पयल्या झुठलाच सांगुन ठिवतु , म्या कोंबडी वडा म्हंटल म्हनुन इथ्थ कोंबडी वडायला नक्का येउ! उगा सांगाया ग्येल म्हुन टांगाया न्हेयाच काम न्हाय! आदीच सांगतो ! ह्यो परदार्थ हाय. आमच्या कोलापुराकडचा.तसा बाकी ठीकानास्नी बी मिळतुया पर हित्त म्या कोलापुराची, म्हुनशान ह्ये जेवान बी कोलापुरीच! काय?
आता इचारा ह्ये आवतन कशासाठन? न्हाय इचारा की. इचारा ! इचारा ! तर सांगतो. अगदी बैजवार सांगतो. टाइम हाय न्हव? मग बसा हिथ जरा. खांड हाय का सुपारी बिप्पारीच? काढा काढा. हांगश्शी!
तर मला सांगा,आता दोन दिस झाल तुम्ही ह्या मराठी दिनात वणवण फिरायला लागलायसा, कुनी तुमच्या पोटा पान्याच काय इचारल? इचारल ? न्हाय सांगाच मला , इऽचाऽरल काऽऽऽ? न्हाय ना? मग? ह्यो इचार कुनी करायचा? न्हाय सांगा मला कुनी करायचा? ऑ ? आपल्या पैकीच कुनी तरी , व्हय न्हव? व्हय का न्हाय? तर म्या त्यो इच्चार केला. म्हनुन त्ये मुटे पंतांच्या ओव्या मध्ये टाळ , चिपळ्या वाजवुन झाल, आन पाषान भेदांच्या पवाड्यावर मान हलवुन झाली, की थेट हित्त युन , हात वल्ल करुन जायाच. अगदी शाकारी लोकांसाठन बी मीन त्योच मसाला वापरुन सोयाबीन्च्या वड्या आन बटाट घालुन्श्यान सांबारऽ बनीवलय. त्येवड खायाच आन मग काय सीमा लढा , त्ये कुठ कोकणी , कुठ कविता, मोडी आस काय बाय करत फिरा वाट्टल त्येव्हढ! काय खर हाय न्हव्ह? न्हाय कुटलबी काम कराया पयला पोटाला आदार पायजे , व्हय कनी? काय खोट बोलतुया काय म्या?
काय? काय म्हनतासा? दळुन कदी आनलस? कसल दळन? वड्याच? न्हाय ओ!
अश्या टाइमाला कुटल मिळायला दळुन आन फिळुन! त्यो गिरनीवाला बी लय बादशा****चा हाय. कदी येळला काय मिळल तर शप्पत्त ! तर माग बी येकदा असच झाल्त, तवापास्न म्या ठरविल, काय न्हाय तर वड्या साटन तरी माझ दळना वाचुन अडु द्याच न्हाय. मग कस करायच? तर काय न्हाय ! मला सांगा घरात पिठ असत्यात का न्हाय? म्हणजे तान्दळाच , गव्हाच आन जुंदळ्याच. ही सगळी पिठ एक एक वाटका घेयाची. आता वाटक्यान घ्या न्हाय तर, आज म्या कस भुगुन्यान घ्येतल तस घ्या, पर एका मापी ही तीन पिठ हायती कनी ती घ्या ! झाल ?आता त्याच वाटक्यान न्हाय तर भुगुन्यान अर्ध माप उडद घ्या. त्या उडद डाळीत वाटकाभर आसल, तर येक डाव भरुन धन, त्येवढाच डाव भरुन जीर आन मग अर्धा डाव भरुन म्येथीच दान घाला, आन काय जात असल तर जात्यावर न्हाय तर मिक्सर असल तर मिक्सरवर चांगल गुऽर गुऽर फिरवुन घ्या. चांगल बारिक करुनश्यान घ्या.आता ह्ये सगळ सामान येकत्र करुन त्यात आपली हाळद आन चवीप्येक्षा जरा कमीच मीठ घाला. चांगल येक जीव करुन घ्या आन पानी घालुन ब्येतशीर मळा. कळ्ळल हितवर? आता खरी गमजा तर पुढच हाय! आता तुमच्या कड चुल बील आसल तर त्यातला येक निक्कारा घ्या. आन नसल तर येक कोळसा ग्यासावर ठिवुन चांगला लालभडक करुन घ्या. तवर हिकड त्ये पिठ मळलय़ त्यात येक खड्डा करुन घ्या. चांगला मुठभर खोलीचा आन लांबी रुंदीचा असुद्या काय?
