स्नान,पुजारती करुन देवदर्शन केले,चहा घेउन आणि सर्वान्चा निरोप घेउन नर्मदे हर म्हणून विनोबा एक्स्प्रेस निघाली .पिशव्यान्मधल्या सामानाचे रीसटीन्ग केल्यामुळे ओझे थोडे हलके वाटत होते.२कि.मि.वरील बसस्टॉपवर आलो,लगेचच रिक्षा मिळाली राजपिपलाला सन्तोष चौकडीला उतरलो.परिक्रमेच्या रस्त्याची चौकशी केली आणि चालु लागलो. हरसिद्धीमाता मन्दिरात दर्शन घेउन काळाघोडा मार्गे ओरीच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
करसन नदीवरील पुल ओलान्डून वरपाडा गावात आलो.आठ वाजुन गेले होते चहा घ्यावा असे वाटत होते कुठे मिळेल असे बघत होतो तर तिथे कामावर जाण्यासाठी उभे असलेले एका ग्रुहस्थानी नर्मदे हर म्हटले,स्वतःची ओळख सान्गितली मी नगीनभाई तुम्हाला आमच्याकडचा चहा चालेल का? मी मुस्लीम आहे म्हणून विचारतो.मी म्हटले,न चालायला काय झाले अहो चालेलच नाही तर धावेल. हिन्दू-मुसलमान दोघेही बाबा बर्फानीअमरनाथचे सन्तान.द्यावा आम्हाला चहा.तिथे मागच्या बाजुलाच त्यान्चे घर होते,नगीनभाईनी पत्नीला चहा देण्यास सान्गितले आणि कामावर जायचे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा नर्मदे हर म्हणून ते गेले.सबिनाभाभीनि नर्मदेहर म्हणून आम्हाला चहा आणि बिस्किटे दिली.त्यान्चामुलगा ;समीर त्याचे नाव,नर्मदे हर म्हणून आमच्या पाया पडला. नर्मदामैय्या सर्वान्चीच माता आहे. चहा घेउन आम्हीही नर्मदे हर म्हणून त्यान्चा निरोप घेतला.
साधारणपणे २/३कि.मि. चाललो असू,दोन रस्ते लागले हायवे अन्कलेश्वरला जात होता ह्याच रस्त्याने ओरी असेल कारण नन्तर आम्हालाही अन्कलेश्वरला जायचेच होते असा विचार करुन चालु लागणार तोच काही परिक्रमावासी त्या दुसर्या रस्त्यावरुन जाताना दिसले,मग एकजणाला विचारुन त्या दुसर्या रस्त्याने चालायला सुरवात केली.
या रस्त्याला फारशी झाडे नव्हती उन लागायला लागले होते दहा वाजले साधारणपणे बाराएक कि.मि. चाललो असु.वरखड गाव आले.रसिकभाई भेटले सरपन्च आहेत या गावाचे.रस्त्याच्या कडेलाच त्यान्चे घर होते त्यानी घरी चला म्हटले आम्हालाही तहान लागली होती,जवळचे पाणी सम्पले होते गेलो. रसिकभाई देवभक्त होते बराच मोठा देव्हारा होता बर्याच तसबिरी होत्या.घरात म्हातारी आई,पत्नी मुले होती. नर्मदेहर म्हणून सर्वजणानी नमस्कार केला.चहा-पाणी झाले.रसिकभाई म्हणाले जेवण येथेच करा पटकन भाजी-भाकरी तयार होईल.पण जास्त उशीर झालेला नव्हता म्हणून नको म्हटले आणि ओरीही आता फक्त ३/४कि.मि.च राहिले होते म्हणून पुढे निघालो.
रस्ता कच्चा होता पण मधुन मधुन झाडाची सावलीही मिळत होती त्यामुळे जीवाची अगदी काहिली होत नव्हती पण उनतर लागतच होते.ओरी बर्यापैकी मोठे गाव होते.कोटेश्वर मन्दिराची चौकशी केली,मन्दिर गावाबाहेर होते.थोडे चालुन उजव्या हाताला मन्दिराकडे जायला वळलो,दुतर्फा केळीच्या बागा होत्या जीवाला गार वाटले.केळी काढायचे काम चालले होते.
कोटेश्वर मन्दिर सुबक सन्गमरवरी आहे. तिथे एक माताजी व्यवस्थापक आहेत.गोड हसुन स्वागत केले आणि म्हणाल्या,आसन लावा हात पाय धुवुन घ्या भोजन वाढते. थन्डगार पाण्याने नळावर हातपाय धुतले बरे वाटले.भोजनाला आमटी,भात तिक्कड आणि मिरचिचे लोणचे होते.मी लोणचे तिखट असेल म्हटले तर वाढणारा मुलगा म्हणाला या मिरच्या तिखट नसतात,खरोखरच मिरच्या तिखट नव्हत्या लोणचे मोठे चविष्ट होते.स्वयम्पाक रुचकर होता,आत्माराम त्रुप्त झाला. भोजन झाल्यावर माताजीनी एक वही दिली आणि त्यात आमचे नाव पत्ता लिहायला आणि आमच्या वहीवर त्यान्चा शिक्का मारुन घ्यायला सान्गितले .
