तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा समारोप

लवकर्च उठलो स्नानपुजा आटपुन ओम्कारेश्वर दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती, शान्तपणे भगवन्तासमोर उभे राहुन मानसपुजा स्तोत्र म्हणून मानसपुजा केली.भगवान शिवजी माझ्या मोरयाचे पिताजी,नर्मदामैय्याचेही पिताजी त्यान्च्याच कॄपेने परिक्रमा पुर्ण झाली. तब्येत बिघडणे हे आमचे प्राक्तन.पण त्यामुळेच यन्दा पुन्हा पायी परिक्रमा करण्याची उमेद बाळगुन आहे.
ओम्कार पर्वताची परिक्रमा करण्यास निघालो.उत्तम बान्धीव परिक्रमामार्ग आहे.वाटेत पान्डवकालीन छोटे शिवकेदारेश्वर मन्दिरात दर्शन घेउन पुढे नर्मदा-कावेरी सन्गमावर गेलो,पर्वताच्या उजव्या बाजुने कावेरी आणि डाव्या बाजुने नर्मदा सन्थपणे वाहात एकमेकीन्च्या गळ्यातगळा घालुन भेटतात. निळसर रन्गाची नर्मदा आणि हिरव्या रन्गाची झाक असलेली कावेरी ही भगिनीभेट तासन्तास बघत रहावे अशी.पण कितिही वाटले तरी परत फिरणे भागच होते.
ॠणमुक्तेशवरदर्शन करुन पुढे निघालो. या मन्दिरात चण्याची डाळ अर्पण करतात. आता थोडा चढाचा मार्ग आहे. जन्गलही बर्‍यापैकी आहे.सारा परिसर राजा मान्धाता यान्च्या राजधानीचा आहे. सर्व पडझड झालेला. असे म्हणतात की फार पुर्वी भुकम्प झाला होता. जागोजाग उत्खननात मिळालेल्या भग्न मुर्ती ठेवलेल्या आहेत. आदिवासी,काही साधुसन्त याच्या चन्द्रमौळी झोपड्या,काही चहा नास्ता मिळणार्‍या टपर्‍या आणि मार्गाच्या दोन्ही बाजुना भग्वतगीता लिहिलेले स्तम्भ सारे पहात गौरीशन्कर मन्दिरात आलो. समोर मोठा सुन्दर नन्दी मन्डप आहे. नन्दी खुप सुन्दर आहे.गळ्यातल्या माळा,घन्टा उत्कॄष्ट शिल्प. गौरीशन्कर मन्दीरही पुराणकालिन आहे. सुन्दर कोरीव काम आहे. पिन्डी प्रचन्ड आकाराची आहे. पुर्वी पिन्डीला मिठी मारुन आपले दोन्ही हात जर एकमेकाना मिळाले तर आपल्यला मोक्ष मिळेल असे म्हणत,पण आता पिन्डीभोवती कठडा उभारला आहे व मिठी मारण्यास परवानगी नाही. या पिन्डीत निरखुन बघितले तर ओम आणि शिवमुख दिसते.
दर्शन घेतले.बाजुला असलेल्या झोपलेल्या अवस्थेतील लम्बे हनुमान यान्चेही दर्शन घेतले.
पुढे राजराजेश्वरीदेवीचे दर्शन घेउन गायत्रीपीठ सन्स्कॄतपाठशाला पाहिली,येथेच जितेन्द्रशास्त्रीनी वेदपाठाचे शिक्षण घेतले आहे.त्यान्चे वडील सुधाकरशास्त्री काशीविद्यापिठात शिकलेले होते.जितेन्द्रशास्त्री{बालाशास्त्री} यान्च्या घराण्याकडे ओम्कारेश्वराचा माध्यान्ह नैवेद्याचा मान आहे.आमचे हेच सन्कल्पदाते आहेत. बहुतान्शी महाराष्ट्रीय भक्त त्यान्च्याकडेच जातात कारण ते मुळचे महाराष्ट्रीयन आहेत.
पुढे चान्द-सुरज द्वार,दक्षीणद्वार मार्गे सिद्धेश्वर मन्दिरात आलो. हे पुराणकालीन मन्दीरही भग्नावस्थेत आहे पण सभामन्डप आणि गाभारा चान्गला आहे. हे स्वयम्भू शिवलिन्ग आहे.मन्दिराच्या प्रान्गणातुन ओम्कारेश्वर धरण दिसते.
मन्दिराच्या प्रान्गणात झाडाखाली बसलो,नऊच वाजले होते आज शास्त्रीजीन्च्याकडे प्रसादभोजनासाठी जायचे आहे आणि साडेबारा वाजता नैवेद्य मन्दिरात जातो त्यानन्तरच आपले भोजन असते.
