जरा का जोडून सुट्टी आली की आमच्या, आमच्या कशाला, माझ्याच मेट्रोसेंट्रिक मनात पहिला विचार येतो की शहर सोडून दोन दिवस पळ काढावा. मुंबईसारख्या शहराचं असं आहे की पीडाही होते आणि सोडवतही नाही. पण तो वेगळा विषय झाला.
वीकेंडला किंवा चार दिवस सुटी काढून आपण शहराबाहेर का पळतो यामागची तात्विक चर्चा करावी का प्रत्यक्ष अशा भटकंती करु इच्छिणार्यांना "नो नॉन्सेन्स" माहिती द्यावी अशा दुबेळक्यात मी सापडलो होतो. लेख तर दोन्हीवरही अत्यंत उत्साहाने लिहिता येतील. पण मग काहीतरी मनांतर्गत भानगड होऊन दुसरा पर्याय जिंकला.
बँकॉक किंवा मलेशियाच्या वीकेंड टूर्स असतात. मामाचा गाव, आजी आजोबांची वाडी किंवा त्यासारख्या अपीलने पोरांना गावाकडे नेऊन टेकवून आणण्याच्या जाहिराती येतात. "फक्त दोघां"साठी रोमँटिक महाबळेश्वर म्हणा किंवा आत्यामावशीसुद्धा सार्या कुटुंबासाठी फटाफट अष्टविनायकही सुरु आहे.
पसंद अपनी अपनी..पण माझा पिंड हा तब्ब्येतीत फिरण्यामधे रमतो. अधिकाधिक साईटसीईंग हा भाग मला मानवत नाही. त्यापेक्षा एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन दोनचार दिवस रहावं. इच्छा झालीच तर आसपासच्या जागा फिरुन पहाव्या किंवा सरळ हाटेलच्या रूममधे आराम करावा. सुट्टी म्हणजे सगळ्यापासून सुट्टी.. घेतलेल्या रजेत जास्तीतजास्त रिलॅक्स झालंच पाहिजे, किमान पाचेक ठिकाणं पाहिलीच पाहिजेत या बंधनातूनही सुट्टी..
अशावेळी प्रत्येकाची एखादी आवडती थीम असते. माझी थीम आहे समुद्राची. समुद्राकाठीच वाढलो आणि समुद्रातच पोहायला शिकलो. लहानपणी समुद्र दोस्तासारखा वाटायचा. अजूनही वाटतो. पण मी मोठा झाल्याने तसं बालिश विधान करत नाही इतकंच.
ओके.. कट द क्रॅप.. कम टू द पॉईंट.
आपल्या हॉटेलच्या किंवा रिसॉर्टच्या खोलीत बसल्याबसल्या खिडकीतून समुद्र दिसतो आहे किंवा बाहेर आलो की समोरच समुद्र पसरलेला आहे, आपण संध्याकाळी व्हरांड्यात बियर किंवा तत्सम काही घुटकत आणि सोबत एखाद्या सुरमईच्या तुकडीला सद्गती देतो आहोत.. अशी आणि इतपत माझी स्वप्नं असतात. आणि हे सगळं मला जिथे करता आलं अश्या ठिकाणांनी मला पुष्कळ शांतता आणि समाधान दिलं.
कोंकण लायनीवर अशी बरीच ठिकाणं आहेत हे भटकबहाद्दरांना वेगळं सांगायला नको. गणपतीपुळे आणि तारकर्ली ही बरीच प्रसिद्ध ठिकाणं आहेत. मी त्यांविषयी नवीन काही लिहीत नाही.
कोंकणात नुसतं ड्रायव्हिंग करण्याचा विचारही मला सुखावून जातो.

विशेषतः मुख्य हायवेने न जाता समुद्राकाठच्या रस्त्याने जायचं. एकदम अचानक कुठून समुद्र दिसेल सांगता येत नाही. कधी खाडी, कधी नदी आणि बर्याचदा तो निळाहिरवा समुद्र.. डोळ्यांना खूप सुख मिळतं. वळणावळणाच्या ड्रायव्हिंगचा कंटाळा येत नाही.





रस्तेही वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे..
एखाद्या ठिकाणी फेरीबोटीत कार घालून खाडी पार करावी लागते तेव्हा बोटीची वाट पाहता पाहता तिथल्या धक्क्यावर असलेल्या हाटेलीत मी चहा आणि बॉबी खातो. आपल्याला आवडते.. लाज वाटण्याचं काम नाय.

किंवा अशाच ठिकाणी मिळणारी एखादी सरबरवणारी झणझणीत मिसळप्लेट..

