सुधारक सावरकर

आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा! असो विनोद राहूंदेत, सावरकरांच्या दूरदृष्टीस नमस्कार करताना असेच म्हणावे लागते की, त्यांच्या बाबतीत,"poorly developed sense of fear and no concept of the odds against them" हे तंतोतंत पटते.

हिंदूत्व हा सावरकरांनी तयार केलेल्या शब्दाचा समजून अथवा न समजून विपर्यास जसा त्यांचे विरोधक करतात तसाच स्वतंत्र भारतात, त्यांनी हेतूपुरस्सर स्वतः विसर्जीत केलेली "अभिनव भारत संघटना", पुर्नप्रस्थापित करणारे आणि त्यांचे समर्थक म्हणवणारे देखील करतात असे म्हणावेसे वाटते. पण या लेखाचा हा उद्देश नाही आणि त्यावर चर्चा करायची असल्यास वेगळा धागा काढावात ही विनंती! :-)

सावरकरांचे जे काही विज्ञाननिष्ठ निबंध म्हणून प्रसिद्ध आहेत, ते त्यांनी नक्की कुठल्या काळापासून ते कुठल्या काळापर्यंत लिहीलेत ह्याची मला कल्पना नाही. पण जन्मतःच कुशाग्र आणि स्वतंत्र बुद्धी असलेल्या सावरकर हे अचानक बदलले असे म्हणण्याऐवजी सतत डोळस राहून विचार करत स्वतःचे विचार घडवत राहीले. अर्थात त्याचे अगदी लहानपणापासून मूळ होते ते पारतंत्र्य आणि असे का व्हावे हा पडलेला प्रश्न. कसाही उलटसुलट विचार केला तरी परत परत एकच उत्तर मिळत होते की ज्यावेळेस हिंदू समाजाने स्वतःवर वैचारीक आणि कृतीच्या मर्यादा ओढावून घेतल्या, तेंव्हापासून त्याचे सर्वार्थाने आकुंचन घडत गेले. मग त्यातून पुढे आक्रमणे होत गेली आणि त्यांच्याशी लढायच्या ऐवजी आपण त्यांना मदत करत एकमेकांत लढत बसलो. थोडक्यात समाज/राष्ट्र/देश म्हणून जर परत मोठे होयचे असेल तर विज्ञानाचा आधार घेऊन (त्यांच्याच शब्दात) "अप-टु-डेट" बनायला हवे असे त्यांचे मत होते. त्याचा प्रत्यक्ष परीणाम म्हणून समाजाने अनेक रूढींना सोडणे गरजेचे होते...

रत्नागिरीस झालेल्या स्थानबद्धतेचा आणि राजकारणापासून अलीप्त रहाण्याच्या शिक्षेचा त्यांनी यासाठी वापर केला. किर्लोस्कर मध्ये तसेच इतरत्र त्यांचे अनेक लेख छापले गेले होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठा म्हणजे, "गाय हा उपयुक्त पशू आहे" इतकीच बर्‍याचदा माहीत असते. म्हणून, आज सावरकर पुण्यतिथीनिमित्ताने खाली त्यांच्या अशाच काही निबंधातील मोजके संदर्भ, त्यांच्याच शब्दात देत आहे.

"कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धारणार्थ आज आवश्यक आहे, ते बहुदा चटकन सांगता येते. प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. पण कोणची गोष्ट शास्त्रसंमत आहे ते ब्रम्हदेवाला देखील सांगता येत नाही. आम्ही कोणचाही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित मानत नाही. श्रूतिस्मृतीप्रभृती सारे पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासीक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रधारणास, उद्धारणास जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार, अप-टू-डेट बनणार."
- दोन शब्दांत दोन संस्कृती

सावरकरांची कडक भाषा याच "दोन शब्दांत दोन संस्कृती" लेखात आधी केवळ विद्युतवाहीनीस होणार्‍या विरोधाला विरोध करताना दिसते:

