तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-४२

पहाटे उठलो,घाटावर स्नानासाठी गेलो.आज मकर सन्क्रान्त आहे. पौष महिन्यातिल क्रुष्ण पक्ष आहे त्यामुळे आकाशात चन्द्र नाही पण घाटावर लाइट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पटकन स्नान आटोपले कारण थन्डी खुप होती. म्हणजे मैय्याचे जल सुखद उबदारच होते पण कुठपर्यन्त? जो पर्यन्त आपण लोटेच्या लोटे पाणी अन्गावर घेत असतो तो पर्यन्तच्,एकदा ते थाम्बले की थन्डीने दात वाजायला लागतात. म्हणून पटकन आवरुन परतलो.
पुजा आरती करुन स्तोत्रपाठ पुर्ण होतच होता तोच खिडकीतुन आकाशातील रन्गान्च्या उधळणीकडे लक्ष गेले. अरुणोदय झाला होता. आमची खोली तिसर्‍या मजल्यावर असल्यामुळे डोन्गरावरील घनदाट जन्गल झाडी आडून लाल-गुलाबी रन्गाची उधळण करीत हळूहळू वर येणारा तो बाल दिनकर आम्हाला अगदी सहज दिसत होता. आणि त्याच बरोबर त्यानेच दिलेली लाल्,गुलाबी,सोनेरी रन्गाची गर्भरेशमी परकर चोळी परिधान करुन आपली छोटी नर्मदा अवखळपणे नाचत पुढे पुढे धावत होती. भान हरपुन आम्ही खिडकीत उभे होतो. तोच घन्टानाद कानावर आला.चला चहाचे बोलावणे आले.अरे हो! सान्गायचेच राहिले,इथे चहा,भोजन यान्ची वेळ झाली की घन्टा वाजवतात मग जायचे भोजन शाळेत.
खाली उतरुन भोजन शाळेत गेलो,निरश्या दुधाचा गरमगरम चहा खुप छान होता. इथल्या दुधात पाणी घालत नाहीत त्यामुळे तो दाट चहा खुपच छान असतो. चहा घेता घेता सर्वान्चा निरोप घेतला. महाराजान्कडून वहीवर शिक्का मारुन घेतला तितक्यात सन्तोष रिक्षा घेउन आलाच. निघालो माईच्या बगिच्याकडे.
गावाबाहेर साधारणपणे दोनएक कि.मि. गेल्यावर सन्तोष म्हणाला.आपण इथे उतरुन ह्या समोरच्या पायवाटेने माईच्या बगिच्या जवळ या मी रस्त्याने तिकडे येतो कारण रस्त्याने जाताना मैय्या क्रॉस होते.ठीक आहे असे म्हणून आम्ही उतरलो,पिशव्या रिक्षातच ठेवल्या फक्त मैय्याच्या कुप्या असलेली शबनम तेवढी घेतली. जन्गलातल्या पायवाटेने आमची विनोबा एक्स्प्रेस निसर्गाची रमणीयता पाहात पक्षान्चे गोड गाणे अ‍ॅकत निघाली. दव पडल्यामुळे जमीन ओली झालेली होती,जपुनच चालत होतो कारण जरा दुर्लक्ष झाले तर मग धरतीमातेला लोटान्गण नक्की. कालचा अनुभव ताजा होता.असे साधारण दोन कि.मि. चाललो, समोरच्या बाजुला एक मन्दिर दिसले तेथील कुन्डावर काही लोक स्नान करत होते,आम्ही आणि ते लोक यान्च्या मधुन एक छोटा स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहात होता ती नर्मदामैय्या होती की दुसरी कोणती नदी कळत नव्हते,नर्मदे हर! आम्ही त्या लोकाना हाक मारुन विचारतच होतो तितक्यात सन्तोष आला,त्याने तिथेच थोडे पुढे असलेल्या एका फळकुटावरुन आम्हाला पलीकडे नेले.आम्ही मैय्याच्या उत्तर किनार्‍यावरुन दक्षिण किनार्‍यावर आलो.
मोठमोठ्या व्रुक्षान्च्या खाली दोन कुन्डे होती. मोठ्या कुन्डात लोक स्नान करत होते आणि निळ्या आकाशी टाइल्सने बान्धलेले छोटेसे कुन्ड म्हणजे नर्मदामैय्याचे उगमस्थळ होते.