त्या खड्ड्याला पुर झाकल आस झाकन बी तयार ठिवा. आता त्या खड्ड्यात येक डाव भर त्येल घाला आन त्यो चांगला फुललेला निक्कारा त्या त्येलात घालुन वरन लगोलग झाकनी घाला. लय धुर उटल. पर ह्यो धुरच तर धुरकाट वास देतुया आपल्या वड्यास्नी.
From Drop Box
तर आता ह्ये झाल? आता आपण कोंबडी कड वळु.
आता कुणाला काय म्हंटल्यावर काय आटवल काय सांगता येयाच न्हाय. खर का न्हाय? तर कोंबडी म्हंटल की मला बघा योक परसंग खायम आटवतु. न्हाय त्येच काय झाल म्या आन आमच धनी येकडाव आमच्या तिठ्ठ्याच्या गावात गाडी लावुन कशा साठन तरी हुबा हुताव. तर तिठ्ठ्याच गाव म्हंजे जरा काय बाय शेरी आव आनत्यात ही लोक. तर आता सांगा घरपती कोंबड्याची खुराडी आन म्हशीच गोठ असलेल्या खेडगावातनी कोन कधी " चिक्कन मार्ट" काढल का? काढणारा गाढावच म्हंटला पायजेल का न्हाय? तर आमी अस हुबा होतो तीत्थ समोरच जाळीच्या डालग्यात येकुलती येक कोंबडी घालुन ह्यो भाद्दर हुबा हुता. तवर तीकडन येक असच गिराइक बी आल त्याच्या कड . मग चौकशी बिवकशी हुन ह्यो भाद्दर कोंबडी काढायला म्हुन डालग उघडायला ग्येल्या पेटाला, कोंबडीन मारला सुऽर! आन पडली भायेर, आता गावाकडची कोंबडी ती, ती काय तुमच्या शेरातल्या कोंबडी वानी गप बसणार हाय व्हय वाट बगत? की बाबा अश्यान असा ये आन मला कापुन खा? ती भाद्दरीन बी लागली प- प- पळायला. मग ह्यो दुक्कानदार म्हंत्याला आन त्ये गिराइक म्हंत्याल अशी दोघ बी लागली तीला तनवायला! कोम्बडी गावत्या व्हय? सक्काळधरन ती बी कावली असल गप डालग्यात बसुन बसुन, ती लागली की वो पळायला.
आता मी आसन तवा पोरांच्या वारगीचीच. नुकतच बाशिंग बांधल्याल आमी दोघांनी बी. तर त्या वयात तुमाला आगदी कश्याच्च बी हसु येत का न्हाय? येत किनी? तस मला बी त्ये गिऱ्हाइक आन दुक्कानदार दोघ मिळुन कोंबडी तनवताना बगुन लय हसु याला लागल. म्या हसतोय खुदु खुदु आन मला हसताना बगुन आमच धनी बी हसत्यात. तर त्ये बगुन ह्ये दोनी भाद्दर जरा वरमल, आन मग त्यो दुक्कानदार म्हंत्याला कसा म्हंतो गिराइकाला," आता बगा ती थेट घरला जाइल. तीच्या डालायच्या जागला. मग म्या जातो आन तीला परत घिवुन येतो. तवर तुमी थाम्बा हीतच दुकानावर. कोन आल तर सांगा बापश्या हीतच ग्येलय म्हुन काय?"
आता असला परसंग आटवुन कुनाला बी हसु फुटल का न्हाय सांगा बगु मला?
