|| श्री गुरवे नम: ||
पुण्यामध्ये ओरिगामी प्रदर्शन
पुण्यातील मिपाकरांसाठी : गुरुवार, ३ नोव्हेंबर ते रविवार, ६ नोव्हेंबर या चार दिवसांत टिळक स्मारक मंदिरात सकाळी १० ते रात्री ८ या वेळात ओरिगामी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात माझ्याही काही कलाकृती (टॅसलेशन्स) ठेवलेली असतील. मिपाकारांनी जरूर भेट द्यावी. या कलेमध्ये रस निर्माण होऊन तुम्हाला ओरिगामी शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी कार्यशाळाही नंतर घेण्यात येतील. प्रदर्शनाच्या ठिकाणी याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. पुण्याच्या सौ. इंदूताई टिळक आणि मुंबईच्या गीताबेन कांटावाला यांच्या पुढाकाराने १९८१मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे सभासद आता भारतभर पसरले आहेत. ओरिगामीच्या प्रसारासाठी दर वर्षी मुंबईला / पुण्याला आलटून पालटून हे प्रदर्शन भरवलं जातं. गेल्या वर्षी डिसेंबर २०१०मधे मुंबईला होतं, आता या वर्षी पुण्यात. यासाठी आम्ही सर्व सभासद निरनिराळी मॉडेल्स (ओरिगामी वस्तू) तयार करून प्रदर्शनात मांडतो.
ओरिगामी ही मूळची जपानी कला. ओरु=घड्या, कामी=कागद. फक्त कागद (आणि आपल्या हाताची बोटं) वापरून अनेकविध गोष्टी बनवल्या जातात, त्यासाठी गोंद आणि कातरी अजिबात न वापरता. फुलं, फुलपाखरं, प्राणी, पक्षी, कीटक, माणूस, डायनोसॉर, सजावटीसाठी सुंदर वस्तू, विविध आकाराचे डबे, वाट्या / वाडगे इ. तयार करता येतात. टॅसलेशन, किरीगामी, स्नॅपॉलॉजी हे ओरिगामीचे आणखी इतर प्रकार. यापैकी ‘स्नॅपॉलॉजी’व्यतिरिक्त सगळ्या वस्तू एकाच कागदापासून बनतात. मोड्युलर ओरिगामी या प्रकारात एकाच पद्धतीने अनेक तुकडे तयार करून ते एकमेकात अडकवून वस्तू तयार होते, अर्थात, गोंद न वापरता. हे सर्व प्रकार पाहून मन मोहून जातं.
माझी ओरिगामी
ओरिगामीचे जवळजवळ सर्वच प्रकार मी करून बघितले आणि ते मला जमले, आवडले. त्यातले काही नमुने या भागात पेश करत आहे.
काही फुलं

फुलं असतील तिथे फुलपाखरंही येणारच, नाही का ?

डॅफोडिल हे फूल षटकोनी कागदापासून तयार केलं आहे.

सजावटीसाठी हे 'डेलिया'

दशकोनी कागदापासून हे 'डेकास्टार'

'डेकास्टार' अतिशय पातळ, पारदर्शक पण चिवट कागदापासून केलं आहे, त्यामुळे ते दिव्यासमोर धरल्यावर असं दिसतं

टॅसलेशन हा ओरिगामीचा एक आकर्षक प्रकार. दिव्यासमोर ते धरल्यावर अतिशय सुंदर दिसतं.
एक अत्यंत सुंदर टॅसलेशन आणि ते दिव्यासमोर धरल्यावर त्याचं सुंदर रूप


षटकोन आणि त्रिकोन यांचं हे एक टॅसलेशन


राँदँ (उच्चाराची चूभूदेघे) या शिल्पकाराचं प्रसिद्ध शिल्प 'द थिंकर'ची ओरिगामी प्रतिकृती

शेवटी, अमेरिकन ओरिगामी संस्थेने भेट म्हणून हे 'ओरिगामी बग' आम्हाला पाठवले. ते लॅमिनेट करून त्याच्या मागे लोहचुंबक लावलं आहे.

आणखी काही नमुने, ओरीगामीचे फायदे, उपयोग वगैरे पुढील भागात.