कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे...
संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...
वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...
पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली...
काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्या तार्यांनी भरलेले आकाश..
क्षणात चमकून लुप्त होणार्या उल्का..
दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड...
K2S च्या या आठवणी जाग्या करत वेळेवर स्वारगेट ला सगळे जण जमलो व PMT बस शोधून कात्रज जुन्या बोगद्याकडे प्रस्थान केले.
सूर्यपुत्र, सागर, सूड, पिंगू, मी आणि Trekism चे सहा मित्र मिळून ११ जण होते.
या ट्रेकची सुरूवात होते कात्रज जुन्या बोगद्यावरच्या डोंगरावरून, आम्ही तिथे पोहोचलो तर आधीच दोन ग्रूप आलेले होते, त्यांच्याबरोबर किरकोळ बोलून लगेचच डोंगर चढायला सुरूवात केली.
नुकताच पाऊस पडून गेल्याने थंडगार हवेत आणि मऊ व भुसभुशीत मातीवरून चालायला मजा येत होती.. पण थोडावेळच. माती बुटांना चिकटायला लागली व पाय घसरू लागले. ढगाळ हवेमुळे चंद्र चांदणे काही दिसत नव्हते. काळाशार अंधार होता सगळीकडे.
पहिला डोंगर चढल्यानंतर आपण अशा ठिकाणी असतो जिथून कात्रज जुन्या बोगद्याकडे येणारा रस्ता, कात्रज नव्या बोगद्याकडे येणारा रस्ता व कात्रज तलाव एकाच वेळी दिसतो. यांच्या पार्श्वभूमीवर पसरलेले पुण्याचे दिवे या चित्रात एक वेगळाच परिणाम साधतात.
दुसर्या दिशेला दोन्ही बोगद्यांनंतर एकत्र येवून थेट खेड शिवापूरपर्यंतचा रस्ता व सिंहगडाकडे बघितले तर टॉवरचा लुकलुकणारा दिवा.
रस्त्यावरून जाणार्या वाहनांचे लाईट्स रस्त्याला वेगळीच गती प्राप्त करून देत होते... वळणावळणाचा रस्ता दिव्यांमुळे अक्राळ विक्राळ पसरलेल्या सापासारखा भासत होता

तिथे अचानक हा पहुडलेला दिसला.

मण्यार - "Big Four" ग्रूप मधला एक अत्यंत विषारी. (इंग्रजी नाव - Common Krait)
डोंगर चढताना दम लागत होता. अंधारात टॉर्चच्या मदतीने दिसेल तितकेच दिसत होते. त्यात पहिल्याच डोंगरावर साप दिसल्याने सगळीकडे जास्त काळजीपूर्वक बघितले जात होते.
Wolf Spider - तळहाताएवढा होता हा कोळी.

अचानक काहीतरी चमकले आणि गायब झाले. टॉर्च फिरवल्यावर एक बेडूक दिसला.
अंगावर दोन तीन रंगाचे पट्टे असलेला आणि पायावर विलक्षण सुंदर सोनेरी ठिपके असलेला हा सोन्याबेडूक (Fungoid Frog) याची काही भावंडे अतीजहाल विषारी असल्याने दुरूनच याचे निरीक्षण केले.

पुढे वाटेवर काही वेगळेच पक्षी बसलेले होते.. आम्ही चालताना जवळ गेल्यावर नाईलाज झाल्यासारखे उडून बाजूलाच बसत होते. नक्की काय प्रकार होता आम्हाला कळाले नाही.
तास दीड तासात टंगळ मंगळ करत पाच डोंगरटेकड्या पार झाल्या.

