चैत्यगृहे

चैत्यगृहे- महाराष्ट्रातील गिरीकुहरांत खोदली गेलेली ही सुंदर गिरिशिल्पे.
चैत्यगृह म्हणजे प्रार्थनामंदिर किंवा अचूकपणे सांगायचे झाले तर स्तूपयुक्त प्रार्थनामंदिर. स्तूप हे बुद्धाच्या स्मरणार्थ उभारले गेले. अशोकाच्या अहिंसक आक्रमक धर्मप्रसारानंतर तर प्रचंड संख्येने स्तूप उभारले गेले. सर्वसाधारणपणे बुद्ध किंवा बुद्धाच्या श्रेष्ठ अनुयायांच्या अवषेशांवर स्तूप उभारले जात. पार्थिव देहाच्या किंवा वापरत्या वस्तूच्या अवशेषांना धातु व त्यांवर उभारल्या गेलेल्या स्तूपांना धातुगर्भ अशी संज्ञा आहे. दागोबा हे त्याचे सिंहली स्वरूप. महाराष्ट्रातील गिरिलेण्यांतील स्तूपांना पण दागोबा अशीच संज्ञा दिली जाते.

अशोकाने अनेक मैदानी भव्य स्तूप उभारले. परंतु प्रस्तुत लेखात आपण फक्त सह्याद्रीतील चैत्यगृहांचा विचार करणार आहोत.

महाराष्ट्रातील लेणी ही प्राचीन सार्थवाहपथांनजीक आढळतात. शहरांपासून तशा जवळ, पण तरीही सह्याद्रीच्या काळाकभिन्न कातळांत खोदल्या गेलेल्या ह्या लेण्या हे बौद्ध भिक्षूंचे वर्षावासाचे आणि एकांतवासाचे ठिकाण असे. ह्या लेण्या कोकणातून वरघाटी येणार्‍या प्राचीन घाटवाटांनजीकच असत. उदा. लेण्यांचा जुन्नर गट हा ठाणे, वसई, भडोच ह्या बंदरातून पैठणकडे जाणार्‍या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर आहे तर लोणावळे गट हा कल्याण, चौल इ. बंदरांतून पैठण, तेर, धाराशिव इ. प्राचीन पेठांच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर आहे. ह्या मार्गाने व्यापार करणार्‍या सार्थवाहांबरोबर बौद्ध भि़क्षूंचे धर्मप्रसारक येत असत. त्यांच्या विश्रांतीसाठी सह्याद्रीच्या ह्या डोंगररांगामध्ये प्रथम विहार खोदले गेले आणि जशीजशी प्रार्थनेची गरज निर्माण होत गेली तशी तशी चैत्यगृहेसुद्धा निर्माण होत गेली.
सह्याद्रीतल्या शिल्पकारांनी एकदा चैत्यगृहांचा आकार ठरवला तो एखादा अपवाद वगळता फारसा बदललेला दिसत नाही. कमानदार अश्वनालाकृती गवाक्ष, लंबवर्तुळाकारात खोदलेली गुहा, गजपृष्ठाकार छत, छताला आधार देणारे खांब आणि त्यावर लाकडी फासळ्यांची ओळ, आतील बाजूस भिंतीचा जवळ खोदलेला स्तूप अशी याची सर्वसाधारण रचना. जुन्नरजवळच्या तुळजा लेणीमध्ये मात्र गोलाकार चैत्यगृह आढळून येते.

चैत्य हे सार्वजनिक प्रार्थनामंदिर असल्याने ते अधिकाअधिक देखणे करण्याचा तसेच प्रत्येक चैत्यगृहाच्या बांधकामातील केलेल्या चुका टाळून पुढची चैत्यगृहे अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

