कोलाज!

1.
कधी तरी दुपारी हे चक्र सुरू झालं. एका अप्लीकेशनच्या चाचणीसाठी काही वाद्यधून हवी होती. ती शोधण्यासाठी काही सुरावटी ऐकत होतो. तेव्हाच बहुदा हे डोक्यात शिरलं असावं.
---

गाणं निवांतपणी ऐकायचं नसतं. मन भरगच्च असतानाच गाणं ऐकावं. ते निवांतपणा देतं.

बहुदा गाण्याचा आस्वाद मेंदूच्या एका विवक्षीत भागातून होत असावा. आणि तो भाग नेहमीच गाण्यासाठीच असावा (ही अपेक्षा नाही. ही व्यवस्था आहे, अशा अर्थानं हे वाक्य). कायम आसुसलेला.

त्या भागाचे बंध इतर भागांशी असावेत. तो भाग गाणं ऐकत जातो तसा इतरांवर प्रभाव टाकत जातो आणि तिथंही निवांतपणा येतो.
---

आत्ता या क्षणी मी हे सांगतोय, तेव्हा इतर कुणाशी काही बोलू शकणार नाही; पण त्याच तन्मयतेनं गाणं मात्र ऐकू शकतो. किंवा गाणं ऐकताना निवांतपणे हे सांगू शकतोय.

ही गाण्याची करामत असावी. मघापासून लिहायचं म्हटलं तरी काही व्यक्त होतच नव्हतं. आता ही जी गत ऐकतो आहे, बासरी आणि संतूरची, ती मेंदूला, किंवा मनाला, इतकी जागं करते आहे की, बास्स!

तिला आंदोलनं आहेत. वलयं आहेत. तसंच विचारचक्र चाललंय.

मग हे शब्द बाहेर येतात.

आणि विशेष म्हणजे हे जे लिहितोय तेच मनात आहे. मन दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही, किंवा मनात दुसरं काहीही नाही.

अद्वैत.

दुसरा कसलाही विचार नाही.

जे लिहितोय तेच फक्त.

ही गत कशी चालली आहे?

विस्तीर्ण मैदानावर आपण उभे आहोत. एक छानशी नागीण संथ गतीनं मैदान कापत निघाली आहे.

आपल्या दृष्टीचा पल्लाही लांबवरचा आहे. खूप लांबचा.

तितकं अंतर ती नागीण कापतीये ते आपल्याला दिसतंय.

शांतपणे. सळसळ नाही, काही नाही.

फक्त तिच्या अंगाची ती बाकदार वळणं.

संथ गतीतली.

डोळे मिटले तर हेच दिसेल. किंवा... आणखी एक दिसेल. पहाडावर उभे रहा. समोरून वळणं घेत जाणारी नदी.

संथ नदी.

नागीण म्हटलं की थोडं नकोसं वाटू शकतं. तर नदी.

नदी की नागीण याला महत्त्व नाही.

त्या वळणांना, त्या लयीला, त्या गतीला महत्त्व.

आणि त्याच्या दोहो बाजूंना महत्त्व.

ती गती अनुभवावी. ती अशी लिहिता येत नाही. रुपकं तरी कसली देणार! तो शब्दातीत अनुभव असतो.

तोच घेतला, घेतोय.
---

काही तरी ललित लिहावं असं वाटलं होतं. पण सुचेनाच. वैतागून मी अल्बम लावला. 'द व्हॅली रिकॉल्स'. ऐकत बसलो. पहिल्या पाचही धून तशाच ऐकल्या. शेवटची गत ऐकताना काही झालं आणि जे झालं ते लिहित सुटलो. तेच हे वर लिहिलं ते. ते लिहिताना दुसरं काही मनात नव्हतं अशी वेगळी एकात्मता. कशी आली, माहिती नाही. कशाला माहिती करून घ्यायची!

आता मला तो आरंभीचा साक्षात्कार कळला आहे.

"गाणं निवांतपणी ऐकायचं नसतं. मन भरगच्च असतानाच गाणं ऐकावं. ते निवांतपणा देतं.