आसमन्त पहातापहाता विचारचक्र फिरू लागले.आम्ही परिक्रमा का करायची ठरवली? फार भाविक आहोत? नाही. उपासतापास,व्रतवैकल्ये यान्चा अतिरेक करत नाही. मोरयाची आठवण करुन हात जोडून नमस्कार करावा आणि कामाला लागावे एवढेच.मग?
आम्हाला भटकन्तीची आवड आहे,निसर्गदर्शन करणे आमची एक जीवनावश्क बाब आहे. सुन्दरसा जलप्रपात बघताना शिवजटेत अडकल्यामुळे अभिमानाचा चकनाचुर झालेली जनहिताच्या आवेगाने बेचैन होऊन मिळेल त्या मार्गाने बाहेर उडी घेणारी गन्गामैय्याच दिसते.डेरेदार वॄक्ष दिसला की स्वतः उन्हात होरपळूनही आपल्या मुलाबाळाना सुखाची सावली देण्यासाठी धडपडणारे मातापिता दिसतात तर एखादा निष्पर्ण वॄक्ष देव-मानव पॄथ्वी यान्च्या रक्षणासाठी इन्द्राला वज्र बनविण्यासाठी स्वखुशीने आपल्या अस्थी देणारे महर्षी दधिची यान्ची आठवण करुन देतो.पण परिक्रमा करण्याचा फक्त एवढाच उद्देश होता? नाही.मग? फार वर्षापुर्वी ९०/९२ साली मला माधवराव लिमयेकाका { माजी आमदार.नाशिकच्या प्रसिद्ध सर्जन डॉक्टर सौ. शोभाताई नेर्लीकर यान्चे वडील, प्रसिद्ध आर्थोपेडीक सर्जन डॉ. विनायक नेर्लीकर यान्चे सासरे} यानी एक पुस्तक दिले होते माझी वाचनाची आवड पाहुन. पुस्तक होते,सटाणा येथील निवॄत्त शिक्षक श्री. एन.व्ही. आहिरे{वियोगी नारायण} यानी लिहिलेले नर्मदे हर नर्मदा परिक्रमा.एका बैठकीत वाचुन काढले ,नन्तर पुन्हा पुन्हा वाचतच राहिले,आजतागायत वाचतेच आहे. नर्मदामैय्या,तिची लेकरे, तो मध्यप्रदेश,गुजराथ तिचे उगमस्थान सन्गमस्थान,तिच्या किनार्‍यावरील निसर्गसम्पत्ती सर्व सर्व माझ्या जीवनाचा एक भागच होऊन गेला. नर्मदा परिक्रमा हा एकच ध्यास रोज आन्घोळ करताना गन्गेच यमुने चैव म्हणताना माते नर्मदे परिक्रमा करायची आहे,लवकर योग आण अशी प्रार्थना करत असे. मुलान्ची शिक्षणे मग लग्न मग नातवन्डे लहान करता करता पन्नाशी उलटली. नोकरी व्यवसाय खाजगी जास्त रजा मिळणार नाही निवॄत्त झाल्याशिवाय काही परिक्रमेला जाता येणार नाही अशी मनाची समजुत घालत असे.माझ्याकडे असलेल्या पुस्तका शिवाय भारती ठाकुर,जगन्नाथ कुन्टे यान्ची पुस्तके घेतली,वाचली.परिक्रमा करायची हे नक्की पण कधी? आणि मोरयाने तो योग आणला. माझ्या हॉस्पिटलचे नुतनीकरण सुरु झाले माझी बदली पुण्याला झाली नन्तर मुम्बईला झाली मला तिकडे रहाणे शक्य नव्हते म्हणून मी विनावेतन रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.आता माझ्याकडे समयच समय होता परान्जपेतर सेवानिवॄत्तच आहेत. निर्णय झाला ११/११/११ चा दुर्मिळ योग साधायचा.
पुस्तकाची पारायणे केल्याने काय आणि कसे करायचे हे माहित होतेच.दरवर्षी अमरनाथ यात्रा,बद्रिकेदार यात्रा एकदा केलेली ओम्पर्वत आदिकैलास यात्रा यामुळे ट्रेकिन्गचा अनुभव होताच.पुण्याचे डॉ. फडनीस आणि कोल्हापुरचे डॉ. गुन्डे हे आमचे तन आणि मन याचे फिटनेस गुरु आहेत.त्यामुळे डायबेटिस असला तरी त्यान्ची शिकवण रोज अमलात आणून रोजचा व्यायाम,योग-प्राणायाम,मेडिटेशन असतेच .रोज सात-आठ कि.मि. चालणे,पान्डवलेणे चढणे आहेच.फक्त पाठीवर ओझे घेउन चालण्याचा सराव करायला हवा.
