तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा

खुप वर्षापुर्वी सटाण्याच्या अहिरेगुरुजीनी [वियोगी नारायण] लिहिलेले नर्मदेहर नर्मदापरिक्रमा हे पुस्तक वाचले होते.तेव्हापासुन नर्मदापरिक्रमा करायची असे मनात होते,रोज स्नान करताना गन्गेचयमुनेचैव गोदावरी सरस्वती,नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन सनिधम कुरु.असे म्हणत मैय्याची प्रार्थना करुन लवकर योग आण असे म्हणत असे.
११/११/२०११ला हा योग मैय्याने आणला.ओम्कारेश्वरपासुन परिक्रमा सुरु केली.जितेन्द्रशास्त्री गुरुजीनी सन्कल्प पुजा सान्गितली,पुजा कढई कन्यापुजन करुन नर्मदेहर केले,नगरपालिकेच्या कार्यालयातुन प्रमाणपत्र घेउन चालायला सुरवात केली.
वाटेत श्रीराम महाराज भेटले.{ गोन्दवलेकर महाराजान्चे भक्त;मैय्याच्या उत्तर किनार्यावर नावघाटखेडीला त्यान्चा आश्रम आहे.} ते म्हणाले, मोरटक्क्याला भोजनप्रसाद घेऊन येतो.पाठीवर जड पाठपिशवी,भरदुपारचे रणरणते उन पहिल्याच दिवशी दम निघाला.जैनधर्मशाळेत पोहोचेपर्यन्त सन्ध्याकाळ झाली.कबुल केल्याप्रमाणे महाराज भोजनाचा भलामोठा डबा घेउन आले छान भोजन झाले.आमच्याकडील बोजा बघुन महाराजानी काही सामान कमी करावे असे सुचवले,त्यानुसार काही सामान त्यान्च्या जवळ ठेवले.खुप दमलो होतो,सन्ध्याकाळची मैय्याची पुजारती करुन विश्रान्ती.
पहाटे उठून विहिरीवर थन्ड पाण्याने स्नान आटोपले,पुजारती करुन प्रस्थान ठेवले.रेल्वे पुलाखालुन मैय्याच्या किनार्याने वाटचाल सुरु केली.वाटेत एका भल्या माणसाने आधारासाठी काठी हवीच असे सान्गुन बाम्बुच्या काठ्या आम्हा उभयताना दिल्या.परिक्रमेत त्यान्चा खुपच उपयोग झाला.
टोकसरला गोमुखआश्रमात भोजनप्रसाद,प्रमाणपत्रावर शिक्का घेउन पुढे निघालो. हा गोमुखाआश्रम खुप सुन्दर आहे,निसर्गरम्य.येथे एका कुन्डात गोदावरी प्रकट झालेली आहे. पीतनगर,कान्करिया,मढी,अशी गावे पार करत वेळोवेळी गावकर्याकडुन होणारे आदरातिथ्य स्वीकारत सन्ध्याकाळी रावेरखेडीला श्रीमन्तान्च्या आश्रयाला पोहोचलो.श्रीमन्त थोरले बाजिराव यान्च्या समाधीचे दर्शन घेउन समोरच राहणार्या सरपन्चान्कडे आसन लावले.वान्गी-बटाटा भाजी भाकरी असे गावरान चवीचे सुग्रास भोजन मैय्याच्या क्रुपेने मिळाले.पुजापाठानन्तर गावकर्यान्बरोबर गप्पागोष्टी करुन बिनघोर झोपलो,प्रत्यक्ष पेशवे सरक्षणास असताना भीती कसली?