चैत्याचा दर्शनी भाग अश्वनालाकृती वातायनाने सुशोभित करण्याची प्रथा रूढ आहे. नीट निरखून बघितल्यास याचा आकार पिंपळपानाकृती दिसतो. गौतम बुद्धाला गयेतील पिंपळवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले याचे स्मरण म्हणून याची अशी रचना. हे गवाक्ष चैत्यगृहाच्या शिरोभागी असून यातून जाणारा उजेड थेट स्तूपावर पडावा अशी याची रचना. कर्जतजवळच्या कोंडाणे लेण्यांत अशी कमान प्रथम उभारली गेली. सह्यादीतील हे आद्य चैत्यगृह असल्याने याच्या बांधणीत बर्‍याच चुका आढळतात. सर्वात मोठी चूक म्हणजे कड्यावरून कोसळणार्‍या पावसाचा पुरेसा अंदाज न घेणं. यामुळे यातील कमानीची बरीच पडझड झाली आहे. यातूनच पुढच्या चैत्यगृहांमध्ये मध्ये खडकात ओसरी कोरण्याची पद्धत निर्माण झाली.
काही बेडसे, कार्ले अशा ठिकाणी एकावर एक असा दोन पिंपळाकार वातायने कोरलेली दिसतात. कदाचित अधिक प्रकाशाची गरज किंवा अधिक देखणेपणा. ह्या कमानीवरी चक्र, त्रिरत्न अशी बुद्धप्रतिके कोरलेली दिसतात तसे फूलाफुलांचे अतिशय देखणी ऩक्षीकामही दिसते.
चैत्याच्या प्रवेशद्वारानजीक काहीवेळा द्वाररक्षक यक्ष कोरलेले आढळतात.
सह्याद्रीतील बरीचशी चैत्यगृहे ही सुरुवातीच्या हीनयानकाळातच खोदण्यात आली आहेत. आतील ओसरीवर उंच उंच जाणारे कमानदार प्रासाद खोदण्यात येऊ लागले व त्यावर आकाशगामी गंधर्व सुद्धा कोरण्यात येऊ लागले. ओसरीवरील खडकाला आधार देण्यासाठी भव्य स्तंभांची निर्मीती करण्यात येऊ लागली. बेडसे लेणीतील ओसरीतील छताला आधार देणारे स्तंभ सह्याद्रीतील सर्व शैलगृहांमध्ये देखणे ठरावेत. बेडशातील हे विशेष स्तंभ मौर्य शैलीतील. त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हणतात. ‘पर्सिपोलिस’ हे इराणमधील एक प्राचीन शहर आणि तिथले हे पर्सिपोलिटन स्तंभ. तिथल्या संस्कृतीचा प्रभाव मौर्याच्या कलेवर आणि पुढे याच शैलीची छाया बेडशाच्या या खांबांवर पडली.

पांडवलेणीतील चैत्यकमानीवरील देखणे नक्षीकाम

बेडसे चैत्यातील भव्य स्तंभ

ओसरीतून आत प्रवेश करताच वर छताला लाकडी फासळ्यांचा आधार दिलेला दिसतो. छताचा अर्धवर्तुळाकार आकार आणि लंबरूपात खोदली गेलेली गुहा यामुळे छत अगदी गजपृष्ठासमान दिसते. छतावर लाकडी फासळ्या लावण्याची पद्धत का सुरु झाली ते सांगता येत नाही पण ह्या लाकडी फासळ्यांमुळे आणि बाहेरच्या पिंपळाकार वातायनामुळे चैत्यगृहाला एक प्रकारचे संतुलन प्राप्त होते आणि चैत्यगृह अधिकच खुलून दिसते. मात्र स्तूपाभोवती असणारा गाभारा मोकळा व अनलंकृत असल्याने भक्त पवित्र स्तूपाकडे सहजच आकर्षिला जाई. एकंदरीत आतल्या स्तूपाची रचना साधी, भव्य परंतु ठोस असे. स्तूपाच्या समोर दोन्ही ओळीत सरळ असलेले स्तंभ स्तूपाभोवतीही वर्तुळाकारात फेर धरत.

स्तूप म्हणजे ढीग किंवा स्तू म्हणजे स्तवन करणे आणि स्तूप म्हणजेच जोडणे किंवा एक करणे.

वर्तुळाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड, त्यावर चौकोनी हर्मिका आणि त्याजवर लाकडी छत्र अशी स्तूपाची रचना.
जोते म्हणजे मृत्युलोक, घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग, ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायर्‍यांनी बनलेली आढळते ह्या सात पायर्‍या म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक अशी तत्कालीन धारणा.