चार पान्ढरे ड्रेस,स्वेटर ग्लोव्हज सॉक्स वगैरे सर्व चार. दोन बेडशीट शाल वजनाला हलके ब्लान्केट आणि अन्थरुणासाठी हिटलॉन शीट हवेची उशी डोक्याला उन्हाची टोपी आणि रुमाल पायात स्पोर्टशुज आणि फ्लोटर.ब्याटरी,चाकू सुईदोरा कात्री ड्रेसिन्गचे सामान{चिकटपट्टी मलम स्पिरिट डेटॉल वगैरे} काही किरकोळ आजारावरच्या गोळ्या व्हीक्स आयोडेक्स वगैरे पाण्यासाठी बाटली जेवण्यासाठी ताटली चमचा पेला पुजेसाठी निरान्जन उदबत्ती कापुर खडीसाखर नर्मदाजलासाथी दोन छोट्या बाटल्या एका बाटलितिल जलाची पुजा करायची आणि दुसर्‍याबाटलीतिल जल जेव्हा आपण मैय्याकिनार्‍यापासुन दुर असु तेव्हा स्नानाच्या पाण्यात काही थेम्ब टाकण्यासाठी.काही खाण्याचे पदार्थ .अशी तयारी केली प्रत्येकाची पाठपिशवी वेगळी केली हिटलॉनबेडमध्ये बेडशिट शाल ब्लान्केट घालुन त्याची वळकटी करुन दोरीने बान्धुन खान्द्याला अडकवायची पाठपिशवी पाठीवर एक शबनम बिस्किटे,पाण्याची बाटली मार्गदर्शक पुस्तक शिक्क्याची वही हे भरुन गळ्यात .असे सारे घेउन रोज चालण्याचा सराव केला.
श्रावणात ओम्कारेश्वरला जाऊन जितेन्द्रशास्त्रीना परिक्रमेबद्दल सान्गितले. एक नोव्हेम्बरला ब्लड चेक करुन घाडगेसराना दाखवुन फिटनेस घेतला. आमदार वसन्त गिते यान्च्याकडुन ओळखपत्र घेतले.माहेरी जाऊन मोठ्या भाऊ-वहिनी,मोठी बहिण यान्चे आशीर्वाद घेतले. ह्यान्चे मोठे भाऊ बहिण नाशिकलाच आहेत त्यान्चे आशीर्वाद घेतले.
११/११/११ ला सकाळी ११वाजुन ११ मिनिटानी ओम्कारेश्वर नगरपालिकेतुन सर्टीफिकेट घेउन परिक्रमा सुरु केली.आज २७ जानेवारी २०१२ परिक्रमा पुर्ण करुन येथे बसलो आहोत.
परिक्रमेने आम्हाला काय दिले?खुपसारे प्रेम.स्वतः अत्यन्त प्रतिकुल परिस्थितीत जगत असतानाही अतिशय ममतेने मोठ्या आदराने जेऊ-खाऊ घालणार्‍या आसरा देणार्‍या अन्नपुर्णा.लाखोवर्षान्ची परम्परा असलेली नर्मदा खोर्‍यातील सन्स्कॄती,विविधतेने नटलेली जैविक निसर्गसम्पदा,रोज आपुलकीने भेटणारे अनेक बान्धव, मैय्याचा किनारा पवित्र करणारे साधुसन्त,मैय्याच्या प्रेमात भक्तिभावात आकन्ठ बुडालेले एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ असे म्हणणारे परिक्रमावासी,रेवा तटावरील असन्ख्य तीर्थस्थाने,घाट,आणि कुठे छोटूकली तर कुठे विशाल,कुठे सन्थ तर कुठे खळाळत वाहणारी कधी उन्च पर्वतावरुन बेधडक उडी घेणारी तर कुठे असन्ख्य धारानी धावणारी सुन्दर नर्मदामैय्या . एवढे सगळे मिळाले परिक्रमेने.
कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता कसे जगावे हे शिकलो आम्ही. लखन्गिरीबाबा,दगदू महाराज,दादाधुनिवाले,गौरीशन्करमहाराज, सियारामबाबा श्रीराममहाराज या सारख्या सन्त महात्म्यान्चे महान सेवा कार्य बघुन धन्य झालो.
आधिक काय लिहू? फक्त नर्मदे हर!