गोव्यात मी जातो ते स्थलदर्शनासाठी अशी माझ्या हिची समजूत आहे. पण मला सांगा, आपण आपल्याच गावात म्युझियम किंवा चर्च बघायला जातो का? किती पुणेकर शनिवारवाडा निरखून पाहतात?
अर्थात मी काही तशा अर्थाने गोव्याचा नाही. सहज फिरायला म्हणून गोव्यात जाता जाता जात गेलो आणि तिथलाच झालो, असं काहीसं झालं.
गोव्याला गेल्यावर दोन खाण्यापिण्याच्या ठिकाणांमधे प्रवास करताकरता निसर्गसौंदर्य दिसतंच की.. त्यासाठी अर्ध्या अर्ध्या दिवसांच्या साईटसीईंग टूर्स घेणं मला मानवत नाही.
असो.. एवढ्याने माझे मूळ उद्देश जाहीर झाले असतील असं समजून मी आता बराच काळ "मस्ट व्हिजिट लिस्ट" मधे असलेल्या "मार्टिन्स कॉर्नर"च्या ताज्या भेटीचा वृत्तांत जमेल तितका थोडक्यात देतो.
मला वाटतं वीसेक वर्षांपूर्वी मिस्टर मार्टिन आणि मिसेस कारफिना परेरा या गोयंकार जोडप्याने घरच्याघरीच सुरु केलेल्या कोल्ड्रिंकच्या दुकानाने या "कॉर्नर"ची सुरुवात झाली. कॅरम पत्ते वगैरे खेळत संध्याकाळी कट्टे भरवणार्या आपल्यासारख्याच लोकांचं ते आवडतं ठिकाण झालं होतं. रोजचा कल्ला करण्याचा हँगआउट.
गोवन सॉसेज हा बराच मसालेदार प्रकार असतो. तो पावासोबत खाण्याची मजा औरच. कोल्डड्रिंक्सच्या जोडीला परेरांनी हळूहळू सॉसेजपाव आणि अशाच सिलेक्टेड डिशेस सर्व्ह करायला सुरुवात केली. त्यांच्या हातच्या अफलातून चवीला मागणी इतकी वाढायला लागली की दोनाची चार टेबलं करत हळूहळू व्याप प्रचंड वाढत गेला. आता नव्या पिढीचे तीन परेरा बंधू हे हॉटेल चालवतात.. पण अजूनही कारफिनाबाई पूर्णवेळ जातीने अन उत्साहाने हॉटेलच्या "चवी"च्या डिपार्टमेंटमधे लक्ष घालतात.
आता तर हे ठिकाण इतकं प्रसिद्ध झालंय की सचिन तेंडुलकर, अमिताभ वगैरे सेलेब्रिटीज तिथे आवडीने येतात. जाहिरात करायला किंवा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नव्हे.. खरंच चवीने खायला.
इतक्या माहितीनंतर, विशेषतः तेंडुलकर आणि अमिताभ वगैरे ऐकून मला वाटायला लागलं की हे अजून एक ओव्हर हाईप्ड ठिकाण दिसतंय.. म्हणून आवर्जून जाण्याची इच्छा झाली नाही.
यावेळी मात्र काही जेन्युईन शिफारसींमुळे मार्टिन्सला जायचंच असं ठरवलं आणि ते घडवूनही आणलं. मार्टिन्सविषयी लिहिणार्या बोलणार्या सर्वच लोकांनी एकमुखाने आणि ठळकपणे उल्लेख केला होता की इथे भयंकर गर्दी असते आणि आधी नंबर लावून ठेवलात तरच टेबल मिळेल. हे ऐकून मी दुपारी दोन वाजतासाठी लंचचं बुकिंग करायला आणि तेव्हा टेबल नच मिळाल्यास रात्रीचा नंबर तरी लागावा म्हणून दुपारी बाराच्या सुमारासच बेताळभाटीला पोचलो. बेताळभाटी बीचपासून किलोमीटरभर अंतरावर असलेल्या मार्टिन्स कॉर्नरमधे पुरेश्या दिशादर्शक बोर्डांमुळे न चुकता पोचलो. पार्किंगसाठी भरपूर जागा पाहून सुखावलो.
समोर पाहतो तर एक सुरेख कौलारु टिपिकल गोवन घर समोर आलं.

