सिधं||
रञो गोतमिपुतस सामिसिरिसातकणिस सवछरे १०[+*]६ गि-
म्हाण पख १ दिवस ५ कालयाणवाठवस नेगमस अण-
दपुतस उसा(पा)सकस अ[रेणुस स[प]रिवारस सहा
कडुबिनिय आनदमातो [जु] वारिणिकाय सहा बालकेन अणदेन
सह च सु[ण्हा] हि अण . . ल. सिपे [च]धामदेविय
सह च . . . वेण अह[वि]अपण मातापितरो(रा) उदिस
पावते कण्हसेले लेणं कोठि च देयधा[मं] चातुदिसे
भिखुसघे पडितापित सावस [ता]णं हितसुघथ |
सिद्धी असो!
राजा गौतमीपुत्र स्वामी श्रीसातकर्णी याच्या राज्यकालाच्या १६व्या संवत्सराच्या ग्रीष्म (ऋतूचा)पक्ष १, दिवस ५ या दिवशी कालयाण (कल्याण) येथे राहणारा व्यापारी, उपासक, आनंदाचा पुत्र अपरेणु याने आपल्या नातलगांसह, आपली पत्नी व आनंदाची माता जुवारिणिका, बालक आनंद व आपल्या सुना ..धामदेवी यांच्यासह आपल्या मातापित्यांच्या पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने या कृष्णशैलावर सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ, चारी दिशांच्या भिक्षुसंघाकरिता हे लेणे व हे सभागृह कोरविले आहे.
कान्हेरीतील क्र. ८१ च्या लेण्यातील व्हरांड्याच्या डाव्या बाजूला कोरलेला ह्या शिलालेखात कान्हेरीच्या प्राचीन नावाचा कृष्णशैल अथवा कृष्णगिरी असा उल्लेख येतो.
आदल्या दिवशी वसईचा किल्ला पाहून आम्ही सकाळी ६ वाजता किसनदेवांकडून निघालो ते ठाणे बस स्थानकात जरा उशिराच पोहोचलो. स्पा व नवमिपावर सौरभ उप्स हे आमची वाटच पाहात होते. ठाणे बोरीवली बस पकडून थेट बोरीवलीच्या राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच थडकलो. थोड्याच वेळात विलासराव व आत्मशून्य येऊन पोहोचले. उद्यानाच्या प्रवेशद्वारातूनच कान्हेरी लेण्यांकडे जाण्यासाठी मिनीबस तसेच प्रवासी व्हॅन्सची सोय आहे. गाडी पकडून १५ मिनिटातच कान्हेरी लेण्यांपाशी येऊन पोहोचलो.
एकूण १०९ लेण्यांचा हा समुच्चय. एक चैत्यगृह व बाकीचे सर्व विहार अशी यांची सार्वत्रिक आढळणारी रचना. इ.स. पूर्व १०० ते इ.स. ७/८ इतका मोठा काळ यांच्या निर्मितीचा. हीनयान, महायान कालखंडात विभिन्न दात्यांनी खोदलेल्या या लेण्या. सातवाहन, क्षत्रप, चुटु इ. विविध राजवटींनीही यांचा भार वाहिलेला.
कान्हेरी हे शूर्पारक(सोपारा), वस्य(वसई), कालयाण(कल्याण) या बंदरांनजीक वसलेले. साहजिकच सार्थवाहांचे, श्रमणांचे वर्षावासातील विश्रांतीस्थळ, बौद्ध धर्मप्रसारकांचे मोठे ध्यानकेंद्र. साहजिकच इथे प्रचंड संख्येने लेणी घडवल्या गेल्या. इतक्या प्रचंड संख्येने लेणीसमूह असलेला हा भारतातील एकमेव शैलगिरी. जुन्नरलेणी संख्येने सर्वाधिक आहेत (२००+) पण त्या जवळ जवळ असलेल्या वेगवेगळ्या डोंगरांवर.
तिकीट काढून आत प्रवेश करते झालो.
पहिलेच लेणे अपूर्णावस्थेतील एक दुमजली विहार आहे. दोन भव्य स्तंभ, व्हरांडा, आतमध्ये विश्रांतीकक्ष अशी यांची रचना. स्तंभ रचना तशी साधारणच आहे. किंबहुना एकूणच लेणीसौंदर्याच्या दृष्टीने पाहीले जाता कान्हेरीची लेणी तशी कमी प्रतीचीच आहेत. पण इथली महायान कालखंडात खोदली गेलेली शिल्पे अप्रतिमच आहेत.
दुसर्या क्रमांकाच्या लेण्यांत दोन वेगवेगळ्या कक्षांत दोन स्तूप कोरवलेले असून स्तूपांभोवती बुद्धप्रतिमा फेर धरून आहेत. बुद्धाच्या अवलोकितेश्वर या स्वरूपात ह्या प्रतिमा खोदवलेल्या आहेत. बुद्धाभोवती आकाशगामी यक्ष, गंधर्वांच्याही प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे स्तूप कान्हेरीतील प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधलेले असावेत. हा विहार तसा खुल्या स्वरूपाचा, अंतर्भागात जास्त खोदकाम केलेले नाही.
१. लेणी क्र. १- भव्य दुमजली विहार

