तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२५

पाच वाजता उठलो,प्रातर्विधी उरकुन घाटावर स्नानाला गेलो.ग्रहण सुटल्यामुळे चन्द्रमा आता नव्या तेजाने चमकत होता त्यामुळे अन्धार नव्हता २५/३० पायर्‍या उतरुन मैय्याच्या पात्राजवळ गेलो.पाणी जास्त नव्हते सरदार सरोवरातुन पाणी सोडले तरच पाणी वाढते. थन्डीच्या दिवसात वाहत्या पाण्याने स्नान करणे हा अनुभव स्वतःच घेणे छान वाटेल.छान उबदार असते पाणी.उगवत्या सुर्याला अर्घ्य दिले आणि शिवमन्दिरात वाहण्यासाठी पाणी जवळच्या ताम्ब्याच्या लोट्यात पाणी घेउन समाधीमन्दिरात गेलो.शिवपिन्डीवर पाणी वाहुन मानसपुजा केली,नन्तर वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्च्या समाधीदर्शनास गेलो.तिथे दत्तबावनी म्हटली. नन्तर चहा घेउन हॉलवर येउन पिशव्या पाठीवर लादुन विनोबा एक्सप्रेस निघाली. नर्मदे हर.
गरुडेश्वरला जानकीमाताजी नावाच्या एक माताजी प्रसिद्ध आहेत.त्या परिक्रमावासीन्ची सेवा करत असतात. परिक्रमावासीना हव्या असलेल्या वस्तू त्या देतात.त्या गावाला गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही याची चुटपुट लागली.असो. नर्मदे हर.
तासाभराचे चालणे झाल्यावर खडगदा गाव आले.तिथे रामसिन्गभाई मोतीभाई तडवी यान्च्या सत्यम शिवम सुन्दरम या घरी त्यानी आग्रह करुन नेले,चहा दिला.अर्धातास तिथे थाम्बुन पुढे निघालो. गरुडेश्वर पासुन केवडिया कॉलनी फाटा आठ कि.मि. होता.तिथे डाव्या बाजुच्या रस्त्याने जायचे होते,समोरचा रस्ता केवडिया कॉलनीला जाणारा रस्ता होता. झरिया येथिल बान्धकाम चालु असलेल्या मन्दिरात पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
हनुमान मन्दिरात विद्याताई,लिलाताई यानी खिचडी केली,मी हापशावर कपडे धुतले.भोजन झाल्यावर बागेतील मोठ्या झाडाच्या पारावर विश्रान्ती घेउन दीड वाजता पुढे निघालो. उन्हाचा कडाका वाढला होता,दमायला झाले होते,नर्मदे हर नर्मदे हर जप करत कसेतरी पाय ओढत चालत होतो.मुक्कामाचे ठीकाण अम्बाजी किती दुर आहे माहीत नव्हते.इतक्यात एक टेम्पो आला,त्याने अम्बाजीला सोडायचे कबुल केले मग सर्व सामान टेम्पोत टाकुन बसलो. अम्बाजीला जाणारा रस्ता खराब होता त्यातच अम्बाजीचे ठाणे उन्चावर असल्याने घाट चढायचा होता.अगदी वेळेवर टेम्पो मिळाला होता नाहीतर आज अम्बाजीला पोहोचणे अशक्य होते.
अम्बाजी दहा कि.मि. दुर होते.चार वाजता पोहोचलो. माता अम्बाजीचे हे क्षेत्र मोठे रमणीय आहे. चारी बाजुना दाट व्रुक्षराजीने भरलेले डोन्गर,मन्दिरामागे झुळझुळ वाहणारी छोटी नदी,सुबक बान्धणीचे मन्दिर,सन्गमरवरी पाषाणाची स्वरुपसुन्दर अम्बाजीची प्रसन्न हसतमुख मुर्ती.सुन्दर निसर्ग.
नवीनच बान्धलेल्या भक्तनिवासात एका हॉल मध्ये आसन लावले. वान्गी,बटाटे,कणीक सदाव्रतात मिळाले रस्सा-पोळ्या असा स्वयम्पाक केला.पुजा आरती केली नन्तर भोजन केले आज एका परिक्रमावासीलाही भोजन प्रसाद देण्याचा योग आला. आता विश्रान्ती.
नर्मदापरिक्रमा एक आनन्द यात्रा आहे. आजचा दिवस मजेत पार पडला,उद्या कुठे कधी कसे माहीत नाही तरीही सारा आनन्दीआनन्द. नर्मदे हर. क्रमशः