...आणि सामर्थ्याचा स्वर, माझिया गा व्यंजनाला

पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचण्याच्या खोडीचे - म्हणजे ब्लर्बवरचा मजकूर, प्रकाशनवर्ष, लेखकाचे चार शब्द, अर्पणपत्रिका, आवृत्त्यांची संख्या आणि दोन लगतच्या आवृत्तींमधली वर्षं इत्यादींपासून वाचनाला सुरुवात करण्याच्या सवयीचे - काही अनपेक्षित फायदे कधी कधी पदरात पडतात. 'रायटिंग, नॉट द रायटर' हे सूत्र मान्य करूनही 'आज उदाहरणार्थ पंचविशीचा' असणार्‍या पांडुरंग सांगवीकराबद्दल लिहिताना नेमाडेही त्यांच्या पंचविशीत होते ही बाब किंवा 'द इडियट'च्या अर्पणपत्रिकेत दस्तायेवस्कीने आपल्या दगावलेल्या कन्येबद्दल व्यक्त केलेला मूक शोक - हे त्या त्या पुस्तकवाचनाच्या अनुभवापासून वेगळे काढता येत नाहीत.

कधी कधी मात्र पुस्तकाशी थेट संबंध नसणारी रोचक बाब नजरेसमोर येते. ओरहान पामुक ह्या नोबेल पारितोषिकविजेत्या तुर्की लेखकाचे 'माय नेम इज रेड' हे पुस्तक जेव्हा असंच अथपासून वाचायला सुरुवात केली; तेव्हा त्या पुस्तकाच्या मूळ तुर्की नावाने - Benim Adım Kırmızı - लक्ष वेधून घेतलं. किरमिजी हा मराठी शब्द तुर्की भाषेत सापडेल अशी अपेक्षाच नव्हती. अरेबिक व/वा फारसीचा हा दोन्ही भाषांवरील सामायिक प्रभाव असावा, अशी अटकळ मनाशी बांधून पुढे गेलो.

या वर्षी तुर्कस्थानात जायचा योग आला, तेव्हा असे अनेक परिचित शब्द सापडले. हवा, साहिल, हयात, एवला (evliya = अवलिया), जानम, हैसियत, तोप, सराई, कदर, जेप (जेब), शल्गम, मक्ता, शिकायत, मशहूर, जान, फतेह, मुराद, तरफ, आरजू, शहर, देहलीज, किमया (= रसायन), आईना, गुल, जमात, तर्जुमा असे कितीतरी.

Turkey_May2012 038
'दिक्कत'चा अर्थ 'सावधान, लक्ष असू द्या'. हा अर्थ हिंदीपेक्षा मराठी दिक्कतला (बिन-दिक्कत) अधिक जवळचा. स्वयंपाकघराला समानार्थी शब्द mutfak हाही मुदपाक(खाना) म्हणून हिंदीपेक्षा मराठीत अधिक रुजलेला.

Turkey_May2012_Day2_PS 495
इथे मुहब्बत म्हणजे जिव्हाळा. प्रेमासाठी 'अश्क' हा शब्द रूढ आहे. (तुर्कीच्याच भाषाकुटुंबात असणार्‍या तुर्कमेनीस्थानची राजधानी 'अश्काबाद' अर्थात प्रेमनगर हे नाव मिरवते).

. . .

शब्दांची ही देवाण-घेवाण जरी बव्हंशी दोन्ही दिशांनी होत असली, तरी नीट निरखून पाहिलं तर त्यातही एक विशिष्ट घटनाक्रम ध्यानी येतो. जेते आपली संस्कृती जितांवर कायमच लादत आलेले आहेत. बर्‍याचदा प्रत्यक्ष सत्तेपेक्षाही जेत्यांच्या संस्कृतीच्या 'सॉफ्ट पॉवर' पकडीतून निसटणं अधिक अवघड असतं.

इतिहासात याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात. १०६६ मध्ये नॉर्मन आणि फ्रेंचांनी इंग्लंडवर आपलं राज्य प्रस्थापित केल्यानंतर फ्रेंच ही तिथली राजभाषा झाली. अनेक फ्रेंच शब्दांचा जुन्या इंग्लिशमध्ये शिरकाव झाला. थेट चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ही स्थिती कायम होती. पुढे वारसाहक्क आणि इतर कारणांमुळे शंभराहून अधिक वर्षं ह्या दोन देशांत लढाया चालू राहिल्या. परिणामी राष्ट्रीय अस्मितांनी पुन्हा उचल खाल्ली आणि इंग्लंडमधला फ्रेंचचा प्रभाव ओसरला. याच काळात, लॅटिन आणि फ्रेंचच्या प्रभावातून बाहेर पडून तत्कालीन लोकभाषा असणार्‍या मिडल इंग्लिशमध्ये 'कँटरबरी टेल्स'सारखी साहित्यकृती रचणारा चॉसर म्हणूनच इंग्रजी साहित्याचा जनक म्हणून ओळखला जातो.

