काही महिन्याखाली रोममध्ये जायचं होतं म्हणून आंतरजालावर मराठी काही माहिती आहे का ते शोधत होतो. अपेक्षेप्रमाणे एक-दोन ब्लॉग तेही युरोप पर्यटनावर सोडले तर काहिच मिळालं नाही. दुसरं म्हणजे पुर्वी जाउन आलेल्या ठिकाणाबद्दल कुणी काही माहिती विचारली तर फोटो सोडले तर माझ्याजवळ काहीच नसतं. मग ठरवलं की आपल्या संदर्भासाठी आणि आठवणीसाठी (इमोशनल कॉलबॅक, यु नो! :)) प्रवासवर्णनं लिहुन ठेवायची. आता लिहिलंच आहे तर मिपावर टाका म्हणून टाकतोय. :)
१. शाफहाउसन
खूप दिवस कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे ह्या विकांताला कुठेतरी जायचं ठरवलं. जवळपासची सगळी ठिकाणं फिरून झाली होती. आणि खरंतर माझ्यासारख्याला सगळी युरोपिअन शहरं सारखीच वाटतात. तेच ते धबधबे, त्याच त्या इमारती, चर्चेस, कॅसल्स आणि बागा. थोडसं दूर जावं म्हटलं तर वेळ कमी होता आणि ऐनवेळी सगळं बूकींग केलं तर प्रकरण खर्चीक होतं हा स्वानुभव होताच. त्यामुळे कुठे जावं हा प्रश्न होता. तेव्हड्यात कुणीतरी सांगितलं की शाफहाउसन नावचं बॉर्डरवर स्वीस मधे एक शहर आहे. तिथले र्हाईनफॉल्स बघण्यासारखे आहेत आणि ४-५ तास मजेत जाउ शकतात. मग आदल्यादिवशी आंतरजालावरून सगळी माहिती काढली, रेल्वेचं वेळापत्रक बघितलं. आमचं कुटूंब जरा घरगुती प्रकरण असल्यामुळे साबुदाण्याचे थालिपीठ, तिखट शंकरपाळ्या, पोहे वगैरे करायलं घेतले. :)
सकाळी फोडणीचा भात खाउन सव्वासातच्या बसने ट्रेन स्टेशनवर पोहोचलो. ते ठिकाण स्वीस मध्ये असलं तरी "बाडेन व्युटेमबर्ग" तिकीटात तिथपर्यंत जाता येणार होतं. तिथून मग लगेचच असलेली ट्रेन पकडली आणि दोन तासांच्या प्रवासानंतर सिंगेनला पोहोचलो. तिथून दुसरी ट्रेन बदलून १५-२० मिनिटात शाफहाउसनला आलो.
बघेल तिकडं भारतीय लोकं एकमेकांची तोंडं चुकवत चालली होती, त्यावरून स्वीझर्लंड मध्ये असल्याची खात्री पटली. :)
रेल्वे स्थानकासमोरच बशी उभ्या होत्या. र्हाइनफॉल्स पर्यंत जाउन यायल्या माणशी ५ युरो तिकीट लागणार होतं. पण काही गृप पास आहे का म्हणून "इंफॉरमेशन" असं लिहिलेल्या खिडकीवर जाउन विचारणा केली. पण मला जर्मन ओकीठो येत नसल्यानं "आइन मोमेंट बिटे" म्हणून परत जाउन बायकोला घेउन आलो. तिनं कसबसं त्या बाईला सांगितलं आणि असं कुठलंही गृप तिकिट नाही हे कळलं. आणि पाच युरोची तिकिटं घेउन थांब्यापर्यंत येईपर्यंत बस क्र. १ आलीच. बस मध्ये बसल्यावर समोरच्या स्क्रीनवरच थांब्याचं नाव येत होतं त्यामूळे 'नोए हौसेन झेंट्रूम' हा थांबा आल्यावर उतरलो आणि "र्हाइनफॉल्स" असं लिहिलेल्या चॉकलेटी रंगातल्या दिशादर्षकाच्या मदतीनं र्हाइन नदीपर्यंत येउन पोहोचलो.
वरतीच दोन बाकडे टाकले होते, तीथं सुटलेल्या पोटाची पूजा करून खाली उतरलो.
१. लांबून दिसणारे र्हाईनफॉल्स