बहुदा गाण्याचा आस्वाद मेंदूच्या एका विवक्षीत भागातून होत असावा. आणि तो भाग नेहमीच गाण्यासाठीच असावा (ही अपेक्षा नाही. ही व्यवस्था आहे, अशा अर्थानं हे वाक्य). कायम आसुसलेला.

त्या भागाचे बंध इतर भागांशी असावेत. तो भाग गाणं ऐकत जातो तसा इतरांवर प्रभाव टाकत जातो आणि तिथंही निवांतपणा येतो."

हे कळलं, त्याचं सूत्र होईल का?

हा माणसाचा पराभव असतो साला. जे अनुभवलं तेच, तसंच हुकूमी अनुभवता यावं याचा सोस. मग त्याचं सूत्र करण्याचा खटाटोप सुरू.

आत्ता या क्षणी मी वेगळंच काही तरी ऐकतोय.

मला सांगीतिक भाषेत लिहिता येत नाही हे बरं आहे! नाही तर मी 'सारेगमप'च्या भाषेत लिहित बसेन. त्यातून नुसते सूर कळायचे. सूर मनात-अंगात भिनायचे कधी?

आत्ता जे ऐकतोय, त्यात मघाची गती नाही. ही वेगळी धून. आरंभीची आलापी आहे. आलाप अजून आकारलेला नाही. त्यामुळं तो तसा समोर येत नाहीये.

ठिपक्यांची रांगोळी काढायला आपण सुरवात करतो तेव्हा आधी फक्त ठिपके मांडतो. तसे हे ठिपके दिसताहेत. पण गंमत म्हणजे, हे ठिपकेच मला तो माणसाचा पराभव दाखवताहेत.

ठिपके मी मनातल्या मनात जोडले की आकार येतोय, पण एरवी तिथं खरं तर फक्त ठिपकेच आहेत.

दृष्यांकन करण्याची क्षमता कामी येते, पण वास्तवात ते दृष्य अद्याप उभं नाहीये.

मी एक हुकूमत निर्माण करण्याचा खटाटोप करू लागलो होतो. तेव्हा, त्या ठिपक्यातून, त्यांचा अंगभूत कसलाही आकार 'असूनही' समोर नसल्याने, मला तो पराभव दिसू लागला.

शरणागत.

प्लेयरकडं माझं लक्ष गेलं. राग भूपाली.

शब्दांमध्ये आपण सूत्रं बांधतो का? निदान मनोव्यापारात तरी नक्कीच. भूपाली... म्हणजे सकाळचा प्रहर ना! ही तर मध्यरात्र. तरी त्या भूपालीच्या आलापी रूपरेखात्मतेतून मला सूत्रबद्धतेच्या मानवी अट्टहासाचा पराभव दिसतो! पराभवच.

मघाचा राग कोणता माहिती नाही, तेव्हाची गती आत्ता नाही, वळणंही नाहीत. ठिपके मांडत जाणं आहे फक्त. ठिपके...

आता त्या ठिपक्यांना जोडण्याचं काम सुरू झालं आहे. बासरी. स्पष्ट अगदी. पार्श्वभूमीवर काही शेवटच्या ओळीतले ठिपके संतूर. मग दोघंही गती घेतील... हो पुढं जोड आहे. प्लेयर तसं दाखवतोय...
---

एका कोपऱ्यात मेंदूत कुठं तरी हा व्यापार सुरू झालाय.

ठिपक्यांची रांगोळी. आधी फक्त ठिपके, ओळींत मांडून ठेवायचे. फक्त त्या ठिपक्यातून आकार गवसतो. मग ते ठिपके जोडत जायचं... आकार भरीव होत जातो. सजीव!

दीर्घ काळानंतर हे अनुभवलं. थोडं संदिग्ध, थोडं स्पष्ट...

तुमचाही मेंदू प्रवास करतो का एखाद्या मैदानातून? करत असावा! नाही तर ही वळणं, ही गती, ही लय कुठं भेटायची?
---

2.