बरोबर साडेचारशे वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती युरोपच्या दुसर्‍या टोकाला झाली. इ.स. १३६२ साली इंग्लिश संसदेने न्यायनिवाड्याचे काम फ्रेंचऐवजी इंग्रजीत होईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (स्टॅच्युट ऑफ प्लिडिंग), तर १८१२ मध्ये नेपोलियनच्या फसलेल्या रशियन मोहीमेने फ्रेंचचा रशियन उमराव वर्गावरील प्रभाव संपुष्टात आणला. 'वॉर अँड पीस' ह्या जगड्व्याळ पुस्तकात टॉलस्टॉयने हे भाषिक बदल बारकाईने टिपले आहेत.

आजच्या घडीला अर्थातच इंग्रजीने फ्रेंचची जागा घेतली आहे. निव्वळ शब्दच नव्हे, तर इंग्रजी वाक्यरचनेतल्या लकबीही अनेक भाषांत जशाच्या तशा स्वीकारल्या जात आहेत (अँग्लिसिझम). 'माझी मदत/मदद कर' सारखी उदाहरणे मराठीतही दिसतात. अर्थात खुद्द ब्रिटिशांनाही त्यांच्या देशात रूढ होऊ लागलेले अमेरिकनिझम्स आता भेडसावू लागले आहेत, हा भाग निराळा.

. . .

युरोप आणि आशिया खंडांना जोडणार्‍या तुर्कस्थानच्या भाषेत आणि संस्कृतीत अर्थातच ही भाषिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण स्पष्टपणे दिसून येते. शिवाय तुर्की भाषेत सध्या प्रचलित असलेला शब्द मूळचा कुठल्या भाषेतला यावरूनही त्याच्या तुर्की-प्रवेश-काळाबद्दल काही आडाखे बांधता येतात. एका अर्थी, खिलाफत आणि ऑटोमन साम्राज्याच्या उदयाचे, प्रगतीचे आणि अस्ताचे प्रतिबिंब भाषेतही उमटले आहे, असं म्हणायला हरकत नसावी.

पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या 'किरमिजी' शब्दाची व्युत्पत्ती आणि प्रवास मोठा रोचक आहे. याचे मूळ संस्कृतात. एका विशिष्ट प्रकारच्या कीटकांपासून लाल रंगाची ही गहिरी छटा मिळवत असत म्हणून प्रचलित झालेल्या संस्कृत कृमि-ज (कीटकांपासून जन्मलेला/मिळवलेला)चे अरेबिकमध्ये किरमिझ (qirmiz) झाले. बहुतेक आठव्या शतकानंतर मूर आक्रमकांबरोबर हा शब्द स्पेनमध्ये पोचला (carmesí) आणि यथावकाश इंग्रजीत Crimson म्हणून स्थिरावला.

Crimson_Etymology

वर म्हटल्याप्रमाणे, किरमिजी शब्दाचा भारत --> अरबस्थान --> युरोप हा प्रवास तत्कालीन आर्थिक आणि राजकीय सत्तेची उतरंड यांच्यात परस्परसंबंध पाहण्यासाठी थोडी इतिहासाची उजळणी करणे योग्य ठरेल. प्रेषित मोहम्मदाच्या काळात आणि त्यानंतर ज्या वेगाने इस्लामी सत्तेचा युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशिया खंडांत विस्तार झाला तो अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत - म्हणजे मोहम्मदाच्या मृत्यूनंतर जेमतेम शंभर वर्षांच्या आत - उमय्याद खिलाफतीत स्पेनपासून सिंधपर्यंतच्या विशाल भूभागाचा समावेश होत होता. पुढे तेराव्या शतकात तातार टोळ्यांनी इस्लाम अंगीकारल्यावर रशिया आणि पूर्व युरोपाचा मोठा भाग मुस्लिम अंमलाखाली आला.