२. लेणी क्र. २ मधील पहिला खोदीव स्तूप

३. लेणी क्र, २. दुसरा खोदीव स्तूप व त्याभोवती फेर धरलेल्या बुद्धप्रतिमा

४. बुद्धप्रतिमा थोड्या जवळून

५. अवलोकितेश्वर व त्याच्या भोवतीचे आकाशगामी गंधर्व

तिसर्या क्रमांकाचे लेणे हे येथील एकमेव चैत्यगृह. कार्ले लेण्यातील भव्य चैत्यगृहाची जणू प्रतिकृतीच. किंबहुना कार्ले चैत्यगृह डोळ्यांसमोर ठेवून त्याबरहुकुम केलेली ही रचना. फक्त इथे नेहमीचे पिंपळपानाकृती कमानदार सुघड वातायन मात्र कोरलेले नाही. अगदी साधीच अशी कमानदार रचना आहे.
बाहेरच्या बाजूला द्वारपाल यक्ष, पायर्या चढून जाताच आत प्रांगण. तिथेच दोन भव्य सिंहस्तंभ भिंतींना लगटूनच कोरलेले. अशोककालीन सिंहस्तंभासारखी ही रचना. कार्ले येथे सध्या एकच सिंहस्तंभ असला तरी तेथे पूर्वी दोन सिंहस्तंभ होते याला दुजोरा याच कान्हेरीच्या चैत्यगृहातून मिळतो. दोन स्तंभांपैकी एकावर सिंह तर दुसर्यावर य़क्ष कोरलेले आहेत. प्रांगणाच्या कोपर्यात हे दोन्ही स्तंभ असल्याने ते उठून दिसत नाहीत
६. लेणी क्र. ३ -चैत्यगृहाचे मुखदर्शन व दोन्ही बाजूंना खोदलेले सिंहस्तंभ

७. सिंहस्तंभांच्या तळखड्यात असलेल्या यक्षप्रतिमा

८ व ९. शेजारीच असलेल्या भिंतींवर कोरलेली स्तूपरचना (हे शिल्प आठव्या शतकातले, एकावर एक असे तीन छत्र असलेली अशी शैली त्याकाळात निर्माण झाली)

ओसरीतल्या जवनिकेवर जोडप्यांच्या प्रतिमा खोदलेल्या आहेत. कार्ल्याला आहेत तसेच सालंकृत स्तंभ येथेही आहेत पण कार्ल्याची सर याला नाही. ह्या आतील स्तंभांवरच दोन्ही बाजूंना शिलालेख कोरलेला आहे.
रञो गोतमि [पुतस सामिसियञ ]
सातकणिस [संवछरे .......गि-]
म्हपखे पंचमे [५ दिवसे ........]
वाणिकजेहि उतू ............
णुं उपंनेहि गा ........
खातियेहि भातूहि...............
गजसेनेन गजमि [तेन].......
कपठायि चेतिय..........
आचरियानं निकायस....भदाय
नीयानं परिगहे पतिठापितं......मा-
तापितूनं अभतीतानं.....
पूजाय कुडुबिनीन बालकानं बालि[कानं]
सवतस भागिनेयान निकायस नाति-
वगस च अग पटिअसिय सव्वस्[तानं]
हिसुखाय हेतु| एथ च नव [कमि]
का पवजितो थेरा भदत अचला भादंत
गहला भदंत विजयमिता भदत बोधिको
भदत धमपाला उपासको च नेगमो अनद-
युतो अपरेनुको स्मापिता | आचरियान थेराणं
भदत सेउंलानं सिसेन उपर्खितन भ-
दत बोधिकेन कत सेलवढकिहि [नाय]कमि-
सेहि कढिचकेहि महाकटकेहि खदर-
किना च मीठिकेना |
राजा गौतमीपुत्रस्वामी श्री यज्ञ सातकर्णीच्या संवत्सर ग्रीष्म ऋतूच्या पाचव्या पक्षातील ..णू चे पुत्र खातिय, भाऊ गजसेन आणि गजमित्र यांनी हे कल्पांतापर्यंत टिकणारे चैत्य भदायनीय आचार्यांच्या संघाचे म्हणून, आपल्या निधन पावलेल्या मातापित्यांच्या सन्मानार्थ, तसेच आपली भार्या, पुत्र, कन्या, सावत्र बंधू, सर्व भाचे व ज्ञातिवर्ग यांच्या तसेच सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ स्थापन केले. यावर देखरेख ठेवणारे प्रव्रजित स्थविर भदंत अचल, भदंत गहल, भदंत विजयमित्र, बदंत बोधिक, भदंत धर्मपाल्, उपासक व्यापारी आनंदाचा पुत्र अपरेणुक यांनी हे काम पूर्ण केले. या कामावरील अधीक्षक आचार्य स्थविर शैवल यांचा शिष्य भदंत बोधिक याने लेणे खोदणारे पाथरवट(शैलवर्धक), कारागीर आणि उजाळा देणारा स्कंदरकि याच्या साहाय्याने हे काम पूर्ण केले.
१० व ११. ओसरीवर असलेला हा श्री यज्ञ सातकर्णीच्या काळत खोदलेला लेणीनिर्मितीचा शिलालेख