भाषा म्हणजे काय, हा प्रश्न गणेश देवींना कधीही विचारू नये. म्हणजे, विचारायचा असेल तर आपल्याकडे किमान दोनेक तासांची निश्चिंती असली तरच विचारावा. 'आपल्याकडे' याला महत्त्व. अशा प्रश्नावर कदाचित त्यांचे दोनेक तास देण्यास गणेश देवी तयार असतील. आपल्याकडे तेवढी निश्चिंती आणि तेवढा दमसास नसेल तर हा प्रश्न त्यांना विचारू नये. परवा मी त्यांचं मनोगत ऐकलं.

भाषा म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर देण्यास देवी सुरवात करतात तेव्हा ते कित्येक कोटी वर्षं मागे गेलेले असतात. म्हणजे, आज 'आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वाचा जन्म झाला' तो क्षण ते आज अखेरपर्यंतचा कालखंड असा हा प्रवास असतो. प्रवासाचे टप्पे असतात. तसे इथेही टप्पे असतात. सूर्यमाला घडणे, त्यातील सजीवांचे स्थान म्हणून पृथ्वी घडणे, पृथ्वीवरील तशी सजीवसृष्टी घडणे हे टप्पे. तिथून अर्थातच माणसाचा जन्म. पाठीचा कणा घेऊन माणूस दोन पायांवर उभा राहू लागला आणि त्याचे हात मोकळे झाले, त्यातून दगडाचा माणसाने हत्यार म्हणून प्रथम वापर केला हा एक मैलाचा दगड असणारा टप्पा. तिथून भाषेच्या जन्माकडे अलगद येताना मध्येच पाश्चात्य (प्रामुख्याने ग्रीक) विचारविश्व आणि भारतीय (किंवा खरे तर पौर्वात्य) विचारविश्व यांची नाळ गवसलेली असते. ग्रीक विचारविश्वात तारे म्हणजे प्रकाश टाकणारे झरोके आहेत, आणि त्याचप्रमाणे अंधार फेकणारेही झरोके आहेत (म्हणजे होते). या प्रकाश-अंधाराच्या खेळात सावली नामक एक प्रकार असतो तो ग्रीक विचारविश्वात दुश्चिन्ह, भयचिन्ह मानला जायचा. तर, हे ग्रीक विचारविश्व बहिर्मुखी आहे.

पौर्वात्य विचारविश्वात सावली दुश्चिन्ह किंवा भयचिन्ह नाही. तिथं सावलीतही काही असतं असं मानलं गेलं आहे.

गणेश देवी हे सांगत शून्याकडं येतात. शून्य हे पौर्वात्य विचारविश्वात 'शून्य' नसतं, तर त्यात सारं काही असतं (आता हे सांगता सांगता ते आपल्या नोकरशाहीवर एक मिश्कील टिप्पणी नेहमीच्याच सुरात करताना म्हणतात की, आपल्याकडचं शुन्याचं हे तत्वज्ञान म्हणजेच 'माणूस हजर नसला तरी हजर आहे' असं मानणं असतं...). तर या सावलीचं, किंवा आपल्या पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचं अस्तित्त्व सांगण्यासाठी ती गोष्ट सांगणं यासाठी उच्चार आला. उच्चारातून भाषा जन्माला आली... गणेश देवी सांगत असतात. (मी इथं हे त्रोटक मांडलं. ते त्यांच्याच तोंडून ऐकलं पाहिजे... म्हणून दोनेक तासांची निश्चिंती हवी).

तर मग, भाषा म्हणजे काय? भाषेचं मूळ संगीतात आहे. संगीत आणि भाषा यातलं आधी काय? अजून तरी त्याचं निश्चित उत्तर सापडलेलं नाही. ते कधीतरी गवसेल माणसाला, असं ते सांगतात. तितकी वैज्ञानिकता त्यांच्याकडे आहे. हे संगीत कोणतं? तर माणसानं हे पारिसरिक व्यक्त करण्यासाठी केलेले, काढलेले, ऐकलेले आवाजच. ती भाषा, अशी काही मांडणी ते करत असतात. मग त्याच ओघात वाचा ही इतर प्राणीविश्वापेक्षा माणसाला वाढीव देणगी आहे, असं माणसाला वाटतं... असं ते सांगतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी त्या भाषेचीच पंचाईत केली असते. एकाच वाक्यात दोनदा 'माणसाला' हा शब्द ते उगाच योजत नाहीत. त्यात बोलण्याचे दोन सूर असतात. त्या सुरावरून दुसऱ्यांदा आलेला 'माणसाला' हा शब्द आपल्याला वेगळा कळतोच कळतो...

