गडदेचा बहिरी

दूर सह्याद्रीच्या कडेकपारीत मुग्ध होऊन बसलेल्या ढाकच्या बहिरीला प्रकाशात आणण्याचे श्रेय जाते ते गोनिदांना.आतापर्यंत केवळ तिथल्या ठाकरांमध्येच परिचीत असणार्‍या ढाकच्या बहिरीची सर्वसामान्यांना ओळख झाली ती गोनिदांच्या 'गडदेचा बहिरी' या कादंबरीवाटे.

सुहासच्या इर्शाळच्या जबरदस्त चढाईमुळे पुर्वी आम्ही केलेल्या ढाकच्या बहिरीच्या सफरीची आठवण ताजी झाली .

पिंपरीहून आम्ही ८ जण रात्री ९.३० च्या लोकलट्रेनमध्ये बसून तासाभरातच लोणावळ्याला उतरलो. तुंगार्ली, पांगळोली मार्गे राजमाचीच्या वाटेवर लागलो. पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणारा फाटा डावीकडे ठेऊन ४ तासांची १६ किमीची प्रदीर्घ वाटचाल संपवून रात्री कधीतरी वळवंड गावात पोहोचलो. मंदिरात पथार्‍या टाकून दिल्या व शिणलेल्या अंगाला जरा आराम दिला, परत पहाटे लवकर उठून पुढच्या १२/१५ किमीची ढाककडे जाणारी वाट पकडली. सुरुवातीची एक दमछाक करणारी खडी चढण चढून आपण पुन्हा सह्यधारेवर येतो. पाठीमागे राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले दिसत राहतात, शेजारी मांजरसुंबा आभाळात घुसलेला दिसतो. अरूंद असा तो ट्रॅव्हर्स पार करता करताच दूरूनच ढाकचा महाकाय पहाड अचानक नजरेसमोर उभा राहतो. त्याचे भव्य दर्शन अगदी भयचकित करणारे असते.

ट्रॅव्हर्स पार करताच एक झळझळीत उतार लागला, जवळपास घसरगुंडी करूनच आम्ही खालच्या पठारावर आलो. इथे कोंडेश्वरवरून ढाकला येणारा दुसरा जवळचा मार्ग आहे. इथून आता सह्याद्रीच्या पदरातल्या दाट झाडीत आम्ही शिरलो. इथे जाळी वेलींचे अ़क्षरश: साम्राज्य पसरले आहे. पायातळी वाळलेला पालापाचोळा पसरलेला होता. मधूनच एखादा हुप्प्या दात विचकून जात होता, स्वर्गीय नर्तक मधूनच दर्शन देत होता, तांबटाची किटीर किर्र अशी साद ऐकू येत होती.

१. दूरून होणारे ढाकच्या पहाडाचे अद्भूत दर्शन

२. ढाक व कळकराय सुळका

३. ढाक व कळकराय सुळकायांमधील खिंड

आता परत ढाकच्या चढणीला लागलो. तीव्र अशी चढण चढून ढाकच्या भेदक असा कळकराय सुळका आणि ढाकच्या पहाडाला जोडून असलेल्या खिंडीपाशी आलो. पहाडाच्या जवळजवळ २/३ उंचीवर ही खिंड आहे. माथ्यावर काही पाण्याची टाकी, काही फुटकळ अवशेष आहेत. बाकी किल्ल्यावर पाहण्यासारखे काहिही नाही. ढाकला जाणार्‍यांचे लक्ष्य असते ते तिथल्या कड्यातल्या अनवट गुहेत-गडदेत जाउन बसलेल्या बहिरीकडे.

आता आम्ही खिंडीच्या मुखात होतो. जेमतेम एक माणूस कसाबसा जाईल इतकीच अरूंद ही खिंड, अत्यंत घळघळीत उतार, घसार्‍याची वाट यामुळे उतरणे अत्यंत जिकीरीचे होत होते. खिंड संपताना शेवटी एक छोटासा रॉकपॅच आहे. पुढे खाली ३५०० फूट गेलेली पाताळवेरी खोल दरीतून होणारे कोकण दर्शन व शेजारी उंचच उंच ढाकचा कातळ असे अनोखे दृश्य दिसते.

४. निरूंद खिंड

५. खिंड संपतानाचा छोटासा पण अवघड भासणारा रॉकपॅच

खिंड उतरल्यावर आता परत इथे ट्रॅव्हर्स लागतो इथेही जेमतेम फूटभर वाट कड्याला लगटूनच जाते. शेजारी खोल दरी, साधारण दीडेकशे मीटर्स गेल्यावर कड्यात एके ठिकाणी वर जाणार्‍या खोदीव पावठ्या दिसतात. जणू स्वर्गारोहण मार्गच. आमच्या पूर्वीच इथे पुण्याहून गिरीदर्शनचा ट्रेकिंग ग्रूप ३०/४० जणांना घेऊन आले होते व मार्गावर त्यांनी सुरक्षिततेसाठी दोर लावले होते. निसर्गाचे रौद्र दर्शन पाहून भयचकित झालेल्या आम्हास आयताच आधार मिळाला. दोराचे आधार घेऊन पावठ्या चढून गेलो आता जेमतेम एक पाउल मावेल इतकीच निरुंद वाट परत उजवीकडे वळून हळूहळू वर चढत जाते. कड्याला बिलगून, दोरांचा आधार घेउन हा चाळीस एक फूटांचा टप्पा कसाबसा पार केला.

