कर्नाळा किल्ला तो पाहू..!!

सकाळी ४.१५ चा कर्ण-कर्कश गजर उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वाजला धडपडून जागा झालो. पटापट सगळं आवरून बाईक काढली आणी मित्राला घेऊन पनवेलच्या वाटेला लागलो. मुंबईकरांना कधी तरी अनुभवायला मिळणार्या पहाटेच्या गुलाबी थंडीने चांगलाच जोर पकडला होता. समोरून वेगाने येणार्या हवेने पायाला आणी हातांना चांगलेच कणके बसत होते. पनवेलला पोहचेपर्यंत ६.१५ वाजले होते. दिलेल्या वेळेप्रमाणे स्पा त्याच्या मित्राला घेऊन कल्याण-शिळ मार्गे पनवेलला एस टी स्टँडला हजर होता. वाजणारी थंडी कमी करण्यासाठी 'कटिंग' ची ऑर्डर देण्यात आली. चहा पिताना थोड्याफार गप्पा चालू होत्याच मग त्या तात्पुरत्या थांबवून आम्ही निघालो.

पनवेलपासून कर्नाळा पक्षी अभयारण्याचं अंतर १० किमी आहे त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाला गाड्या लागताच अगदी १०-१२ मिनिटात अभयारण्याच्या पायथ्याशी येऊन आम्ही पोहचलो. तिकिट काउंटर पासून थोड्या अंतरावर आत जात एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली गाड्या लावल्या आणी पक्षी अभयारण्याच्या दिशेने पावले वळवली. उदयोन्मूख फोटोग्राफर प्रसन्न आपटे याचा कॅमेरा तोपर्यंत गळ्यात आला आणी फोटोग्राफी किडे सुरू झाले. :)

दुरवर दिसणारा किल्ल्यावरील सुळका.

बर्‍याच ठिकाणी झाडाची मुळं जमिनीतून अशी वर आलेली दिसतात काही ठिकाणी ती बोटाएवढी छोटी आहेत तर काही ठिकाणी एकदम भली मोठी. वर चढताना त्यांचा खुप मोठा आधार मिळातो.

किल्ल्याची जमिनीपासुनची उंची १४०० फुट आहे आणी जाण्याची वाट सरळसोट उभी चढण असल्याने थकवा पटकन येतो. काही ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊनच पुढे जावे लागते. त्याचबरोबर पाण्याच्या ४-५ बाटल्याही जवळ असु द्याव्यात. घरातून घाई गडबडीत निघताना पाण्याची बॉटल न घेण्याचा महामुर्खपणा मला चांगलाच नडला. त्यातल्या त्यात स्पावड्याने त्याच्या बॅगेत पाण्याच्या २ बॉटल आणलेल्या होत्या त्यामुळे तात्पुरतं काम भागलं. पक्षी अभयारण्य होतं खर एखादा पक्षी दिसणं तर दुरची गोष्ट पण त्याच साधं पीसही आम्हाला दिसलं नाही. सकाळचा पक्ष्यांचा किलकिलाटचं तेवढ्यापुरतं मनाला समाधान देत होता.

आम्ही वर मोकळ्या पठारावर येईपर्यंत सुर्यनारायण जमिनीच्या गर्भातून वर आले होते.

मग खालच्या विहगंम दृश्याचं फोटोसेशन उरकण्यात आलं. :)
फोटो क्रं. १

फोटो क्रं. २

खालच्या संपुर्ण मोकळ्या पठारावर धुक्याची दाट चादर पसरली होती.
फोटो क्रं. ३

फोटो क्रं. ४

फोटो क्रं. ५

हा बघा लाल कपड्यातला पाढंरा बगळा. बगळीण कधी मिळेल याचा विचार करत असावा बहुदा! ;)

पठारावर आल्यानंतर एका ठिकाणाहून किल्ल्यावरच्या सुळक्याचं असं दर्शन झालं आणी काही क्षणाकरता आम्ही रस्ता चुकलोय असं वाटलं.

पण जसं जसं पुढे सरकत गेलो तसं आम्ही योग्य दिशेने जात असल्याची खात्री पटली. पठारावरून सरळ पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला कणाई मातेचं एक छोटसं मंदिर आहे. आतली देवीची मुर्ती संपुर्ण काळ्या पाषाणाची आहे आणी मनाला प्रसन्न करणारी आहे. सिंहावर विराजमान असलेल्या अंबेने तिच्या चारही हातात शस्त्र धारण केलेली दिसतात. बारकाईने निरिक्षण केल्यास असे कळते कि ते मंदिर आणी त्यातील मुर्ती हे बरोबर अशा ठिकाणी आहेत कि जिथे उगवत्या सुर्याच्या कोवळ्या सुर्यकिरणांचा देवीला अभिषेक होत असावा.