कदाचित, भाषा म्हणजे संगीत हे असंही असावं...
---

3.

'उत्तररात्र' हा रॉय किणीकरांचा काव्यसंग्रह (खरं तर, त्याच्या पोटात 'रात्र'ही आहे). किणीकरांच्या या सगळ्या कविता म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. मला हे दोन कवी फारसे न वाचूनही डोकं फिरवणारे वाटले आहेत - बोरकर आणि किणीकर. किणीकरांचं वैशिष्ट्य - कविता गूढ वाटतात, कळतातही, कळल्यासारख्या तर निश्चितच वाटतात... त्यातून थोडं पुढं गेलं की कळतं 'निसटलं काही तरी...' आपण परत मागे कवितेकडे जातो. ती अधिकच गूढ वाटते. तर ते वाटो. त्यांचंच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या कविता चार ओळींच्याच आहेत. चारोळ्या नव्हेत.

घे शब्दकोश, ई - ईश्वर शोधुनी काढ
तो आत्मा दडला कुठल्या शब्दाआड
अर्थाला असते बंधन का शब्दांचे
कोसळून पडले इमले अक्षरतेचे

हे का आठवलं? मघाचा सूत्रबद्धतेच्या आग्रहाचा पराभव, मग 'माणसाला' या शब्दावरून झालेल्या करामतीतून दिसलेली वळणं, आणि आता अक्षरतेचे इमले कोसळून पडणं. या तिन्हीमध्ये एक लय आहे. नातंही आहे. बरं, पुन्हा अक्षरतेवरच किणीकर थांबतात का? नाही. त्यांनी शब्दच चॅलेंज केला आहे. शब्द म्हणजे, माझ्या मते, शब्दाची सुप्रीमसी. अर्थाचं सूत्र म्हणजे शब्दच ना? शब्दाला ते आव्हान देतात कारण त्यांना आत्मा 'पहायचा' आहे. त्यासाठी ते ईश्वराचं प्रमाण आधी तपासून पाहताहेत. तिथं शब्दकोश संपतो बहुदा. निदान, माझ्या मते, किणीकरांनी तो या ओळीत संपवला आहे.

आणखी एक. केवळ मुद्याच्या बळकटीसाठी.

हे स्वरूप चिन्मय देहापुरते नसते
हे स्वरूप चिन्मय देह जाळता उरते
देहात वितळते कणकण स्वरूप जेव्हा
ना सरते उरते स्वरूप चिन्मय तेव्हा

मला अधिक लिहिता येणार नाही. कारण या चार ओळींत मी तो मघा लिहिलेला गूढ, कळलेला, न कळलेला, निसटलेला अनुभव घेतो. नेहमीच. मला ही कविता कोणाकडून उकलून घेता येईलही. पण गरज नाही.

ना सरते उरते स्वरूप चिन्मय तेव्हा... एवढेच पुरे आहे! पूर्ण आहे. त्यात कशाची भर टाकली तरी ते पूर्णच असेल. त्यातून काही काढून घेतले तरी पूर्णच उरेल...
---

4.

"गणपतीच्या आकारात / रूपात असं काय आहे की अनेक कलावंतांना तो आवाहन करतो? या एकाच form मधे इतकं वैविध्य (material and form) आणि इतकी सर्जकता आणि कशी काय आणि का होते?" असा प्रश्न पडला होता (किंवा आहे) फेसबुकवर. आनंद थत्ते यांचा.

गजू तायडे यांच्या त्यावर दोन पोस्ट आहेत.

"गणपती देव वगैरे बाजूला ठेवलं तरी नुसतं त्याच्या दृष्य रूपाबद्दल बोलायचं झालं तर तो एक आगळा-वेगळा फॉर्म आहे. त्यात एकाच वेळी सौष्ठव, मार्दव, लालित्य आणि सौंदर्य आहे. किंवा द. ग. गोडश्यांना स्मरून सांगायचं तर त्याचं सौष्ठव हेच त्याचं सौंदर्य आहे. दुसरा असाच एक फॉर्म म्हणजे नंदी... सौष्ठवपूर्ण सौंदर्य!" त्यापु़ढं एका पोस्टमध्ये तायडे लिहितात, "गणपती कुणीही - अगदी चित्रकार नसलेल्या व्यक्तीने - चितारला तरी त्याचा मारुती होत नाही."