पांडवलेणीतील जोते, वेदिकापट्टी, अण्ड आणि हर्मिका यांनी युक्त असलेला स्तूप

हीनयानकाळातील हे स्तूप अगदी साधे, अनलंकृत असल्यामुळेच आकर्षक दिसत. साधे असल्यामुळेच अतिशय डौलदार दिसत आणि पूजनीय वाटत. बुद्धपूजा स्तूपप्रतिकात करण्याची प्रथा होती पण नंतरच्या महायानकाळात बुद्धमूर्ती कोरण्यास अनुमती मिळाल्यानंतर लेण्यांबरोबरच स्तूपांवरही बुद्धमूर्ती खोदण्यात येऊ लागल्या. आपलेच लेणे आकर्षक करत जाण्याच्या स्पर्धेमुळे स्तूपांचे अलंकरण होवून चैत्यगृहे अधिकाधिक ऐश्वर्यसंपन्न होत गेली व स्तूप बांधण्याचा मूळ उद्देशच लयाला गेला आणि स्तूपांचा तोल बिघडला. बुद्धमूर्ती कोरण्यामुळे स्तूपांची उंची साहजिकच वाढत गेली व मूळच्या डौलदार स्तूपाचा आकार बदलला जाऊन स्तूप बेढब दिसायला लागले. हर्मिकेवरील छत्रांची संख्या वाढायला लागली. एकाच छत्राची जागा एकावर एक असे तीन छत्र घेऊ लागले. आजमितीस ही तीन छत्रे कुठेही अस्तित्वात नाहीत पण कान्हेरीतील चैत्यगृहातील एका कोनाड्यात अशा प्रकारच्या स्तूपाचे प्रारूप त्यावरील तीन छत्रांसह कोरलेले आढळते.

अजिंठा येथील महायानकाळातील तोल बिघडलेला स्तूप. (चित्र आंतरजालावरून)

कान्हेरीतील तिहेरी छत्र असलेले कोरीव स्तूपाचे प्रारूप

कार्ले, भाजे, बेड्से या चैत्यांचा तुलनात्मक संक्षिप्त आढावा:-

भाजे येथील चैत्यगृहात ओसरी नाही, तसेच एकच पिंपळपानाकृती कमान आहे. तसेच लेण्यांतील भिंती व आतले स्तंभ कललेले ठेवलेले आहेत. छताचा दाब बाहेरच्या बाजूला असावा आणि खांब कलते ठेवले तरच ते असा दाब तोलू शकतील या कल्पनेने ही योजना केलेली दिसते. पुरेशा अनुभवांती याची काही गरज नाही असे कारागिरांच्या लक्षात आले असावे व त्यामुळे यापुढील इतर चैत्यगृहांमध्ये अशी कलत्या खांबांची रचना दिसत नाही. भाजे लेण्यांतील अष्टकोनी खांब साधे आहेत मात्र कार्ल्यातील सालंकृत आहेत आणि त्याजवर स्त्रीपुरुषांच्या जोड्या हत्ती, बैल, सिंह आदी प्राण्यांवर बसलेल्या दिसून येतात.
भाजे लेणीतल्या स्तूपावर मौर्यकालीन झिलई आढळते. स्तूपावर एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा लेप देऊन स्तूप चमकदार आणि गुळगुळीत केलेला दिसून येतो.
कार्ले आणि बेडसे या दोन्ही चैत्यांच्या प्रवेशभागी खोदीव जवनिका आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंस एकावर एक चढत गेलेल्या कमानदार गवाक्षाप्रासादांची रेलचेल आहे. बेडसे लेणीमध्ये मात्र बुद्धमूर्ती नाहीत तर कार्ल्याच्या प्रवेशभागातील मूर्ती नंतरच्या काळात खोदलेल्या दिसून येतात.
कार्ल्याच्या प्रवेशद्वारावर अशोकस्तंभ कोरलेला आहे, कान्हेरीतील चैत्यगृहात केलेली त्याची नक्कल वगळता सह्याद्रीत इतरत्र कुठेही अशोकस्तंभ दिसत नाहीत.