ओसरीवर डाव्या उजव्या बाजूंना समोरासमोर अशा दोन भव्य बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. जणू ह्या प्रतिमा आरशासमोर उभे राहून आपलेच रूपडे न्याहाळत आहेत इतक्या जिवंत. बुद्धाच्या चेहर्यावरची शांत मुद्रा, मिटलेले नेत्र, आशिर्वाद देण्यासाठी उपडा केलेला तळहात, अंगावरचे उत्तरीय सारेच कसे निगुतीने कोरलेले.
डावीकडेच एक विश्रांतीकक्ष आहे तिथेही दोन सूंदर, अतिशय रेखीव अशा बुद्धमुर्ती कोरलेल्या आहेत.
इथल्या ह्या बुद्धमूर्तीमुळेच इतर लेण्यांमध्ये दिसणारी वर वर चढत जाणारी कमानदार गवाक्षांची रचना इथे कोरलेली नाही. महायानकाळात लेणीनिर्मितीच्या झालेल्या स्थित्यंतराचा हा प्रभाव.
१२. ओसरीवर खोदलेली भव्य बुद्धप्रतिमा

१३. शेजारीच असणार्या अजून काही प्रतिमा

१४. शेजारीच असणार्या अजून काही प्रतिमा

१५. दांपत्याच्या प्रतिमा

१६. चैत्यगृहाच्या प्रवेशपट्टीकेवर कोरलेल्या प्रतिमा

आतील चैत्यही कार्ल्याप्रमाणेच भव्य फक्त त्याहून थोडासाच लहान.
दोन्ही बाजूंना एका एका ओळीत कोरलेले स्तंभ, स्तंभांच्या शेवटाकडे मध्यभागी असलेला चैत्य, त्याभोवती प्रदक्षिणापथ व वरती गजपृष्ठाकार कोरलेले छत अशी याची रचना. आजूबाजूच्या स्तंभांवर हत्ती, वृषभ व त्याआरूढ स्त्रीपुरुषांच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यापैकी स्तूपाचे पूजन करणारे दोन्ही बाजूंना असलेले हत्ती व नागमुकुट धारण करणारे स्त्रीपुरुष ही प्रतिमा विशेष उल्लेखनीय. बहुतेक सर्व स्तंभावंर अशाच प्रतिमा आहेत. उजवीकडच्या काही स्तंभांचे काम मात्र अर्धवट राहिलेले दिसते.
मुख्य चैत्य हा गुळगुळीत आहे मौर्यकालीन झिलईच्या कामाचा यावर प्रभाव. तळखडा, वेदिकापट्टी, अण्ड इतकाच भाग सध्या शिल्लक आहे. वरची हर्मिका आणि त्यावरील लाकडी छ्त्र गायब आहे. छतावर असलेल्या लाकडी फासळ्या संपूर्णपणे गायब आहेत. आजमितीला त्या बसवण्यासाठी असलेल्या खाचाच फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत.
विलक्षण शांतीचा अनुभव ह्या भव्य दिव्य चैत्यगृहात येतो.
१७. कान्हेरी चैत्यगृह व मुख्य स्तूप

१८. चैत्यगृहांतील स्तंभावर असलेल्या प्रतिमा

१९. स्तंभावर असलेले एक देखणे शिल्प (नागमुकुट घातलेले स्त्रीपुरुष)

चैत्यगृहाच्या शेजारच्याच एका छोट्याश्या लेण्यात एक रेखीव स्तूप कोरण्यात आलेला आहे. स्तूपाची हर्मिका व त्यवरील दगडीच असलेले छ्त्र जे छतालाच भिडवलेले आहे. स्तूपाच्या अण्डाभोवती चैत्याकार कमानीत बसलेल्या बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. याचा बहुधा बराच नंतरचा असावा. ४/५ व्या शतकानंतर स्तूप कोरण्याच्या शैलीमध्ये अशा प्रकारचा बदल झाला.
२०. चैत्यगृहाशेजारचे एक लहानसे लेणे

२१. स्तूप अगदी जवळून

उर्वरीत सफर पुढच्या भागात.
क्रमशः
मिपाकरांसोबत जरी हे लेणीदर्शन असले तरी प्रत्यक्षात मिपाकरांबरोबर घडलेल्या गप्पाटप्पा, झालेल्या गंमतीजमती याचा उल्लेख लेखात फारसा, किंबहुना काहीच आलेला नाही. सहभागी मिपाकर यथाशक्ती भर घालतीलच.
सहभागी मिपाकरः किसन शिंदे, आत्मशून्य, विलासराव, मोदक, स्पा, सौरभ उप्स आणि अस्मादिक