तायडे यांनी जे लिहिलं तेच थोड्या अधिक सकारात्मक शब्दांतून माझ्या एका मैत्रिणीनं लिहिलं. आपण अश्रद्ध आहोत, असं तिचं म्हणणं आहे (कदाचित ती तिची डोळस श्रद्धा असावी - म्हणू तसं...). निदान, सोपस्कार, पूजाअर्चा यात श्रद्धा नाही हे तरी नक्की. घरच्या गणपतीची सजावट झाली. त्यात तिचा सहभाग होता. तिनं लिहिलं, "मखर खूप सुंदर झालंय. खरं सांगायचं तर रात्री ते मखर खूपसं हंपीच्या देवळांसारखंच दिसत होतं. सुंदर; पण भकास, निर्जीव."

दुसऱ्या दिवशी काही झालं. काय वाटलं तिला?

"... मी हॉलमध्ये निवांत बसले होते दहा मिनिटं, आणि सहज मखराकडे नजर गेली, आज मला ते मखर एकदम जिवंत आणि चैतन्यमय वाटत होतं. कोणीतरी जीव फुंकला का त्यात? ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसणार्‍या मला असं का वाटावं? मग थोडा विचार केला, काल ते मखर रिकामं होतं, ती स्पेस गणपतीच्या सुबक मूर्तीने भरून काढली म्हणून, असं वाटलं असावं मला."

'सुबक' हा शब्द ओघवताच आलेला आहे या कथनात. रिकामं मखर भकास वाटत होतं, भरलेलं मखर सजीव वाटलं. सुबक मूर्तीनं पोकळी भरून काढली म्हणून? सौष्ठवपूर्ण सौंदर्यानं तिथं नेमकं काय केलं? आपल्या नजरेत रुतून बसलेल्या गोष्टीसारखी गोष्ट दिसल्याचा तो परिणाम आहे, असं म्हणता येतं.

फॉर्म? सूत्रबद्धता? की, मुळात वि-लक्षण रूप-स्वरूप असूनही त्यात माणसानं शोधलेल्या, आणि त्याच्या नजरेत रुतलेल्या, सूत्राचं यश?
---

5.

अलीकडेच वसंत पळशीकरांचं थोडं लेखन नव्या संदर्भात पुन्हा वाचण्याची संधी आली. अजून ते चालू आहे. वाचता-वाचता चर्चाही सुरू असते दोघा-तिघांशी. तर त्या दिवशी असंच बोलत असताना मी एकदम म्हणालो, जगण्यासाठी, जगणं सुकर करण्यासाठी, त्यातील प्रश्न कमीतकमी करून जगण्यासाठी आयडियॉलॉजीची गरजच काय?

अर्थात, उत्तर 'नाही' असंच आलं.

मी काही हे वेगळं आणि नवं सांगत नव्हतोच. खुद्द ज्यांच्यासंदर्भात बोलताना हे झालं, त्या पळशीकरांनी वेगळं काही सांगितलेलं मला तरी आठवत नाही. ते असो.

चर्चा पुढं सरकली, पळशीकरांना डावे आणि उजवे अशा दोघांनीही बाजूलाच सारलेलं आहे, असा मुद्दा आला. एकूण मराठीतील विचारविश्वात 'गाजणारी' नावं पाहिली तर त्यात पळशीकर नसतात, असं चित्र निदान आजच्या काळात तरी आहे, हे ध्यानी घेता तो मुद्दा वाजवीच आहे. तसं घडलेलंही असावं.