"जेंव्हा वीज ठाऊक नव्हती, आगपेटी निघाली नव्हती, तेंव्हाच्या अडाणी पद्धतीने धरून विस्तवाचे मडके नेऊन पावसात मधेच विझते आहे, मधून पुन्हा ढोसली जात आहे अशा त्या श्रूतिस्मृतीपुराणोक्त चितेवरच आम्ही आजही प्रेते जाळणार! जर कोणा भाविक मनुष्यास सांगितले की, तुझे प्रेत आटोपशीर पेटीतून नेऊन अद्ययावत विद्युतगृहात झटकन जाळले जाईल, तर त्या बातमीसरशी तो जिवंतपणी मेल्याहून मेला होईल. नि मृत्यूपत्रात लिहून ठेवील की, माझ्या प्रेताची दुर्दशा होता कामा नये, त्या करकरत्या तिरडीवर, ती लुटलुटती मान नन्ना करीत असतानाच, ते विद्रूप तोंड उघडे ठेवून त्या लाकडी चितेवर तसेच ढोसले जात जात माझे प्रेत जाळले जावे. कारण! तेच श्रूतिस्मृतिपुराणोक्त असून परलोकी सद्गती देते! खरोखर, या अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्मग्रंथांनी हजारो वर्षांच्या अडाणीपणास अमर करून ठेवले आहे! "

काही सनातनी धर्मपरिषदांमध्ये असे म्हणले गेले की, "आज जर पेशवाई असती तर सुधारकांना हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले असते!" या वाक्याचा समाचार घेताना सावरकरांनी म्हणले"

"भुक्कडांची मनोराज्ये भुक्कडच! कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे! गाढवांच्या मनोराज्यात उकीरडेच उकीरडे! तसेच आजच्या या करंटक पिढीच्या मनोराज्यातसुद्धा सुधारकांना हत्तीच्या पायाशी देण्यापेक्षा अधिक लोभनीय असे कोणतेच दृश्य दिसत नाही! "आज जर पेशवाई असती तर सुधारकांना हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले असते!" इतकेच ह्या दळभद्र्यांना सोयरसुतक!"

मात्र सावरकरांच्या मनोराज्यात पेशवाई येणे म्हणजे दुसर्‍या बाजीरावाची नव्हती तर चंद्रगुप्तासारखी, शिवाजीसारखी अथवा पहील्या बाजीरावासारखी होती... दुसर्‍या बाजीरावासारखी अथवा संभाजी- शाहूमहाराजांनंतरच्या दुबळ्या छत्रपतींसारखी नव्हती. ते म्हणतात:

"कारण, पहील्या बाजीरावाच्या वा शिवरायाच्या सहानभुतीचे टिपण कोणा सोम्यागोम्या भटजींच्या अथवा चंद्रराव मोर्‍यांच्या टिपणापेक्षा आम्हा संघटनीय सुधारकांच्याच टिपणाशी जुळते हे उघड आहे..... आमच्या सनातनी बंधुंनी हे विसरू नये की, पराराज्यापेक्षा स्वराज्यात सामाजिक नि धार्मिक सुधारणा बहुदा अधिक सुलभतेने नि त्वरेने घडू शकते. जपानात स्वराज्य होते तोच जपान जागे झाले म्हणून एका पन्नास वर्षात ते युरोपच्या बारशास जेऊ शकले... हिंदुपदपादशाहीचे धुरंधरही युरोपच्या पोचापाचास शिकू लागले होते. सैनिक संचलन आणि तोफांचे कारखाने मराठ्यातही युरोपाच्या धर्तीवर चालू झाले होते. मुद्रणाच्या शोधाकडे नाना फडणविसास्सारख्या चतुरस्त्र पुरूषाचे लक्ष वेधत होते. ... यंत्राच्या नि विज्ञानाच्या मागोमाग सामाजिक सुधारणाही दासीसारखी धावत आलीच पाहीजे. सध्याचा प्रत्यक्ष पुरावा पहा. जे थोडे अर्धवट स्वराज्य उरले आहे तिथेच सुधारणा झाली, तेव्हा झटपट झाली का नाही ते पहा. बडोद्याच्या सयाजीरावानी राज्याची भाषा हिंदी करूनसुद्धा टाकली. अनेक प्रगत निर्बंध (कायदे) राज्यभर चालू करून कित्येक अहितकारक नि दुष्ट धार्मिक रुढी तडाक्याससरशी दंड्य ठरवल्या. "अस्पृश्य" हा शब्द माझ्या राज्यातून सीमापार व्हावा! असे उद्घोषणारा पुरूष कोल्हापुरचा छत्रपती होऊ शकतो!... "