कोटेश्वरहुन निघालो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता.आतापर्यन्त १४कि.मि. चाललो होतो सिसोदरा ४कि.मि. आणि तिथुन पुढे ८कि.मि. पुढे कार्तिकेश्वर{स्कन्देश्वर} मौनीबाबा आश्रम कान्दरोज. पाय उचलायला हवेत.उन खुप होते भोजनही झालेले त्यामुळे चालण्याचा वेग कमी झाला होता. सिसोदरा आले तेव्हा साडेतीन वाजले होते.गावाला छान प्रवेशद्वार होते,समोरच मोठा पिम्पळाचा पार होता,गार सावलीला बसलो.गावात कुणा मालदार आसामीकडे एखादा समारम्भ असावा,पाराखाली बर्याच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. नर्मदेहर झाले,आम्हाला राहण्याचा आग्रहही झाला पण आम्ही आजचा मुक्काम कान्दरोजला ठरवला होता म्हणून नाही म्हटले.चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली. रस्ता प्रवेशद्वारा बाहेरुन डाव्या बाजुला होता.
कच्चा रस्ता दुतर्फा शेते पण सावलीसाठी मोठी झाडे नसल्याने उन्हाचा त्रास खुप होत होता.साधारणपणे तीन चार कि.मि. चाललो असुनसु माझे डोके खुप दुखायला लागले कसेतरी होत होते सिसोदर्याला राहिलो असतो तर बरे झाले असते असे वाटायला लागले,पण आता सिसोदरा चार कि.मि. आणि कान्दरोजही चारच कि.मि. राहिले होते पुढे जाणेच इष्ट.मैय्या दमले ग बाई ! नर्मदे हर.
पाय ढकलत होतो आणि... एक जीप आली,नर्मदे हर माताजी नर्मदेहर बाबाजी जीपमधील माणसाने हाक मारली.कुठे जाणार? कार्तिकेश्वर मौनीबाबा आश्रमात आमचे उत्तर.बसा;मी सोडतो. ते होते अरुणभाई विठ्ठलभाई पटेल.बसलो.
आम्ही गाडीत बसलो तिथुन पुढचा रस्ता अतिशय खराब होता.थोड्याच वेळात एक नदी लागली तिला खुप पाणी होते,अरुणभाई म्हणाले समुद्राला भरती आली की हिला पाणी चढते.म्हणजे आता थोड्याच दिवसात आमचा दक्षिण किनार्यावरचा परिक्रमेचा भाग पुर्ण होणार याचा आनन्द झाला. अरुणभाईनी अगदी लीलया जीप त्या पाण्यातुन बाहेर काढली,आणि एक चढ चढुन थाम्बवली.म्हणाले या उजव्या बाजुच्या रस्त्याने जा तो बघा तो दिसतो आहे तोच मौनीबाबा आश्रम. नर्मदे हर.अशातर्हेने पुन्हा मैय्या आपल्या बालकान्ची किती काळजी घेते याचा प्रत्यय आला ऊर भरुन आलेंअर्मदे हर.
सन्ध्याकाळ झाली होती.आश्रमात पोहोचलो,महाराज बाहेर गेले होते सेवेकर्याने पडवीत आसन लावायला सान्गितले त्या पडवीत आधीच बरेच परिक्रमावासी बसले होते,विड्यान्च्या धुराने पडवी भरली होती तम्बाखुचा वास प्रचन्ड होता मला तिथे रहाणे शक्यच नव्हते,सेवेकर्याला मी तिथे राहण्यास नकार दिला आणि खोली द्यावी अशी विनन्ती केली ते म्हणाले महाराज आल्यावर तेच काय ते सान्गतील. आम्ही झाडाच्या पारावर बसलो,समजा खोली नाही मिळाली तरी पारावर रहाणे त्या पडवीपेक्षा कितितरी चान्गले असा विचार केला.हातपाय धुवुन चहा घेतो तोच महाराज आले,त्यानी आम्हाला खोली द्यायला सान्गितली.
महाराज खुप शिकलेले आहेत.आमच्याशी खुप वेळ बोलत होते. मौनीबाबानी या ठिकाणी तप केले होते.त्याकाळी या जागी दाट जन्गल होते,स्वयम्भू स्कन्देश्वरा बद्दल लोकाना काहिही माहित नव्हते,मौनीबाबानी या क्षेत्राचा विकास केला.आता मौनीबाबा नाहीत त्यान्ची समाधी बडोदा येथे आहे. रात्री भोजनानन्तर भजनाचा कार्यक्रम झाला.आता विश्रान्ती.क्रमशः