कान्हेरी लेणी: भाग २

कान्हेरी लेणी: भाग १

कान्हेरीचे विशाल चैत्यगृह पाहून पुढील लेणी पाहावयास निघालो.
इथून पुढच्या सर्व लेण्या डोंगराच्या वेगवेगळ्या पातळीत खोदलेल्या आहेत. सर्वच विहार आहेत. वेगवेगळ्या विहारांत जाण्यासाठी अंगच्याच कातळामध्ये जिने खोदलेले आहेत.

चैत्यगृहाच्या पुढेच लेणी क. ५ च्या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला कोनाड्यात सातवाहनांचा एक अतिशय महत्वाचा काहीसा खंडित शिलालेख कोरलेला आहे.

.........वासिष्ठीपुत्रस्य श्रीसात[कर्णि]स्य देव्या: कार्दमक-राजवंशप्र[भ]वाया महाक्षत्र[प] रूद्र...पुत्र्या:......
.......[स्या:]....[वि]श्वस्यस्य अमात्यस्य शतेरकस्य पानीयभोजनं देयधर्म्मः

.....वासिष्ठिपुत्र श्रीसातकर्णीची राणी....जी कार्दमक राजवंशात जन्मली आहे आणि महाक्षत्रप रूद्र (रूद्रदामन) याची कन्या आहे तिच्या शतेरक नामक विश्वासु अमात्याचा हे पाण्याचे धर्मदाय आहे.

हा शिलालेख प्राचीन ब्राह्मी लिपीत असून भाषा किंचित अशुद्ध संस्कृत आहे. हा रूद्रदामन माळवा-काठेवाडचा शक महाक्षत्रप. याचे बरेचसे शिलालेख शुद्ध संस्कृतात आहेत. गौतमीपुत्र सातकर्णीने केलेल्या नहपान क्षत्रपाच्या समूळ उच्चाटनानंतर रूद्रदामनाने आपली कन्या त्याच्या पुत्राला वासिष्ठिपुत्राला दिली होती. गौतमीपुत्राच्या निधनानंतर सातवाहन-क्षत्रप संघर्षात रूद्रदामनाने वासिष्ठिपुत्राचा दोन वेळा पराभव करूनही जामात असल्याच्या कारणाने त्याला जीवंत सोडून दिले होते. हा सगळा उल्लेख रूद्रदामनाच्या जुनागडच्या शिलालेखात येतो.
रूद्रदामनाच्या वंशाचे 'कार्दमक' हे नाव कान्हेरीच्या ह्या शिलालेखात येते तसेच क्षत्रपांचा संस्कृतवरील प्रभावही या लेखावरून दिसून येतो.

कातळातीलच जिना चढून वरच्या पातळीत गेलो, मंद उतार असलेला सपाटसा कातळ असल्याने कातळाच्या अंतर्भागात खोदत जाऊन कृत्रिमपणे उभा कडा निर्माण करून इथल्या विहारांची रचना केलेली आहे. त्यामुळे उंचीने इथले विहार तसे थोटकेच आहेत. जवळपास प्रत्येक विहारात पाण्याची टाकी खोदलेली आहेत. विहारांची रचनाही जवळपास सारखीच आहे. ओसरी, सभामंडप आणि आतमध्ये कक्ष अशी यांची रचना. बहुतेक विहारांत महायानकाळात खोदलेल्या विविध बुद्धप्रतिमा आढळून येतात.

१. कातळामध्ये कोरलेले जिना

२. विहारांची सर्वसाधारण रचना

३. विहार

४. विहार

लेणी क्र, ६७ चा विहार अत्यंत महत्वाचा. ओसरीच्या बाहेरच्या बाजूस कोरलेले खांब, ओसरी आतमध्ये सभामंडप आणि त्याच्या आत मध्ये मध्ये कोरलेले विश्रांतीकक्ष अशी याची रचना. हा विहार बोधिसत्वाच्या प्रतिमांनी अक्षरशः भारून गेला आहे. जिकडे बघावे तिकडे अतिशय सुंदर प्रतिमाच कोरलेल्या दिसतात.
बुद्ध कधी सिंहासनावर बसलेला आहे, कधी चौरंगावर बसलेला आहे तर कधी पद्मासन घालून आसनस्थ बसलेला आहे. कधी अवलोकितेश्वराच्या प्रतिमेत तो उभा राहून आशीर्वाद देतो आहे तर कधी कमळावरच पद्मपाणी बोधिसत्वाच्या रूपात ध्यानस्थ बसलेला आहे. नंद आणि उपनंद हे दोन नागशिष्य त्या कमळाच्या देठाला आधार देत आहेत. अतिशय सुंदर असा हा विहार आहे.

