साहित्य कोफ्त्यांसाठी:
१ वाटी उकडलेले मक्याचे दाणे
१ वाटी किसलेले पनीर
२-३ ब्रेड स्लाईस कडा कापून घेणे (व्हाईट ब्रेड चांगला लागतो ह्या कोफ्त्यांसाठी)
१/२ टीस्पून जीरे
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/४ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
३-४ टेस्पून मैदा (तांदळाचे पिठ, ब्रेडक्रम्ब्स ही वापरू शकता)

कृती:
ब्रेड स्लाईस पाण्यात बुडवून, घट्ट पिळून घेणे.
त्यात उकडलेले मक्याचे दाणे व पनीर (थोडे बाजूला काढून बाकी सगळे घेणे), जीरे, मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथींबीर, गरम-मसाला घालून एकत्र करावे.
तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवून कोरड्या मैदामध्ये घोळवून घेणे व डीप फ्राय करावे.
मी कमीत-कमी तेलात तळायचे म्हणून इथे आप्पेपात्राचा वापर केला आहे.
आप्पेपात्राच्या प्रत्येक गोलात तेल गरम करून कोफ्ते तळून घ्यावे व टिश्यु पेपरवर काढणे.

साहित्य ग्रेव्हीसाठी:
१ जूडी पालक स्वच्छ करून, धुवून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे घालून ठेवावा व लगेच काढून गार पाण्यात घालावा.
गार झाला की त्याची मिक्सरवर प्युरी करून घ्यावी.
२ टोमॅटोंची प्युरी
१ कांदा बारीक चिरलेला
थोडेसे उकडलेले मक्याचे दाणे
थोडेसे किसलेले पनीर
दीड टेस्पून आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
२ टेस्पून बटर किंवा तेल

कृती:
पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करून जीर्याची फोडणी करून घ्यावी.
त्यात आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावी.
मग त्यात चिरलेला कांदा घालावा व मऊसर होईपर्यंत परतावा.
त्यात टोमॅटोंची प्युरी,उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, धणेपूड, गरम-मसाला घालून तेलसुटेपर्यंत परतावे.
त्यात पालकाची प्युरी घालावी व आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्हीला उकळी काढावी.
ग्रेव्ही चांगली उकळली की गॅस थोडा बारीक करुन ३-४ मिनिटे शिजु द्यावी.

सर्व्हींग डिशमध्ये ग्रेव्ही काढून घ्यावी व त्यावर तयार कोफ्ते घालावे.
किसलेल्या पनीरने सजवावे व लगेच गरमा-गरम पोळ्या, फुलक्यांबरोबर खायला द्यावे.

नोटः
कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालून एखादी उकळी काढून लगेच सर्व्ह करता ही येईल फक्त कोफ्ते फुटणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
जर का कोफ्ते बनवायचे नसल्यास नुसते उकडलेले मक्याचे दाणे घालून वरील पद्धतीने मकई-पालक बनवता येते.