त्या धबधब्या मध्येच एक सुळका तयार झाला होता. तीथं काही लोकं दिसत होती. आपणही तिथं जायचं असं ठरवून खाली उतरलो आणि बोटराइडची चौकशी केली. वेग-वेगळ्या टूर्स होत्या. बाकिच्या टूर्स मध्ये बोटीतच बसून रहावं लागणार होतं म्हणून त्या सुळक्यापर्यंत जाण्याचं आणि येण्याचं (हे महत्वाचं :)) तिकीट (माणशी ७ युरो) घेउन त्या बोटीची वाट बघत थांबलो. बोट आल्यावर आत शिरणार तितक्यात भारतिय १०-१५ वर्षेवयोगटातल्या मुला-मुलींचा घोळका आरडा-ओरडा, धक्का-बुक्की करत आत शिरला (एका हुचभ्रू शाळेची ट्रीप आली होती). आणि आम्हाला अगदी टोकाची जागा मिळाली. :(
त्या धबधब्याचा प्रचंड आवाज येत होता म्हणून ते पाणी आहे असं वाटत होतं नाहितर धुराचे लोळ येत आहेत असच वाटलं असतं. तीथं सुद्धा अरूंदश्या पायर्यांवर वरती जाण्यासाठी रांग होती. वरती फार फार तर सात-आठ जणांना फक्त उभं रहाण्यासाठी जागा होती. पण भारतीय लोकं इतर लोकांची पर्वा न करता आरामात वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढून घेत होते. काही दिवसांनी एशियन लोकांसाठी जास्त तिकीट ठेवल्यानंतर आश्चर्य वाटायला नको! :) अर्थात हा फक्त इथला अनुभव नाहिये, पण स्विझर्लंडचं बॉलीवूडनी व्यवस्थीत मार्केटींग केलंय त्यामूळे इथं लोकं जास्त दिसतात एव्हडच.
आणि मिळेल ते ओरबाडून-झगडून घेण्याची वृत्ती (इथल्या एकुणच सिस्टीममुळे) भिनलेली असते. अश्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्याविषयी नंतर.
३. सुळक्यावरून दिसणारं द्रुष्य.

४. पायर्यांवरून दिसणारा धबधबा

परत आल्यानंतर मग नदीच्या बाजूने फेरफटका मारून (तंगडतोड करून) एका पुलावरून दुसर्याबाजूला आलो.
५. पूलावर इष्टाईल मारत काढलेला फोटू

६. दुसर्याबाजूनं दिसणारा सुळका

इथं मोकळी जागा दिसली रे दिसली की लोकं फुलझाडं लावतात असं वाटतं. बघेल तिथं वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फुलंचफुलं!
७. दोन डोळे आणि मिश्या सारखा पॅटर्न असलेली वेगवेगळ्या रंगाची फुलं.

तिथून बस थांब्यावर आलो आणि बसने परत हाउप्टबानहोफला आलो.
स्टेशनवर आल्यावर घडाळ्यात फक्त साडेतीन वाजले होते. परतीची रेल्वे पावणेपाचला होती. मग तीथल्याच एका मार्केट मध्ये फेरफटका मारला. बायकोनं यथेच्छ विंडोशॉपींग केलं :)
पावणेपाचच्या रेल्वेनं परत त्याच राउटने घरी आलो. घरी येइपर्यंत साडेआठ वाजले होते.
वाचकांना आवडलं नाही तरीही पुढील भाग, २. रोझ गार्डन (बाडेन-बाडेन) :)