"नंबर लावायला" म्हणून आत पाऊल टाकलं आणि बघतो तर या सुंदर घराच्या ओसरीवर सगळं हॉटेल होतं.. आणि तेही संपूर्ण रिकामं.. फक्त एका कोपर्यात चारपाच गोरे लोक बियरचे घुटके घेत बसले होते.
एंट्रीलाच डावीकडे एका काचेरी पेटीत भावी भक्ष्य ठेवलेलं दिसलं.

सर्वच समुद्रीजीव इतके ताजे दिसत होते की जवाब नही..
घरगुती कशाला म्हणायचं या जागेला..? घरच ते मुळातलं..

एका भल्याथोरल्या घरातच उंचसखल, वेगवेगळ्या जागी टेबल्स ठेवलेली होती आणि जाण्यायेण्याच्या वाटेवर आजुबाजूला वाईन्स आणि गोडधोडाचीही रेलचेल दिसत होती..

ते बघून जिवाला बरं वाटलं.. आणि त्या कौलारु छपराखाली एक कोपर्यातलं टेबल पकडून बसल्यावर तर एकदम शांत सुशेगातच वाटलं. आजुबाजूला मान वळवली आणि बघितलं तर एकीकडे डोळ्याला थंड गारवा देणारा अन घरगुती सेटअपमधे बसलेला लाकडी बार होता..

अगदी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंपासून सर्व भिंती मारिओ मिरांडासाहेबांच्या डीटेलवार काढलेल्या खास चिरपरिचित कार्टून्सनी भरलेल्या होत्या. मुंबईतल्या आवडत्या कॅफेमधे त्यांच्या चित्रांसोबत ऊठबस असते.. इथल्या त्या भिंतींमुळेच त्यांच्या आपल्यातून जाण्याची जाणीव एकदम अंगावर आली.
मेनूकार्ड समोर आलं आणि पुन्हा एकदा मिरिंडांच्या कार्टूनने समोर येऊन हसवलं.

मेनू भरगच्च दिसत होता. मद्य आणि कॉकटेल्सनीही बरीच पानं भरली होती. त्यात लॉं आयलंड, मार्गरिटा, मोहितो, सेक्स ऑन सनसेट बीच अशा नेहमीच्या नावांसोबत कोको लोको आणि मार्टिन्स स्पेशल कॉकटेल अशी दोन नावं दिसली.
पैकी कोको लोकोमधे नारळाची फेणी, जिन, व्हाईट रम, अननसाचा रस आणि नारळाचं दूध असं मिश्रण होतं.. आणि मार्टिन्स स्पेशल कॉकटेलमधे नारळाची फेणी आणि पीच, संत्रं, अननस वगैरे फळांचे ज्यूसेस होते.
ही दोन्ही फेणी कॉकटेल्स मागवली. त्यासोबत चाखायला काहीतरी हवं म्हणून गोव्यातला खास चणक मासा मागवला. हे पहा कॉम्बो:


ही चणक म्हणजे आंबटगोड आणि तिखट असा अफलातून प्रकार होता. नाक पुसत पुसत खावा लागला पण चटक लावूनच संपला.. गोव्यातला खास मसाला ओघळेपर्यंत लावून खरपूस परतलेला हा लईभारी प्रकार होता.
कोको लोकोमधे नारळाचं दूध एकदम दाट होतं. एखाद्याला हे खूप आवडू शकेल, पण मला खूप नाही आवडलं. दुधात दारु घातल्याचा फील येत होता. मार्टिन्स स्पेशल कॉकटेल मात्र मस्तच..
मेनूत ओळखीचे बरेच पदार्थ होते. पण काही लक्षवेधी म्हणा किंवा स्पेशल वाटलेले म्हणा, त्यांची नावं इथे देतोय :
-मार्टिन्स एक्झॉटिक सी-फूड प्लॅटर (यात किंग क्रॅब मसाला फ्राय (सचिनचा फेवरिट), लॉबस्टर थर्मिडर, बटर गार्लिक टायगर प्रॉन्स, तंदूरी स्नॅपर हे सर्व एकत्र होतं)
-क्रॅब मसाला फ्राईड
-लॉबस्टर रेचिआडो.. (उच्चारी चूभूदेघे)
-प्रॉन्स बाल्चाव, किंगफिश बाल्चाव
-मटण सागुती
-प्रॉनकरी राईस
-फिश टिक्का
-फिश फिंगर्स
-फ्राईड शिंपल्या
-बॅटर फ्राईड किंवा मसाला फ्राईड म्हाकुळ
-गोवन पोर्क सॉसेजेस
-पोर्क चिली फ्राय
व्हेज ऑप्शन्स पहावेत म्हणून पत्नीसाठी मागवण्याच्या निमित्ताने हरेभरे कबाब मागवले. मस्तशा ताज्या चटणीसोबत गोव्याचा टच म्हणून काजूंनी सढळपणे जडवलेले खमंग आणि खुसखुशीत असे चविष्ट कबाब. आपण तर फिदाच झालो.

मग वेळ आली मेन कोर्सची. आधी एक नुसती विनाकॉकटेलवाली साधी नारळाची फेणी मागवली आणि सोबत नेहमीच्या पद्धतीने सिग्नेचर डिश म्हणून फिशकरी अन राईस मागवला. जेव्हा तो प्रकार समोर आला तेव्हा मी बेहद्द खूष झालो. भारीभारी हॉटेलांमधेही फिशकरी राईस म्हणजे फक्त एका वाडग्यात करी आणि एकात भात इतकंच देतात. पण मार्टिन्समधे मात्र त्यांनी तेवढंच न देता दिलखेचक ओरिजिनल खास गोवेकरी रंगाच्या फिशकरी सोबत एक अतिखमंग परतलेला मासा वेगळा दिला होता.


शिवाय किसमूर ही जबरदस्त टेसदार झिंग्यांची चटणी आणि एक वेगळंच आंबटगोड घरगुती गोवन लोणचं. या किसमूरची पाककृती तेवढी द्या हो कोणीतरी.
किसमूर..


हे अफलातून लोणचं कसलं आहे आणि कसं बनवलं हे वेटरला सांगता आलं नाही. ते इथे घरीच बनवतात इतकंच तो सांगू शकला. पण पारंपरिक लोणचं असावं गोव्यातलं.

फिशकरी जीवघेणी चविष्ट होती. आहाहा.. तो खरपूस मासा, फिशकरी आणि भात यांनी एकत्र मिळून पूर्णब्रह्माचा अनुभव दिला.
त्यानंतर काही नसतं तरी चाललं असतं. पण हॉटेलचा पूर्ण अनुभव घ्यायचा म्हणजे डेझर्ट हवं. बेबिंका हे गोव्यातलं प्रसिद्ध डेझर्ट मागवलं. खोबरं वापरुन आणि थरावर थर दिलेला हा पदार्थ सांदण किंवा हलवा किंवा तत्सम काहीश्या चवीचा वाटला. बराच आवडलाही. त्यासोबत आईसक्रीमही होतं.

शिवाय अनेक केक्स, पेस्ट्रीज आणि पुडिंग्जनी भरलेलं कपाट साद घालत होतं. कॅरामेल कस्टर्ड भारी दिसत होतं पण पोटात आणखी काही भरणं शक्य नव्हतं. पुढच्या भेटीसाठी ते शिल्लक ठेवलं..

बिलही फार झालं नाही. अशा दर्जाच्या हॉटेलच्या मानाने तसं खूपच कमी वाटलं.
बाहेर पडलो ते जड उदर आणि तृप्त मन घेऊन...
शंभर टक्के शिफारसपात्र ठिकाण आहे हे..
जियो मार्टिन्स कॉर्नर.. जियो परेरा ब्रदर्स.. फिर मिलेंगे..
.........................