एका तैल-चित्राची जन्मकथा (सचित्र- भाग १)

या लेखात माझ्या एका चित्राच्या संपूर्ण निर्माणप्रक्रियेची सचित्र नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे.

१. उपोद्घात:
पॅरीस मध्ये चित्रे रंगवावीत, ही माझी फारफार वर्षांपासून ची इच्छा. Monet, Renoir, Pissaro इत्यादी प्रमाणे तिथल्या रस्त्यांवर, उद्यानात, नदीकिनारी बसून चित्रे काढावीत, असे तेंव्हा वाटायचे...

पुढे प्रत्यक्षात अशी संधी जेंव्हा मिळाली, तोवर माझी प्रत्यक्ष जागेवर बसून चित्रे काढण्यातली गोडी ओसरलेली होती. तीन तीन महिन्याचे तीन मुक्काम होऊनही सर्व काळ भटकण्यात, संगीताचे कार्यक्रम आणि लूव्र वगैरे संग्रहालये बघण्यात व्यतीत झाला... अर्थात, हे सर्व खूपच आनंददायक होते, पण यावेळी मात्र काहीतरी चित्रकर्म करायचेच, असा निश्चय झाला.

२. पूर्व तयारी:
रंग-ब्रशादि सामान घरून आणलेले होते, पण कॅन्व्हास इथूनच घ्यायचा होता. यासाठी 'मारा' (Marin) हे स्थान सर्वोत्तम, तिथे अगदी लहान, ६ बाय ६ इंच पासून दहा-पंधरा फुटा पर्यंतचे कॅन्व्हासच्या थप्प्या च्या थप्प्या लावलेल्या बघून डोळ्यांचे पारणे फिटले. त्यातून खिश्याला परवडेल, बस मधून नेता येईल, आणि घरात करायला,लावायला सोयीस्कर असे 73x92 सेमी. आकाराचे दोन कॅन्व्हास खरेदी केले. घरी पोचताच आहानने त्यांचे परिक्षण करून, थापट्या मारून, आनंदाने चीत्कारून पसंतीची पावती दिली. मग आम्ही दोघांनी याच्यावर आज चित्र करायचे ठरवले.


जमिनीवर कॅन्व्हास आडवा ठेऊन, रंग- ब्रशादि सामानाची जुळवाजुळव करून सर्व ठीक-ठाक आहे ना, हे आहान ला बघायला सांगितले:

त्याने लगेच उत्साहाने सर्व सामानाचे त्याच्या पद्धतीने परिक्षण केले.

कॅन्व्हास तैल रंगाच्या दृष्टीने थोडा कोरडा वाटला, म्हणून त्यावर लिन्सिड तेलाचा अगदी हलका थर चढवला:

३. प्रारंभ:
चित्राला सुरुवात करण्यापूर्वी मनात (निदान जाणीवेच्या पातळीवर तरी) कोणतीही आकृती, कल्पना, विचार वगैरे काहीही नसते. फक्त आपण आता चित्रकर्म करणार आहोत, एवढाच विचार असतो... कोर्‍या कॅन्व्हासकडे काही वेळ नुसते बघायचे....
सहजपणे सुचतील, ते रंग ट्यूब मधून कॅन्व्हासवर पिळायचे... मग त्यावर रोलर फिरवून रंग पसरायचे...


मधले लाल, पिवळे रंग हे काही इमारती सारखे दिसू लागले... आता एका बाजूला हिरवा रंग पसरवला.... हे 'पाणी' आहे, असे वाटू लागले.... आता 'खाली' पाणी, 'मध्ये' इमारती, तर 'वरती' आकाश करावे, असे वाटून वर निळा, पांढरा रंग पसरवला....

आता हे चित्र असे दिसू लागले:

आता पूर्ण कॅन्व्हास रंगीत झाला. हे तैल रंग असल्याने आता चित्र चार-पाच दिवस वाळायला ठेवायचे, त्या दरम्यान जाता-येता बघत रहायचे, यातून चित्रात अनेक आकार दिसत, सुचत जातात, आणि हळूहळू चित्र मनात साकार होत जाते. पूर्ण वाळल्यावर पुढले काम सुरु करायचे...
आता मला चार-पाच दिवस थांबायचे आहे, तेंव्हा वाचकांना पण थोडी प्रतिक्षा करावी लागणार...
पुढे हे चित्र कसे, कोणते रूप घेणार, याची उत्सुकता आहे, कदाचित हे बिघडेल, किंवा बर्‍यापैकीही होईल, कुणी सांगावे?
......क्रमशः ....