आता ऐन कड्यातली गुहा खुणावयाला लगलेली दिसते. खोबण्या दिसेनाश्या होतात, इथे एक झाडाचे खोडच कड्याला लटकावून ठेवले आहे व त्याच्या फांद्यांचा उपयोग पायर्‍यांसारखा केलेला आहे. डगमगणारे ते खोड चढून जाताच आम्ही अजून एक छोटासा कातळटप्पा ओलांडून या बहिरीच्या गडदेत प्रवेश करते झालो. इथे शेजारीशेजारी दोन गुहा असून एका गुहेत ठाकरांचा अनवट देव बहिरी वसलेला आहे. शेजारीच पाण्याची २ टाकी खोदलेली आहेत. दुसरी गुहा मोठी असून ४०/५० माणसे बसू शकतील इतकी प्रशस्त आहे. खोदीव अशी ही गुहा कदाचित सातवाहनकालीन असावी मोक्याच्या घाटवाटेवर लक्ष्य ठेवता यावे म्हणूनही खोदली गेली असावी. इतक्या अवघड जागी गुहा खोदणार्‍या त्या अज्ञात शिल्पकारांचे खरोखर कौतुक आहे.

ढाकच्या बहिरीला इथली ठाकरं, आदिवासी लोक बरेचदा कोंबडं, बकरं बळी देतात. इतक्या वर खांद्यांवर प्राणी वाहून आणणार्‍या त्यांच्या हिंमत जबरी. ती तर या रानचीच लेकरं. बहिरीच्या गडदेतल्या पाण्याच्या एका टाक्यात ताटे, वाटी, भांडी असा सर्व संरंजाम आहे. बळी देऊन तिथेच शिजवायचे आणि टाक्यातली भांडी वापरून परत विसळून टाक्यातच ठेऊन द्यायची ही तिथली पद्धत. जीवापेक्षा भांडी जड नसल्याने आणि बहिरीच्या कोपापायी ती कधी चोरीसही जात नाहीत. अर्थात या प्रकारांमुळे गुहेत तशी अस्वच्छताच आहे. पाणी पिण्यासाठी एक स्वछ टाके बाजूचस आहे.

६. कड्याला लगटून जाणारी बारीक आडवी वाट

७. पाठीमागे दिसणारा कळकराय

८. पावठ्यांवर चढाई सुरु

९. एका अवघड टप्प्यावर

१०. गुहा आता नजरेच्या टप्प्यात

११. शिडी म्हणून लावलेले खोड

१२. गडदेचा बहिरी

१३. आतली प्रशस्त गुहा

१४. गुहेच्या तोंडाशी लावलेला त्रिशूळ

गुहेतून कोकणाचे रौद्र दर्शन होते. बाजूने सरळसोट तुटलेले कडे आहेत. लोक अजून वर चढताना दिसत होते. आता आम्हाला चिंता होती की येथून खाली कसे उतरायचे याची. गिरीदर्शनवाल्यांच्या मदतीने दोरांचा आधार घेऊन नजाकतीने एकेक पाउल टाकत शेवटी तो कडा उतरलो , ट्रॅव्हर्स पार करून परत ती खिंड चढून वर आलो.

१५. गुहेतून दिसणारी दृश्ये

१६. गुहेतून दिसणारी दृश्ये

१७. गुहेतून दिसणारी दृश्ये

१८. उतरण्याच्या तयारीत आम्ही

आता पाय जाम थकलेले होते पण पुढचा मार्ग सोपा होता. आता आम्ही आलो कोंडेश्वर फाट्यापाशी. ३/४ किमीची उतरण उतरून पायथ्याच्या कोंडेश्वर मंदिरापाशी आलो. इथे प्राचीन शिवमंदिर व काही वीरगळ आहेत. इथून थोड्याच अंतरावर असलेल्या जांभिवली गावात दुपारी दीड वाजेपर्यंत पोचलो ते २.३० ची तळेगाव एसटी पकडण्यासाठी. तळेगावला परत पिंपरीला जाणारी लोकल पकडून घरी आलो ते ढाकच्या स्मृती कायम मनात ठेऊनच.

१९. कोंडेश्वर फाट्यावरून

२०. कोंडेश्वरचे शिवमंदिर

२१. वीरगळ

जावे कसे-
१. लोणावळा-तुंगार्ली-वळवंड-ढाक- (३०/३५ किमीची लांबलचक वाटचाल.)
२. तळेगाव्/कामशेत-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक (-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक ७/८ किमी पण जांभिवली एसटी अगदी कमी आहेत. स्वतःच्या वाहनाने यायचे झाल्यास रस्ता खराब आहे याची नोंद घेणे)
३. कर्जत-सांडशी-ढाक (दमछाक करणारी ४ तासांची १००० मीटर्सची तीव्र अशी घाट चढाई.)

अगदी अनुभवी सहकारी बरोबर असल्याशिवाय ढाकच्या वाटेला शक्यतो जाऊ नये. कळकराय सुळक्याच्या खिंडीपर्यंतचा रस्ता तुलनेने बराच सोपा आहे. जो काही थरार आहे तो शेवटच्या अर्ध्या पाऊण तासातच.उतरतांना अत्यंत काळजी आवश्यक.

*तेव्हा आमच्याकडे कॅमेरा नसल्याने मोबाईलमधून काढलेलेच फोटो इथे टाकत आहे.