जसाजसा पुढे जात गेलो तसा तसा किल्ला आमच्या नजरेच्या ट्प्प्यात येऊ लागला.

सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांमुळे किल्ला सोनेरी प्रकाशात झळाळत होता.

किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेरचा भाग..

कर्नाळा किल्ला कधी बांधला असावा याबाबतची अचुक तारीख नाहीये पण याचा ताबा १२४८ ते १३१८ या काळात देवगिरी यादवांकडे होता आणी त्यानंतर तो १३१८ ते १३४७ तुघलक राज्यकर्त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळी उत्तर कोकण आणी त्यासंबधीत साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी कर्नाळा ही राजधानी होती.

घाट आणी कोकण यामधील प्राचीन घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यावर तीन दिशांना तीन बुरूज असंमातर ठिकाणी बांधलेले आहेत. किल्ल्याच्या जवळून वाघजाई, आंबेनळी आणी बोर या प्राचीन घाट मार्ग जातात.

तिन बुरूजांपैकी एक..

वरील बुरूजावर जाण्यासाठीचा मार्ग..

आणखी एक बुरूज...याच्या खालून किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग आहे.

किल्ल्याचा रस्ता शोधण्यासाठी आमच्या बॅगा वैगेरे सामान पाऊलवाटेवर एका ठिकाणी ठेवलेलं त्यामुळे किल्ल्यावर पोहचल्यानंतर जबरदस्त तहान लागली होती आणी आमच्या सुदैवाने दगडात खोदलेलं पाण्याचं टाकं दृष्टीस पडलं. किल्ल्यावरच्या या टाक्यात बाराही महिने स्वच्छ आणी निर्मळ पाणी मिळतं. त्याची एकूण रचना सातवाहनकालीन वाटते.

पाणी पिऊन मावळ्यांनी तिथेच थोडासा विसावा घेतला. :)

स्पावड्या....

किल्ल्याच्या मागील बाजुस..

१२५ फुट उंचीच्या या सुळक्याला आणी त्यावरच्या भल्या मोठ्या मधमाश्यांच्या पोळ्यांना पाहून काहितरी आठवत होतं. विचार करता हळूहळू लक्षात आलं जब्बार पटेलांच्या मास्टरपीस जैत रे जैतचं शुटिंग इथे झालं होतं. त्या सुळक्यावरून पाहिल्यास प्रबळगड आणी राजमाची हे दोन किल्ले अगदी स्पष्ट स्वरूपात दिसतात.

किल्ल्यावर मराठी आणी फारसी अशा दोन भाषेतले शिलालेख आढळतात. त्यापैकीच एक या दरवाज्याच्या आतील बाजुस आहे.

१७४० ला जेव्हा पेशवाई अंतर्गत किल्ल्याचा कारभार आला तेव्हा त्यांनी अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमलं. हे अनंतराव फडके म्हणजे शिरढोणचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या १०००च्या सैन्याला किल्ल्यावर असलेल्या काही मोजक्याच मावळ्यांच्या मदतीने ३ दिवस झुंजत ठेवले होते.

एव्हाना खुप फिरल्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता त्यामुळे मग परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. चढताना जेवढी दमछाक झाली त्याच्या जास्त पटीने उतरताना झाली. संपुर्ण शरिराचा भार पायावर येत असल्यामुळे खुप सांभाळून उतरावं लागत होतं. जाताना वाटेत किल्ल्याकडे निघालेले बरेचशे ट्रेकर आणी "वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी" गळ्यात डि.एस्.एल्.आर कॅमेरे अडकवून पक्ष्यांच्या शोधात बोंबलत आलेले हौशी फोटोग्राफर भेटत होते. थोडासा टाईमपास व्हावा म्हणून आमच्या चौघांपैकी तिघांनी येणार्‍या प्रत्येकाला "मामा" बनवायला सुरूवात केली.

खाली उतरल्यानंतर जास्त वेळ न दवडता गाड्या काढून गविंनी सुचवलेल्या क्षणभर विश्रांती या हॉटेलात पोटपुजा करण्यासाठी पोहचलो. या तिथल्याच काही पाट्या..! :)

मला तरी ब्वॉ जेवण आवडलं म्हणून हा प्रपंच.! मनोसक्त पोटपुजा करूनच मग आम्ही मुंबईच्या मार्गाला लागलो.

चांडाळ चौकडी! :)

मुंबई पुण्याकडच्या लोकांसाठी विकांताला एक दिवसाच्या भटकंतीसाठी हा किल्ला आणी अभयारण्य चांगला पर्याय ठरू शकतो. मुंबईहून कर्नाळ्याचं अंतर ६५ किमी आहे.

(आमचे मित्र प्रसन्न आपटे आणी त्यांचे मित्र सौरभ यांचेकडून यातले बहुतांश फोटो साभार)