पळशीकरांनी एके ठिकाणी लिहिलंय -

"जगातील सर्व घडामोडींचे, विशेषतः मानवी व्यवहारांचे सर्वस्वी इहलौकिक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नांमधून उत्पन्न झालेली (ही) समाजशास्त्रीय जाण व दॄष्टी पायाखालची वाळू सरकती ठेवणारी आहे, कायम अस्थिरता उत्पन्न करणारी आहे. जगाचे नियंत्रण व संचालन करणारी पारलौकिक शक्ती आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे, वा असा ज्यांचा 'साक्षात्कार' आहे त्यांची बैठक, ती श्रद्धा वा 'साक्षात्कार' टिकून असेपर्यंत अढळ राहते, राहू शकते. कारण या जगन्नियंत्या व जगच्चालक शक्तीकडून अमुक एक विचार व आचारप्रणाली प्राप्त झालेली आहे, ही धारणा त्या श्रद्धेचा वा साक्षात्कारी ज्ञानाचाच एक भाग असते. अशा शक्तीचे अस्तित्व नाकारणार्‍यांना ते स्वतःपुढे ठेवीत असलेल्या विचारप्रणालीविषयी देखील सापेक्षतावादी भूमिका मान्य करण्यावाचून गत्यंतर उरत नाही."

आता असं लिहिणाऱ्या पळशीकरांना 'उजवे' कसे स्वीकारतील, हा प्रश्न एकांना पडला.

पळशीकरांनी मार्क्सचं विश्लेषण करताना मार्क्सचं सौंदर्य दाखवतच एका लेखात त्याच्या मर्यादा इतक्या सडेतोड उभ्या केल्या आहेत की 'डावे' त्यांना नाकारणारच.

जे पळशीकरांचं, तेच गणेश देवींचं होतंय, असं मी परवा म्हणालो; पण देवी असोत वा पळशीकर, असं का व्हावं?
'मध्ये' काही आहे, असं नसतं का? पेच आहे, खरं तर.

विविध वादांच्या (थेअरी या अर्थाने) चौकटीतून जगरहाटीकडं पाहून तिच्यातील प्रश्नांची मांडणी करायची आणि त्या चौकटीतूनच उत्तरं सांगायचा प्रयत्न करायचा आणि मग मानवी व्यवहाराची व्यामिश्रता त्यात सामावली न गेल्याने जी फसगत होते, ती निस्तारण्यासाठी नवी वाद-चौकट निर्माण करण्याचा खटाटोप करायचा अशी ही किनाऱ्यावरची स्थिती. प्रवाह तर 'मध्ये'च आहे.

किनाऱ्यावरून प्रवाह दिसतो खरा; पण खोली कळेलच असे नाही, हे कळले पाहिजे.
---

6.

तर्क करायचा की नाही? विपश्यना करायला गेलो होतो. (सत्यनारायण गोयंका यांच्या पद्धतीच्या) विपश्यनेत आधी हे सांगितलं जातं की, तर्क करायचा नाही. "सांगितलं जातं ते करायचं".

विपश्यना करताना तर्कवितर्क-कुतर्क जागे नव्हते का? होते. तरीही, मी एकदम विपश्यना हा भंपकपणा आहे असं ठरवू शकलो नाही. कारण एका मर्यादेनंतर (माझ्या) तर्कबुद्धीला काही प्रश्नांची उत्तरं मिळेनाशी झाली.

मी विपश्यनेला पूजा 'केलं' नाही, की विपश्यनेचा 'दगड'ही ठरवला नाही. आपली-आपली मर्यादा स्वीकारलेली बरी.
पण हा प्रश्न येतोच. तर्क करायचा की नाही?

तर्कानुसारचाच एक पेच आहे.

आरंभीच्या तुकड्यात मी लिहिलं, भूपाली हा सकाळच्या प्रहाराचा राग, मी मध्यरात्री ऐकत असूनही माझ्या चित्तवृत्तींवर प्रभाव पडला आणि तो सकारात्मक होता. तर्कबुद्धी म्हणते, म्हणजे काय झालं सांग? मला सांगता येत नाही. टँजिबली दाखवता येत नाही इतकं तर नक्कीच. ते असो. प्रश्न वेगळाच आहे.