भारतात आणि चीनमध्ये लागलेले अनेक शोध अरबांमार्फतच अजूनही बव्हंशी मध्ययुगात चाचपडत असलेल्या युरोपात पोचले. कागद तयार करण्याचे तंत्र आणि लाकडी ठोकळे वापरून छपाई करण्याची पद्धत चीनमधून आणि दशमान पद्धती व आकडे भारतातून; अरबस्थानमार्गे युरोपात पोचले. (अजूनही पाश्चात्य परिभाषेत त्यांना 'अरेबिक न्यूमरल्स' हीच संज्ञा आहे) याशिवाय आफ्रिकेतून होणारा गुलामांचा व्यापार ('स्वाहिली' हा शब्द मूळ अरेबिक सवाहिल = किनार्‍याजवळ राहणारे लोक - वरून आला आहे. उर्दूत तोच 'साहिल' होऊन येतो), आशिया व युरोप खंडाशी होणारा मसाले, रेशीम आणि कॉफीचा व्यापारही त्यांच्याच ताब्यात होता.

परिणामी फारसी, तुर्की आणि भारतीय भाषांत अरेबिक शब्द आढळणे साहजिकच आहे. आयबेरियन द्वीपकल्पावर (स्पेन आणि पोर्तुगलचा एकत्रित भूभाग) इ.स. ७११ ते १४९२ इतकी प्रदीर्घ काळ अरबांची सत्ता असल्याने निव्वळ स्पॅनिश भाषेवरच नव्हे; तर तत्कालीन स्थापत्य, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरही मूर संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. 'किरमिजी' शब्दाचा प्रवास हे त्याचंच एक प्रतीकात्मक उदाहरण.

. . .

मंगोल टोळ्यांचे आक्रमण, अंतर्गत दुफळी, नाविक सामर्थ्याकडे केलेले दुर्लक्ष, दस्तऐवजीकरण आणि परदेशात दूतावास राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे केलेला कानाडोळा, शेजारच्या संस्कृतींकडून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची न दाखवलेली मनोवृत्ती, कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे पश्चिम युरोपाकडे वळलेल्या ग्रीक विद्वान, कलाकार आणि वैज्ञानिकांनी रचलेला रेनेसान्सचा पाया, स्पेन आणि पूर्व युरोपातील नागरिकांनी केलेले यशस्वी उठाव - या आणि इतर अनेक कारणांनी ऑटोमन आणि खिलाफत साम्राज्यांची पीछेहाट होऊ लागली. वास्को द गामाने भारताकडे यायचा शोधलेला समुद्रमार्ग; अमेरिकेच्या शोधामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे युरोपियन देशांसाठी खुले झालेले मोठे भांडार या कारणांचीही त्यात भर पडली.

सतराव्या शतकात एकापाठोपाठ अनेक पराभव स्वीकारावे लागलेल्या तुर्कांनी पुन्हा एकदा व्हिएन्नावर आक्रमणाचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याची परिणती दारूण पराभवात झाली. व्हिएन्ना राहिलेच, पण दीडशे वर्षं ताब्यात असणार्‍या हंगेरीवरही त्यांना पाणी सोडावे लागले. याच सुमारास इंग्लंड आणि फ्रान्स तर सोडाच, पण नेदरलँड्स आणि बेल्जियमसारख्या लहान राष्ट्रांनीही व्यापाराच्या नावाखाली आशियात आणि आफ्रिकेत आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. प्रत्यक्ष रणांगणातील पराभवापेक्षा ही आर्थिक आणि राजकीय पीछेहाट इस्लामी सत्तांच्या अस्ताचे प्रमुख कारण ठरले.

. . .

भाषेचा - पर्यायाने शब्दांचा - एखाद्या समाजाच्या प्रगती आणि अवनतीशी असलेला जवळचा संबंध या पडत्या काळातही दिसून येतो. शब्दांचा आणि नवीन कल्पनांच्या प्रवाहाची दिशा बदलून आता पश्चिमेकडून पूर्वेकडे झाली. १७८९ मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा या बदलातला एक मोठा टप्पा. त्यातून पुढे आलेल्या संकल्पनांचा 'तरूण तुर्कांच्या' चळवळीने मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. तोच वारसा पुढे नेत केमाल अतातुर्क पाशाने तुर्कस्थानला आधुनिक युगात आणण्यासाठी जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले.