धोका... पुन्हा एकदा खादाडीकडे वळण्याचा धोका.. तो टाळला पाहिजे आणि मूळ विषयाला धरुन लिहीलं पाहिजे..
हां.. तर समुद्राकाठच्या राहण्याच्या जागा..
पहिलं ठिकाण, म्हणजे त्याचं असं झालं की वेंगुर्ल्यात मुक्कामाचा अजिबात प्लॅन नसतानाही केवळ गोव्यातून निघायला उशीर झाला, वाटेत रात्र झाली आणि रत्नागिरी गाठण्याचा कंटाळा आला म्हणून वेंगुर्ल्यात गाडी वळवली. गावात काही राहण्यासारखी नेटकी जागा दिसेना म्हणून नकळत गाव क्रॉस करुन दुसर्या टोकाने बाहेर पडलो आणि दूर एका वळणावर उंच ठिकाणी एक हॉटेल दिसलं. आता केवळ रात्र इथे काढायची आणि सकाळी चालू पडायचं अशा बेताने हॉटेल म्यानेजरशी बोलणी केली.
"गजाली" हॉटेलचा हा असा अनप्लॅन्ड शोध.
खोलीत शिरलो सवयीने ए.सी लावला, टीव्ही लावला आणि बेडवर मस्त ताणून दिली.
पहाटे पहाटे एकदम डोळ्यात हलका हलका उजेड शिरला. डोळे चोळत किलकिले केले. बघतो तर काय, समोर आपला हा पसरलेला..

मग पडदा बाजूला करणं आलं.

आँ? समोर सूर्य? तोही सकाळी सकाळी समुद्रात? माझं काळाचं भान सुटलं का? की मी आदल्या रात्रीपासून दुसर्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत भांग खाल्ल्यागत झोपलोच होतो?
मग लक्षात आलं, की तो सूर्योदयच होता.. त्या जागेच्या भौगोलिक की काय त्या रचनेमुळे सूर्य समुद्रातच उगवताना दिसत होता.
मग त्याला वर येताना तसाच पाहात राहिलो.


बराच वेळ समुद्राकडे पाहात लोळत पडल्यावर मी विचार केला की रूम सर्व्हिस न घेता एक जिना चढून वरती रेस्टॉरंटात ब्रेकफास्ट करावा. म्हणून वर गेलो तर ब्रेकफास्टची जागाच एकदम आवडून गेली..

मग काय? रात्रीपुरता झोपायला आलेला मी पुरे दोन दिवस मुक्काम वाढवून तिथेच राहिलो. रात्री गजालीच्या खानसाम्याने काहीतरी झकास द्या म्हटल्यावर, मोरीचं कालवण, सुरमई तुकडी आणि बियर असा जो काही बेत चारला म्हणताय..
असंच दुसरं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे एम आय डी सी,. एकदम व्हरांड्यासमोर समुद्र. योग्य कॉटेज निवडलंत तर अगदी बेडवर पडल्यापडल्या समुद्राचं पॅनोरमिक दर्शन.. वीसतीस पायर्या खाली उतरुन गेलात की समुद्रातच..
पण मी गणपतीपुळ्यापासून एकदोन किलोमीटर अंतरावरच असलेल्या भंडारपुळ्यातलं एक ठिकाण इथे सांगतो. अभिषेक बीच रिसॉर्ट.. या हॉटेलची गंमत अशी की सर्वच खोल्या सी फेसिंग,
जास्तीत जास्त उंचावरची खोली घेतलीत तर आणखी मजा.
रूमच्या पूर्णाकृती काचेच्या खिडकीतून दिसणारं दृश्य.. इथेच प्रशस्त बाल्कनीही आहे.. कट्ट्यावर बसून समुद्र पहात राहायचं असेल तर..

या ठिकाणीही मी असाच फिरत फिरत गेलो आणि समुद्राकडे पाहून बाकीचे सर्व बेत रद्द करुन त्याच गॅलरीत बसून त्याच त्या समुद्राची वेगवेगळी रुपं बघत दिवस काढला..