तर आता कोम्बडी! काय न्हाय . आमच्या कोलापुरात कोंबडी म्हना मटान म्हना ह्यात काय जास्त काय घालत न्हाइती. हा! ज्याचा रस्सा करायचा त्ये मात्र मायंदाळी पायजे. मग बाकिचा मसाला उली उलीसा घातला तरी बी चालतय.
तर कोंबडी घ्या . आता मसाला. हं ! थोड त्ये आपल लवंग घ्या एक आट-धा, दालचीनी अर्ध्या बोटाच्या मापाची, त्ये काळ येलदोडयेक तीन-चार, आन आपल साद जीर. ह्यो सगळा मसाला. आता वाळ्ळ खोबर जरा येक आर्धी वाटी खिसुन घ्या आन भाजुन बी घ्या खरपुस रंगावर, आता ह्यो सगळा मसाला येकत्र करुन चांगला पाटा वरवंटा घिवुन घसा घसा वाटा. काय न्हाय म्हंता? हात्तीच्या मग घाला मिकसरवर, आन घ्या बारिक करुन . आता ह्ये बाजुला ठिवायच आन कोंबडी कड वळायच. तीला तवर तुमच धनी कापुन,धुन, तुकड करुन आनुन द्येतीलच की. तर त्या कोंबडीला वाइच आल लसुन आन कोतींबीर आन बडीशेपु ह्ये सगळ बैजवार वाटुन घाटुन लावुन घेने. जमल तर कच्चा कांदा आन कच्चा टोमेटो बी लावुन टाका हातासरशी. त्यातच हळ्द आन मीट बी घालुन घ्या. आता ह्या सगळ्यात त्ये कोंबडीच तुकड घालुन चुलीवर गरम पातेल्यात गरम त्येलावर फोडनी टाकने. दर पाच मिंटाला हलवुन घ्या . अस येक पाच पंचवीस मिंट झाली की आता त्यो वाटुन ठिवलेला मसाला हाय कीनी? त्यो बी घाला त्या कोम्बडीवर, आन लागल तस हळु हळु गरम पानी वाडवा.
आता म्या तुमाला आमच कोलापुरी जेवान आस फक्कड कस दिसत त्ये सांगत्ये. काय करायच तिखटाची बुक्की असत्या की न्हायी? ती आपल्या आपल्या अंदाजान घ्याची आन दुसऱ्या येका जरा ल्हानश्या भुगुन्यात येक डाव भर त्याल गरम करायच आन त्यात ह्यी तिखटाची बुक्की घालुन भुगुन लगोलग खाली उतरायच. आसा खाट सुटतो म्हंता. तर ह्ये आस त्येलावर परतल्येल तिखाट घातल की आमच्या कोलापुरी रश्श्याला तवंग येतुया बगा. तर ह्ये भाजलेल तिकाट घालुन रश्श्याला आनी येक चांगली उकळी येवु द्या आन सरते शेवटी रस्सा खाली उतरुन त्यात येका नारळाच दाट्शीर दुध घाला.
From Drop Box
बर रस्सा झाला?आता भायेर पालपट्ट्या हातरुन घ्या. काम्दा लिम्बु लावुन घ्या. पान्याच तांब बिंब ठ्येवुन घ्या आन ह्याच येळेला चुलीवर त्येलाची कढई चढवा. त्ये वड्याच पिठ त्यातला कोळसा काढुन्श्यान परत येकदा चांगल मळुन घ्या, आन येका पलॅस्टीकावर जरा जरा पानी लावुन योक योक लिम्बा येव्हढा गोळा घिवुन गोल थापा आन मधी येक छिद्र करा . त्याल गरम झाल आसलच त्यात घाला आन चांगल तळा. झाल.
From Drop Box तर आता ह्ये सगळ जेवान तयार हाय, तुमी नुसत याच, आन पंगतीत बसुन खावुन मग परत कुट काय सुद लेखन बिखन शिकायला जायाच आसल तिकड जायाच.पर याच बर का? तसा आमचा आग्रेवच हाय. न्हाय म्हनायच न्हाय! काय?