कार्ले येथील चैत्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीत भारतातील सर्व चैत्यांत विस्तीर्ण आहे. याचे क्षेत्रफळ भाजे चैत्याच्या साडेतीन पट व बेडसे चैत्याच्या सहापट आहे. भाजे चैत्यात २७ व बेडसे चैत्यांत २६ आणि कार्ले चैत्यात ३७ खांब आहेत. सर्वाधिक उंचीचाही हाच चैत्य असून सर्वाधिक सालंकृतही आहे. कार्ल्याच्या समोरील ओळीतील स्तंभ नक्षीदार असून साधे स्तंभ स्तूपाच्या पिछाडीस आहेत तर भाजे आणि बेडसे यांचे स्तंभ साधे आहेत.
भाजे चैत्यासमोर जवनिका नसल्याने तो चैत्य काहीसा भकास दिसतो तर बेडसे चैत्यगृहात जवनिका असूनही प्रवेशद्वारानजीकचा खडक अर्धाच फोडलेला असल्याने तो चैत्य किंचीत अंधारी आहे तरी प्रवेशद्वारातील भव्य सालंकृत स्तंभामुळे हा चैत्य अतिशय देखणा झालेला आहे. तरी कार्ल्याच्या चैत्यगृहाची सर कशालाच नाही. स्तंभांवरील स्त्रीपुरुषांची ऐहिक ऐश्वर्याची ही प्रतिके स्तंभांच्या अग्रभागी कोरलेली आहेत. स्तूपासमोरील ओळीत असलेल्या ह्या प्रतिकांच्या उपस्थितीमुळे स्तूपाबद्दल भाविकाला अधिकच आदर वाटेल अशी मांडणी येथील शिल्पकारांनी केलेली आहे.
कार्ले चैत्याची मांडणी अत्यंत प्रमाणबद्ध आहे. लांबी, रूंदी व उंची यांचा अनोखा समतोल येथे साधला गेला आहे.
भाजे स्तूपावर आज छत्र अस्तित्वात नाही, बेडसे चैत्यात ते कमळाचा आकार घेऊन आलेले आहे तर कार्ले चैत्यावर ते पसरट नक्षीदार फळीच्या स्वरूपात दिसते.
भाजे आणि कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आजही शाबूत आहेत पण बेडसेच्या नष्ट झालेल्या दिसतात.

भाजे चैत्यगृहातील कललेले खांब, झिलईचा गुळगुळीत स्तूप व पिंपळपानाकृती कमान

भाजेची साधीशीच रचना

बेडसे चैत्यगृह

बेडसेतील स्तूपाचे नक्षीदार कमळाकृती छत्र

कार्ले चैत्याच्या ओसरीमधील नक्षीदार प्रासाद

कार्लेचा जगप्रसिद्ध चैत्य आतील देखण्या स्तंभांसह

तीनही चैत्यांवर दातृत्वाचे अनेक शिलालेख कोरलेले आढळतात. तर बेडसे आणि कार्ले चैत्यगृहावर त्यांच्या निर्मात्याचा उल्लेखही आढळतो.

बेड्से चैत्याजवळच्या एका विश्रांतीकक्षावर असलेला शिलालेख
...नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं

नासिकचा श्रेष्ठी आनंद याच्या पुत्राचे हे दान.

तर कार्ले चैत्यावर त्याचा निर्मात्याचा- वैजयंती नगरीचा श्रेष्ठी भूतपाल याचा शिलालेख आढळतो.

वेजयंतिता सेठिणा भूतपालेना सेलघरं परिनिठपितं जम्बुदिपाम्हि उतमम

वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने निर्मिलेले हे शैलगृह जंबुद्विपात सर्वोत्तम आहे.

भूतपालाचे शब्द अगदी यथार्थ आहेत.
कार्ले येथील चैत्य सर्व चैत्यांत विस्तीर्ण, उत्तुंग आणि उत्कृष्ट आहे, प्रसन्न, गंभीर आणि उदात्त आहे. हीनयान शिल्पशैलीचा हा सर्वोत्तम प्रतिक. येथे ऐश्वर्य आहे पण डामडोल नाही, येथे अभिजात कला आहे पण ओसंडती कृत्रिमता नाही, कौशल्याचे प्रदर्शन नाही, मूर्तींची गर्दी नाही. वस्तुत: स्तूप हे मृत्युचे प्रतिक पण येथे जीवनाचे प्रेरणा देते. यापूर्वी आणि यानंतरही शिल्पकारांनी अनेक लेणी खोदली, अनेक चैत्य खोदले पण यासम हेच.

संदर्भः
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर
The Cave Temples of India -J. Burgess & Bhagwanlal Indraji