'अतातुर्कचे आधुनिक तुर्कस्थानाच्या जडणघडणीतले योगदान' हा फार मोठा विषय आहे. पण निव्वळ भाषिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुर्की भाषेची अरेबिकवर आधारित असणारी रूढ लिपी रद्दबातल करून त्याने त्याऐवजी लॅटिन लिपी आणली. भाषेतली अरेबिक आणि फारसी शब्दांची सरमिसळ कमी केली आणि ज्या संकल्पनांना तुर्कीत प्रचलित शब्दच नव्हते, त्या शब्दांसाठी फ्रेंचचा आश्रय घेतला. भारतीय भाषांप्रमाणेच तुर्की भाषेतही उच्चारानुसारी लेखन होत असल्याने फ्रेंच शब्दांची आयात करताना त्यांचे स्पेलिंग उच्चाराप्रमाणेच होईल याची दक्षता घेण्यात आली. वानगीदाखल सांगायचं तर चॅम्पियन ह्या शब्दाचा फ्रेंच उच्चार 'शॉम्पियाँ'च्या जवळ जाणारा होत असल्याने तुर्कीत त्याचे स्पेलिंग şampiyon (ş = उच्चारी 'श') असे केले गेले.

Day3_Istanbul_Ankara 104

'पार्लमेंट'सारख्या शब्दांची फ्रेंचमधून तुर्की आणि अरेबिकमध्ये (अरेबिकमध्ये 'प' नसल्याने या शब्दाचा उच्चार 'बर्लमान' असा होतो) आयात हे 'किरमिजी' शब्दाच्या प्रवासाच्या विरूद्ध दिशेने झालेल्या सांस्कृतिक बदलाचे ढोबळ उदाहरण झाले.

सकृद्दर्शनी स्वतंत्र वाटणारा पण अशाच आयात केलेल्या अनुवादाच्या प्रकाराला इंग्रजीत कॅल्क (Calque) अशी संज्ञा आहे. यात शब्द परभाषेतून जसाच्या तसा न आणता; तो शब्द ज्या मूळ धातूपासून वा शब्दापासून उगम पावला आहे त्या स्रोताचाच अनुवाद केला जातो.

उदा. इंग्रजीतल्या electricity ह्या शब्दाचे मूळ 'अ‍ॅम्बरपासून बनलेला' या अर्थाच्या ग्रीक शब्दात आहे. (ग्रीकमध्ये elektron म्हणजे अ‍ॅम्बर). अरेबिकमध्ये electricity हा शब्द जसाच्या तसा न जाता अ‍ॅम्बर --> अ‍ॅम्बरपासून बनलेला अशा आडवाटेने गेला आहे (كهرباء - कॅहरबा). प्रशासन, क्रांती, राष्ट्र (देश नव्हे) अशा अनेक संकल्पनांसाठीचे प्रतिशब्द अशाच मार्गाने अरेबिक व तुर्की भाषेत आले आहेत.[१] काही शतकांपूर्वीचा अरेबिकचा स्पॅनिश आणि पर्यायाने इतर युरोपियन भाषांवर पडलेला प्रभाव लक्षात घेता, अलीकडचा हा विरोधाभास लक्षणीय आहे.

. . .

तीन खंडांत पसरलेले वैभवशाली साम्राज्य; पहिल्या महायुद्धात फाळणीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेले, 'द सिक मॅन ऑफ युरोप' म्हणून हिणवले गेलेले राष्ट्र; केमाल अतातुर्कच्या दूरदृष्टी आणि धाडसी बदलांमुळे मुस्लिम बहुसंख्य असूनही एक निधर्मी देश म्हणून केलेली वाटचाल आणि गेल्या दशकात धार्मिकदृष्ट्या उजवीकडे झुकणार्‍या नेतृत्वाखाली केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे आलेला आत्मविश्वास अशा तुर्कस्थानच्या निरनिराळ्या 'चक्रनेमिक्रमेण' अवस्थांचे प्रतिबिंब काही प्रमाणात तुर्की भाषेतही पडलेले दिसून येते. त्यातल्या दोन परस्परविरोधी प्रवाहांचा छोटेखानी मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

. . .

संदर्भ -

[१] व्हॉट वेन्ट राँग?: द क्लॅश बिटवीन इस्लाम अँड मॉडर्निटी इन द मिडल इस्ट - बर्नार्ड लुईस

[२] व्हाय इज द अरब वर्ल्ड सो इझिली ऑफेंडेड - वॉशिंग्टन पोस्ट

[३] लेखाचे शीर्षक मर्ढेकरांच्या 'अब्द अब्द मनी येते' ह्या कवितेतून साभार.

[४] छायाचित्रांचे प्रताधिकार लेखकास्वाधीन. (श्रेयअव्हेरः कोरा नकाशा आंतरजालावरून साभार)