५. लेणी क्र. ६७ च्या ओसरीतील कोनाड्यांवर कोरलेल्या बुद्धप्रतिमा

६. विहाराचा अंतर्भाग

७. ध्यानस्थ बुद्ध

८. विविध बुद्धप्रतिमा

९. नंद आणि उपनंदाने आधार दिलेल्या कमळावर पद्मपाणी बोधीसत्व

इथून पुढच्या बहुतांश विहारांत कमी अधिक उठावदार अशा कोरीव बुद्धप्रतिमा नजरेस पडतात. बर्‍याच ठिकाणी ब्राह्मी लिपीतले कोरीव शिलालेखही दिसत जातात. बहुतेक शिलालेख त्या त्या विहारांच्या दातृत्वाचे आहेत. इथले ८९/९० क्रमांकाचे विहारही वैशिष्ट्यपूर्ण. इथल्या ओसरीतील स्तंभांवर थोडीशी कलाकुसर केलेली आढळते. ओसरीतील कोनाड्यात तसेच आतल्या विहारातही कोरीव बुद्धप्रतिमा स्तूप आदी प्रतिकांसह कोरलेल्या आहेत.

१०. लेण्यांतील काही सुघड प्रतिमा

११. शिल्पसौंदर्य

१२. लेण्यांतील काही सुघड प्रतिमा

१३ व १४. बुद्धप्रतिमेभोवती असलेले आकाशगामी गंधर्व

१५. अद्भूत शिल्पकला

आता आम्ही डोंगराच्या वरच्या पातळीतील सर्व विहार बघून पलीकडच्या बाजूच्या कातळातील जिन्याने खाली उतरायला लागलो. इथेही मध्ये मध्ये विहार आहेतच. काही विहारांत गाभारासदृश रचना दिसते. आतमध्ये भलीमोठी बैठी बुद्धप्रतिमा कोरलेली दिसते. सहाव्या सातव्या शतकातल्या लेणीतून मंदिरांकडे होत असलेल्या स्थित्यंतराचा हा प्रभाव.

१६. विविध पातळ्यांत खोदलेले विहार

१७. विविध पातळ्यांत खोदलेले विहार

आता लेणी क्र. ३४ पाशी आलो. या विहारात एक आश्चर्य दडलेले आहे. इथेही ओसरीत नेहमीप्रमाणेच बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. इथे अंतर्भागातील छतावर लक्षपूर्वक पाहा. उत्तर अजिंठा शैलीतील बोधिसत्वाचे एक अपूर्ण चित्र इथे रंगवलेले आहे. ध्यानस्थ बसलेला बुद्ध-चेहरा अपूर्णावस्थेत, त्याच्या आजूबाजूला नक्षीदार स्तंभ, बाजूला सेवक, वेलबुट्टीची ऩक्षी आणि बुद्धाचा अजून एक चेहरा असे सुरेखसे चित्र येथे चितारले आहे. जवळजवळ १६००/१७०० वर्ष होऊनही हे चित्र आजही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. छताला आधी शेणामातीचा,काथ्याचा गिलावा द्यायचा आणि नंतर त्यावर जैविक रंगात चित्र रंगवायचे अशी याची पद्धत. इथल्या काही लेण्यांत असे गिलाव्याचे थर बरेच दिसतात. यावरून अजूनही बरीच चित्रे येथे असली पाहीजेत असे अनुमान सहजी काढता येते.

१८. लेणी क्र. ३४ च्या छतावरील अपूर्ण असलेले रंगीत चित्र.

१९. बुद्धाचा चेहरा

२०. सेवक व नक्षीदार वेलबुट्टी

२१. चित्राचा अवशिष्ट भाग.

इथेच लेणी क्र. ३६ च्या व्हरांड्याच्या भिंतीवर सात ओळीचा एक शिलालेख कोरलेला दिसतो.