रागाचे सूर आणि काल यांचं नातं खरोखर आहे का? म्हणजे सुरांमध्ये अंगभूत असं काही आहे का की ज्याचं नातं दिवसाच्या प्रहरांशी असावं? या प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर 'नाही' असं येतं. पण तेही पूर्ण पटत नाही. या उत्तरानुसार हा काही तरी स्मृतींशी संबंधित मामला असतो. स्मृतींशी संबंधित मामला म्हणजे सकाळी काही ऐकलेल्या गोष्टींशी सुरांचं नातं. पण हे नातं त्या गोष्टींमुळं अंगभूत होतं की सुरांच्या रचनेमुळं? गोष्टी बदलल्या आणि सूर तेच राहिले तरी अनुभवाची जातकुळी तीच असेल तर नातं सुरांमुळं अंगभूत होत असावं. पण मग स्मृतींचा संबंध संपतो आणि तर्क हरतो.

भूपाली या सकाळच्याच प्रहराशी नातं सांगणाऱ्या रागात मी काही स्तोत्रं वगैरे ऐकली आहेत असं स्मृती सांगतात आणि म्हणून तसंच काही ऐकलं की सकाळच्या प्रहराशी जोडलं जातं असं काही होतं का? तर्कानुसार, हो. पण स्तोत्र आणि विरहाची व्याकुळता यात फरक असतो. 'भैरवी'तून ती व्याकुळताही व्यक्त होते. तिचं काय करायचं? हे सापेक्ष आहे, अर्थातच. त्यामुळं, आपण मूर्ख आहोत, असं म्हणून हा प्रश्नांचा धांडोळा थांबवलेला बरा.
---

7.

अॅबसेन्स ऑफ प्रूफ इज प्रूफ ऑफ अॅबसेन्स, असं म्हणतात. मानायचं की नाही हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून. अर्थातच मी मानत नाही. असले निर्णायक काही मला झेपत नाही.

कदाचित, यामुळंच, शास्त्रोक्तदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही याचा अर्थ ते 'नाही', असा होत नाही, असं आपण मानलं पाहिजे. म्हणजेच, ती गोष्ट 'नाही' यापेक्षा 'सिद्ध झालेली नाही' किंवा 'अ-सिद्ध आहे' असं म्हणता यावं. पण अॅबसेन्स ऑफ प्रूफ इज प्रूफ ऑफ अॅबसेन्स असा एक नियम मांडला की हा असा विचार करण्याची संधी किंवा अवकाशही संपून जातो.

साचा, सूत्र (फॉर्म, फॉर्म्यूला) यातच सारं आहे, असं एक गृहितक मांडायचं आणि मग त्यात सारं काही बसवायचा प्रयत्न करायचा असं करत जाणारेही नंतर हरतात, असं होत असावं. फक्त ते मान्य करणं अवघड जात असावं. पण हेही एक निर्णायक विधान होतंय. म्हणूनच, तीही एक शक्यता आहे असं म्हटलं पाहिजे.

मग, साचा, सूत्र याच्यापलीकडे जाता यावं का? कोणी गेलं तर ते सिद्ध होत नसल्याने 'तसं नाहीच' असं म्हणून ते निकालात काढायचं की, तशीही एक शक्यता आहे असं मानायचं?

काही नास्तिक असे आहे की ते आस्तिकता निकालात काढतात. पण काही नास्तिक असेही मानतात की आस्तिकता हीही एक वेगळी जीवनपद्धती आहे. या मोकळीकीला आवाहन केलं पाहिजे सातत्यानं.

एरवी, 'बंदीवान' तर असतोच माणूस.

साचा आणि सूत्र याच्या आग्रहातूनच सारं काही समजलं पाहिजे, असा एक आग्रहही जन्माला येत असावा.
आपल्या भोवतीच्या साऱ्यावर प्रभुत्त्व असावं असं वाटत असावं. त्यावर हुकुमी सार्वभौमत्त्व हवं असं वाटत असावं.

'समजलं' आणि 'समजलं नाही' यांच्या मध्ये काही असतंच. 'मध्ये' काही आहे, हे स्वीकारण्यासाठी 'समजलंच पाहिजे'चा आग्रह सोडावा लागतो बहुदा.

पण, आग्रह सोडण्याच्या आग्रहाचं काय? तो सुटला की माणसं 'योगी' होत असावीत.

प्रश्नांची उत्तरं तूर्त सापडणार नाहीत हे नक्की.