वडाच्या भल्यामोठ्या झाडासमोरच्या वाड्यात हमखास नजर जायची; कधी कधी ती उभी असायची. आता देखील आहे का ती उभी? नाही! आता वड ही नाही आणि ती पण नाही. रस्त्यात मित्रांसोबत हुंदडतांना दिवस कसा डोंगराआड जायचा कळायचं नाही.

दिवाळी अशी एक मित्र म्हणून अलगद येते; आठवणींचा चित्रपट दाखवते. मन पिसासारखं होऊन जातं; डोलत-डोलत उडत कुठे कुठे बसतं. दिवाळीच्या दिव्यांसारखंच मन शांत तेवत राहतं. उजेड कुठे पडतो माहित नाही पण आतून शांत वाटतं हे खरं.

हा शांतपणा, हलकेपणा आयुष्यभर टिकवता आला तर? हा अप्रतिम आनंद अगदी नेहमीकरता लुटता आला तर? स्मरणरंजन तसे थोडे वाईटच पण मनाचा तजेला टिकवून ठेवता येत असेलच की!

समस्त मिपाकरांना दीपावलीच्या खूप मनापासून शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, आनंदाची, आणि समाधानाची जाओ ही सदिच्छा! धन्यवाद!

समीर