तिथेच नर्मदामैय्याची सन्गमरवरी मुर्ती होती. त्या कुन्डात शिवपिन्डी होती. तिथे असलेल्या पुजारीबाबानी आम्हाला स्नान झाले आहे का विचारले,आम्ही हो म्हटल्यावर त्यानी आम्हाला बसायला आसन दिले आणि आमच्या जवळ असलेल्या मैय्याजलाच्या कुप्या समोर ठेवायला सान्गितल्या नन्तर पुजेचे काही मन्त्र म्हणुन पुजा करवून घेतली आणि उभे राहुन कुपी हातात घेउन त्यातील निम्मे नर्मदा-सागर जल त्या कुन्डात अर्पण करायला सान्गितले व नन्तर त्यानी त्या कुन्डातील जलानी त्या कुप्या परत भरुन आम्हाला दिल्या. आता हे जल ओम्कारेश्वरला गेल्यावर परिक्रमा पुर्ति प्रित्यर्थ नर्मदापुजन करुन नन्तर ह्यातील अर्धेजल आधी दक्षिण किनार्‍यावरील ममलेश्वराला अर्पण करुन नन्तर नर्मदामैय्या ओलान्डुन ओम्कारेश्वराला अर्धे जल अर्पण करावे म्हणजे परिक्रमा सम्पुर्ण होईल. त्याना काही दक्षिणा देउन तिथेच बसलेल्या एका साधूबाबाना कन्यापुजन आणि कढईसाठी पैसे दिले,त्यानी लगेच तिथेच असलेल्या कन्याना तयार असलेली हलवा-पुरी दिली आम्हालाही प्रसाद दिला. आमची सागरसन्गमापासुन सुरु झालेली उत्तर किनार्‍यावरील परिक्रमा पुर्ण झाली,पुन्हा दक्षिण किनार्‍याने पुढची परिक्रमा सुरु करण्यासाठी.
थोडीफार फोटोग्राफी करुन रिक्षात बसलो.रस्ता चान्गला सिमेन्टचा बान्धलेला आहे. जन्गल दाट आहे,या जन्गलात अनेक ऑषधी वनस्पती आहेत त्यामुळे येथील हवा शुद्ध,प्रदुषणमुक्त आहे.तीन कि.मि. शोणभद्र नदाच्या उगमस्थळी गेलो,येथुन शोणनदाचा उगम झाला आहे याच शोणाबरोबर नर्मदेचा विवाह ठरला होता पण नर्मदेच्या एका दासीने खोटे बोलुन त्याच्याशी विवाह केला म्हणुन अविवाहीत राहण्याचा निश्चय करुन लोककल्याणासाठी उलटदिशेने फिरुन पश्चिमेकडे जलरुप घेउन प्रवाहीत झाली अशी पुराणकथा आहे.शोणनद पुर्वेला प्रवाहित झाला. या ठिकाणी धबधबा आहे पण तो पावसाळ्यातच असतो. तिथे बर्‍याच ॠषीमुनीन्च्या अगदी हुबेहुब मुर्ती आहेत. हनुमानमन्दिर्ही आहे म्हणून त्याचे अनुयायी वानरही भरपुर आहेत्.पुढे श्रीयन्त्र मन्दिरात गेलो,या श्रीयन्त्राचे दर्शन घेत नाहीत तशी आद्य शन्कराचार्यान्ची धर्माआज्ञा आहे त्यामुळे मन्दिराच्या गाभार्‍याचा दरवाजा बन्द होता बाहेरच्या बाजुला शिवपिन्डी आहे. तिथुन नर्मदाकुन्डावर गेलो,समोर कर्णमन्दिर,शन्कराचार्यमठ आहे तो पाहुन नर्मदाकुन्डाच्या दक्षिणदरवाजाने प्रवेश केला. कुन्ड भव्य असुन पाणी अगदी स्वच्छ निर्मळ आहे. कुन्डात पाय घालायला परवानगी नाही. अगदी खालच्या पायरीवर शिवपिन्डी आहे आपल्या जवळील ताम्ब्याने कुन्डातील पाण्याने तिच्यावर पाण्याचा अभिषेक करतात.फुले बेल वाहिले तरी लगेच ते उचलुन निर्माल्यकलशात टाकायचे. ह्यामुळे स्वच्छा आहे. अशीच व्यवस्था बाकी सर्व तीर्थक्षेत्रीही झाली तर किती चान्गले होईल. बाहेर आलो.
दुपारचा एक वाजला होता आज नास्ता-भोजन काहीच झाले नव्हते मग एका टपरीवर भाजीवडा खाल्ला. नन्तर सन्तोषने रिक्षाने जन्गल रस्त्याने काही अन्तरावर सोडले,इथुन पुढे आम्हाला बसस्टॉप पर्यन्त चालतच जावे लागणार होते. वाटेत एका आश्रमाच्या चारीबाजुनी नर्मदेचा प्रवाह वाहतो येथेच नर्मदेवर छोटा बन्धारा बान्धला आहे त्यामुळे येथे तिचे पात्र थोडे मोठे झाले आहे आणि घाटावर स्नानासाठी मुबलक जलसाठा आहे. ह्या तलावाला कबीर तलाव म्हणतात.
यथावकाश बसस्टॉपवर पोहोचलो.थोड्याच वेळात बस मिळाली. सुन्दर जन्गलातुन जाणार्‍या रस्त्याने कबीर चौथरा,करन्जिया,गोरखपुर,गाडासराई,वगैरे गावे पार करत पाच वाजता दिन्डोरीला पोहोचलो. हॉटेल नर्मदा इन मध्ये उतरलो. आणि तेच योग्य झाले असे नन्तर जेव्हा नर्मदामैय्याचा घाट आश्रम वगैरे पहायला बाहेर पडलो तेव्हा तिथली परिस्थिती पाहिल्यावर वाटले.

बाल नर्मदा

balnarmada

कपिलधारा अमरकंटक

kapil

श्री अमरेश्वर

amaresh

दुर्गधारा अमरकंटक

durg

नर्मदा कुंड - नर्मदेचा उगम

narmadaa kuMD

क्रमशः