इशान्य भारतातील यावेळची माझी आसाम मधील पहीली असाइनमेंट होती गोसाईगाव या सब डिव्हीजन असलेल्या शहरात. येथे सेवा भारतीचे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्याचे अकाउंटस नियमीत करण्याची जवाबदारी मला दिल्या गेली होती. या भागात मला पुढे एकट्याने जाता यावे व या भागाची व तेथील कार्यकर्त्यांची माहिती मला व्हावी या हेतुने उल्हासजीनी मला त्यांच्या प्रवासात येण्याबद्दल सुचविले. त्याप्रमाणे मी २७/१/२०१२ ला सकाळी उल्हास जी व आमचा ड्रायवर कार्यकर्ता असे तिघे संस्थेच्या बोलेरोने प्रवासाला निघालो. बरपेटा येथे एक कार्यकर्ता आम्हाला सामील झाला मग आम्ही बोंगाइगाव येथील त्या भागात कार्य करणार्या श्री ब्रम्हा या बोडो कार्यकर्त्याच्या घरी चहा व नाश्त्या साठी थांबलो. तेथील प्रकल्पाचे को-ऒर्डिनेशन यांच्या कडे असल्याने त्यांच्या घरी चर्चा करुन आम्ही तेथील कामाचा आढावा घेतला. तेथुन मग आम्ही गुरुफेला या गावी गो-ग्राम प्रकल्पावर गेलो.येथे शंकरदेव शिशु निकेतन या नावाने सभोवतालच्या गरिब मुलांसाठी शाळा चालविल्या जाते.

हा प्रकल्प संस्थेच्या ३ एकर जागेवर उभा असुन. गावातील घरे हे पर्यावरणाशी सुसंगत कशी असावी या साठी एक घर बांधुन उभे केले आहे.




परिसरात उपलब्ध असलेल्या सामग्रिच्या सहाय्याने हे घर स्थानिक लोकांच्या सहाय्याने उभे करण्यात आले आहे. परिसरात समोर फुलझाडे व परसात भाजीची लागवड करण्यात आली आहे.



त्याच प्रमाणे औषधी झाडे सुध्दा लावण्यात आली आहेत ज्यात अश्वगंधा हे मुख्य औषधाची रोपे आहेत.



तसेच प्रत्येक घर आर्थीक दृष्ट्या स़क्षम असावे या दृष्टीने परिसरात ज्युट ची लागवड करुन पिके आल्यावर त्यावर प्रक्रिया करुन त्याचा ताग तयार करुन त्याद्वारे विविध वस्तु तयार करण्याचे शिक्षण येथे दिल्या जाते.

या तयार वस्तु संस्था रास्त भावाने विकत घेउन त्या गोहाटीच्या बाजारात विक्रि करण्याची व्यवस्था देखील याच संस्थेद्वारे होइल अशी योजना आहे.


ज्युट लागवड व प्रोसेसींग साठी आवश्यक पाणी हे जवळच असलेल्या गावातील नदि पुरवते. ही नदी पुर आल्यानंतर नेहमी आपले पात्र बदलत असल्याने स्थानीक लोक हीला पगली नदी म्हणतात.

संस्थेने येथे आरोग्य मित्र देखील ठेवले आहेत्त ते ग्रामीण लोकांचे स्वास्थ्य निट रहावे या दृष्टीने योग्य मार्गदर्शन तर करतातच पण याशिवाय ते त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे दृष्टीने आवश्यक ते शिक्षण घेउन तज्ञ असतात. तसेच तेथील शिक्षीत ग्रामस्थांना प्रथमोपचार व विशिष्ठ आजारावर योग्य ते औषधोपचार करण्याचे देखील शिक्षण देतात. अशा अनेक आरोग्यमित्रांची फळी ही आसपासच्या गावात स्वास्थ्य संवर्धनाचे कार्य करित असते. शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगार या तिन आघाडीवर सुदुर व जाण्यास अवघड गावात ही संस्था व त्यांचे कार्यकर्ते लढत आहेत.