सिधं [|] रञो माडरिपुतस स्वामिसक्सेनस
सवछरे ८ गि प ५ दिवसे दिव १० एताय पुवाय क -
लियणकस नेकमस वेण्हुनंदिस पूतस नेग-
मस गहपतिस ...तिस लेण पतिठापि-
त सहा आय्य्केन.. सेन सहा पितुणा वेण्हुन-
दिना सहा मातुय बोधिसमाय सहा भा -
[तुना..]हथिना सहा [स]वेन [निकाययेनेति] [|*]

सिद्धी असो. राजा माढरीपुत्र स्वामी शकसेनाच्या राज्यकालाच्या संवत्सर ८, ग्रीष्म पक्ष ५, दिवस १० या पूर्वोक्त तिथीस कल्याणचा रहिवासी आणि व्यापारी विष्णुनंदी याचा पुत्र, व्यापारी आणि गृहपती....याने हे लेणे कोरविले. त्याच्याबरोबर आर्यक(पूज्य)...त्याचा पिता विष्णुनंदी, त्याची माता बोधिसमा, याचा भाऊ हस्ती आणि सर्व व्यापारी वर्ग सहभागी आहेत.

हा माढरीपुत्र सातवाहनवंशीय असावा. श्री यज्ञ सातकर्णीनंतर हा या प्रदेशाचा स्वामी असावा. याची काही नाणी आंध्रप्रदेशातही सापडलेली आहेत.

२२ व २३. काही शिलालेख

इथून पुढची लेणी एका अरुंद दरीने विभागली गेली आहेत. बर्‍याचश्या लेण्यांच्या खांबांची पडझड झाली आहे. इथला धुव्वाधार पाऊस, उतरता कातळ, बराचसा सच्छिद्र असलेला बेसाल्ट खडक आणि पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष या सर्व कारणांच्या एकत्रित परिणामी इथली लेणी ही मोडकळीस आलेली आहेत. सध्या त्यांचे दुरुस्तीचे काम चालू असलेले दिसले खरे.

२४. भग्न होत असलेले विहार

२५ जीर्ण स्तंभ

लेण्यांच्या कडेनेच असलेल्या अरूंद वाटेने एकेक लेणी बघत परत आधीच्या बाजूला आलो. इथे एक प्रचंड विहार खोदलेला आहे. बाहेरच्या बाजूला कलाकुसरीचे खांब आहेत. चौकोनी उतरता पट्ट्यांचा तळखडा, त्यावर चौकोनी आकाराचाच स्तंभ आणि वर घंटाकार आमलक अशी याची रचना. ओसरीवरच शिलालेख आणि कोनाड्यात बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. हे बघतच आतमध्ये प्रवेश केला. इथे प्रचंड संख्येने येणार्‍या बौद्ध भिक्खूंसाठी एक भोजनालयच खोदवलेले आहे. ताटे ठेवण्यासाठी समांतर रांगेमध्ये उंचवट्याच्या दोन सपाट लाद्याच कोरलेल्या आहेत. आतल्या बाजूला बहुधा शिधा ठेवण्याचे कक्ष आहेत. तिथेही बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेतच.

२६. भोजनविहार

२७. तिथल्या ओसरीवरील कलाकुसर केलेले स्तंभ

२८. ताटे मांडण्यासाठी केलेली सपाट लाद्यांची रचना

२९. भोजनभाऊ मिपाकर

तिथून बाहेर आलो. उरलेले विहार बघतच परत चैत्यगृहापाशी आलो. उन्हामुळे कावलेल्या मिपाकरांनी आता ओसरीवरच मस्तपैकी ताणून दिली. विलासरावांचे तैवान, पट्टायाचे रमणीय अनुभवकथन, आशूचे परिक्रमेतील विविध अनुभव सांगणे सुरुच होते. थोडावेळ तिथेच विश्रांती घेऊन परतीच्या वाटेवर लागलो.

३०. उन्हातान्हात कावलेले मिपाकर

३१. एका पेटत्या दुपारी

३२ निवांपणे हास्यविनोदात दंग

नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर जाणारी बस उभीच होती. बोरीवलीला जेवण करून पुढे बाकीचे आपापल्या वाटांनी घरी गेले. मी, मोदक, विलासराव आणि आशूने मात्र फोर्ट एरियात एक मस्त फेरफटका मारून काही पुस्तकांची खरेदी केली. आम्हाला सीएसटीवर सोडून दोघे गिरगावात गेले आणि दख्खनची राणी पकडून पुणे गाठले ते लवकरच घारापुरीला यायचा संकल्प करूनच.

समाप्त

मिपाकरांसोबत जरी हे लेणीदर्शन असले तरी प्रत्यक्षात मिपाकरांबरोबर घडलेल्या गप्पाटप्पा, झालेल्या गंमतीजमती याचा उल्लेख लेखात फारसा, किंबहुना काहीच आलेला नाही. सहभागी मिपाकर यथाशक्ती भर घालतीलच.
सहभागी मिपाकरः किसन शिंदे, आत्मशून्य, विलासराव, मोदक, स्पा, सौरभ उप्स आणि अस्मादिक