नंतर जेवणासाठी एका रिकाम्या जागेवर गोल करुन बसलो.
जेवणाचा मेनू.. आ हा हा.
चटणी पराठे
ठेपले
चटणी सँडवीच
ब्रेड बटर जॅम
ब्रेड पॅटीस
खजूर
टोमॅटो केचप
कारळ्याची चटणी
जेवणा नंतर सोनपापडी व चिक्की. अधुनमधून तोंडात टाकायला क्रीम बिस्कीटे होतीच.
न ठरवता अचानक पणे जमून आलेला मेनू. सगळ्यांनीच आडवा हात मारला. :-)
आमचे जेवण सुरू असताना बाकीचे ग्रूप येत होते, पुढे जात होते. त्यांचे टॉर्चलाईट लांबून काजव्यांसारखे दिसत, मध्येच लुप्त होत; परत दिसत. अंधारात तो खेळ बघायला वेगळीच मजा येत होती.
जेवणानंतर थंडी जाणवू लागली होती.. हळूहळू चालायला सुरूवात केली.
वाटेत योग्य अंतरावर दिशादर्शक बाण आहेत त्यांच्या व सिंहगडाच्या लाईट्सच्या मदतीने टेकड्या पार करणे सुरू होते. पहिल्या ७ की ८ टेकड्या मोजल्या.. नंतर मोजणे सोडून दिले. :-)

थंड हवेमुळे फारसा दम लागत नव्हता.. वातावरणातल्या गारव्यामुळे घाम येत नव्हता.. टेकड्या व डोंगर चढताना लागलेला दम, वरती पोहोचल्याबरोबर भर्राट वार्याबरोबर उडून जात होता.
शेवटी एकदाचे चंद्रदर्शन झाले, वेळ रात्रीचे ०२:४०.
चंद्रप्रकाश आणि अंधाराला सरावलेले डोळे यामुळे थोडावेळ बॅटरी बंद करून चालण्याचा आनंद लुटला. सगळीकडे एक मंद दुधाळ प्रकाश पाझरत होता...
चंद्राकडे बघितले तर चंद्राभोवती खळे तयार झाले होते. फारसे ढगही नव्हते आकाशात. सुंदर दृश्य होते ते.
कांही वेळाने आणखी एक स्नॅक्स ब्रेक घेवून सोनपापडी व क्रीम बिस्कीटांचा फडशा पाडला गेला. (मित्र डिवचत असताना आणि बोलून बोलून हैराण करत असताना सगळीकडे दुर्लक्ष करून डुलकी काढण्याचा आनंद मी १० - १५ मिनीटे अनुभवला. ;-))
दवामुळे गवत ओले व निसरडे झाले होते... बॅगा व बूट सुध्दा भिजले होते. शेवटचे तीन डोंगर बघूनच कस लागणार याची जाणीव झाली होती. नेमके दुसर्या डोंगरावर रस्ता चुकलो. तारे आणि सिंहगडचा लाईट यांचा रेफरन्स बघायचे विसरल्याची जाणीव झाली, पण लगेचच रस्ता सापडला.
दवात भिजलेले पान.

ते डोंगर पार करून दोन ट्रॅव्हर्स मारले, अचानक डांबरी रस्ता लागला. आता इथून सिंहगडापर्यंत डांबरी सडकेवरून चालायचे होते. ६ / ७ तास मऊ माती व गवतावरून चालल्यानंतर घट्ट डांबरावरून चालणे एकदम त्रासदायक होते. एखादा किलोमीटर अंतर चालल्यानंतर कंटाळा आला म्हणून एका ठिकाणी टेकलो, अचानक त्या विचित्र वेळी (पहाटे ०४:३०) गडावर जाणारी एक सुमो मिळाली. आम्ही शेवटचे ४ किमी अंतर सुमोने आणि कांही जणांनी चालत पार केले.
पार्कींगजवळ एका झोपडीत गार वार्यात तिथल्याच चटईवर अंग टाकले, थोडा वेळ झोप काढली सगळ्यांनीच.
सुर्योदय..

कांदाभजी, बटाटा भजी, पोहे व चहा यांसोबत खुसखुशीत गप्पा, आठवणी, किस्से आणि स्फोटक हसणे यांमुळे थकवा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता.
तिथून अतकरवाडी व नंतर घरी.. पुढच्या ट्रेक चे प्लॅन बनवत. :-)