नुसता सूर्यास्त पाहण्यात मजा नाही. सूर्यास्ताचे फोटो काढण्यात तर अजिबात मजा नाही. सूर्यास्तानंतर जो गूढ राखाडी प्रकाश पसरतो तो बघायला हवा. त्याच्या बदलत्या शेड्स बघायला हव्यात. साला त्या क्षणी तरी एकटेपणा रिकामेपणा हवाहवासा वाटायला लावणारे रंग सगळे..
अगदी रात्री रुद्रभीषण दिसणार्या समुद्राकडेही डोळे फाडफाडून बघत बसलो होतो. बियरच काय पण अभिषेकच्या किचनमधली फँटॅस्टिक सोलकढी सिप करत या बाल्कनीत बसण्यातली गंमत लाजवाब आहे.
बाय द वे.. या रिसॉर्टचं किचन टेसदार आहे एकदम..
.........................
रत्नागिरी हे तर माझं बालपण. तिथल्या भाट्याच्या सुरुबनात सायकली मारत जायचो तेव्हा लाटेने किनार्याला आलेल्यातले मासे पंजा मारुन पकडणारं एखादं चुकार कुत्र्यांचं टोळकं सोडलं तर तिथे नुसता सूं... असा आवाज भरलेला असायचा. आताशा एका गर्द रात्री त्या साईडने ड्राईव्ह करताना तिथे सुरुबनातच चक्क "रत्नसागर" नावाचा रिसॉर्ट झालेला दिसला. इथेच टाकावा तंबू असं म्हणत पुन्हा एकदा केवळ रात्रीसाठी मुक्काम म्हणून आत शिरलो आणि सकाळी उठूनच बाहेर पाहिलं.
सुट्यासुट्या आणि लांबलांब अंतरावर असलेल्या एसी कॉटेजेसनी ही जागा फार सुंदर केली आहे. सर्व घरं लाकडाची.
सगळी घरं थेट बीचवरच्या वाळूतच असल्याने समुद्र याहून जवळ असूच शकत नाही. बाहेर पडा, की समोर समुद्रच पसरलेला...


या ठिकाणचं रेस्टॉरंट हे एकदम खास ठिकाणी आहे. संध्याकाळी इथे येऊन बसावं. आधी समोरच्या अथांग समुद्रात किंवा त्याच्याही अलीकडल्या पूलमधे दमेपर्यंत डुंबून घ्यावं..

मग सूर्यास्ताला या रेस्टॉरंटचं एखादं मस्तपैकी समुद्रकाठचं टेबल पकडून समुद्राकडे नजर लावून बसावं ते तासाला एक ऑर्डर देत एकदम मध्यरात्रीच जड उदराने उठून डुलत डुलत आपल्या लाकडी घरापर्यंत जावं.. सुख सुख म्हणजे काय वेगळं ते?
नीडलेस टू से.. पुन्हा एकदा एका रात्रीपुरता आत शिरलेला मी तीन दिवसांनी तिथून बाहेर पडलो... हो तर... कितीही मोठं असलं तरी एका दिवसात किती प्रकारचे समुद्रजीव त्या पोटात सामावणार, ....साला फिशकरी राईसमधेच माझा एक दिवस जातो.
दोस्तलोक्स.. कोंकणावर बोलायला लागलो की माझं तोंड फिजिकली दाबून बंद करण्याची वेळ येते. तेव्हा तुम्हाला विस्तारभय देत नाही. इथेच थांबतो. या ठिकाणांची केवळ नावं आणि मला तिथे मिळालेला अचानक आनंद तुमच्याशी वाटून घ्यायचा होता. तिथली बुकिंग्ज, दर आणि अन्य सगळी माहिती मिळवणं प.पू. गूगलबाबा कृपेने सर्वांनाच सहजसाध्य आहे. तो माझा आजचा विषय नव्हे.. मिसळपावच्या वर्धापनाच्या लेखमालिकेचं निमित्त आहे. माझ्या मनातलं तुमच्यासमोर बोलण्यासाठी. खाणं, भटकणं आणि आनंद वाटणं हा मिसळपावचा आत्मा आहे.. लेखनकामाठी किंवा साहित्यिक जडत्व नव्हे..त्यामुळे इथे आपल्या वाटेचे वाटसरु खूप भेटतात.
आनंद, निवांतपणा सगळा आपल्या आत असतो.. गजाली, अभिषेक किंवा रत्नसागरमधे नव्हे.. पण आपल्या आत तो आनंद घेऊन अशा ठिकाणी गेलं की तो नशा चढावी तसा चढतो..
अशा ठिकाणी जाऊन आलं की आपण आपल्या रूटीनमधे येण्यासाठी रिफ्रेश होतो अशी चुकीची समजूत आहे. अशा ठिकाणी गेलो की परत रुटीनमधे येताना काय पीडा होते ते काय वर्णावं..
पण ते तीनचार दिवस काहीही न करता, अगदी तोंडात माशी शिरण्याचीसुद्धा पर्वा न करता आ वासून समुद्राकडे बघत लोळत पडायचं असेल तर.. वेळेची जाणीव नष्ट व्हायची असेल तर..... अशा सुशेगादपणात, काही म्हणजे काहीही न करण्यात सर्वोच्च आनंद आहे असं आपल्याला वाटत असेल तर? म्हणजेच तुम्ही माझ्यासारखेच असाल तर? मग हीच आपली तीर्थक्षेत्रं...