"खरा सनातन धर्म कोणता?" हे लिहीताना सावरकर मनुस्मृतीतील अनेक वचने सांगत म्हणतात की,
"वरील प्रकारच्या सार्‍या मोठ्या, धाकट्या, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपांच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुदा ठोकून दिलेली असते की, "एष धर्मस्सनातनः!" आपल्यच धर्मग्रंथात ही खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून सार्‍या अपौरूषेय म्हणविणार्‍या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिती आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैंगबरापासून ते अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्याबसण्यापासून दाढी-मिशा, शेंडीच्या लांबीरूंदीपासून वारसांच्या, दत्तकांच्या, लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या सार्‍या विधानांवर "एष धर्मस्सनातनः!" हीच राजमुद्रा आणि तीही देवाच्या नावाने ठोकलेली आहे!..." असे म्हणत ते शेवटी सारांशात म्हणतात, " जे सृष्टीनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत. ... मनुष्याचे झाडून सारे ऐहीक व्यवहार, नीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरवले पाहीजेत, पाळले पाहीजेत, परिवर्तिले पाहीजेत. 'परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणे शक्यच नाही. इष्ट नाही..."

सुरवातीस म्हणलेले गायीसंदर्भातील सावरकरांचे विचार वाचताना हसायला देखील येते आणि त्यातील मुद्दा देखील समजतो:

"आमच्या 'गायी' वरील लेखाचा ज्या आमच्या गोभक्त बांधवांना राग आला असेल, त्यांनी असा शांतपणे विचार करावा की, आम्हा हिंदूंच्या संस्कृतीचा उपहास जर कोणाचा कागद करीत असेल तर तो आमच्या लेखाचा नसून गायीत तेहतीस कोटी देवता कशा नांदतात हे दाखवणारा तो सर्वत्र आढळणार्‍या चित्राचा कागद. पंढरपूरच्या यात्रेच्या रामगड्यांच्या दिवसात तिसर्‍या वर्गातील आगगाडीच्या डब्यात वारकरी जसा धर की कोंब चालू होते, तसे या गायीच्या शरीरात देवांची रगडारगडी, कोंडमार झालेली आहे! विष्णू, ब्रम्हा, चंद्र, सूर्य, यम, कोणी कंठात, कोणी दातांवर , कोणी नाकात ज्याला जिथे साधेल तिथे तो लटपटला. पृष्ठवंशात तर इतकी दाटी आहे की, कोणी सनातनीही रागाने जेंव्हा उनाड गायीच्या पाठीत दोहताना तिने लाथ झाडताच हटकून एक काठी घालतो तेंव्हा दहापाच देव तरी लंबे झाल्यावाचून राहूच नयेत! ..."

याहूनही अधिक बरेच काही.

"गोमुत्राने अमके तमके रोग बरे होतात. शेण हे उत्तम खत आहे! इतकेच असेल तर त्या रोगांनी पछाडलेल्या रोग्यांस गोमुत्र पिउंद्यात. घोड्याचे मुत्र, गाढवीचे दूध, कोंबडीची विष्ठा हि ही औषधी आहेत. मनुष्यमुत्रातही काही गुण आहेत. त्या त्या रोग्यावर ती ती घेतात तसे गोमुत्र घ्या. पण कोंबडीची विष्ठा सर्पदंशावर उतारा मानतात म्हणून श्रद्धाच्यादिवशीही थोडीशी चटणीसारखी सेवावी काय?"

मात्र हे सारे गायीचे महत्व सांगण्यासाठी पसरवलेल्या अंधश्रद्धांना. त्यांनी गोरक्षणाला वावगे म्हणले नव्हते, तर गोपुजनास वावगे म्हणले होते. त्याच बरोबर केवळ हिंदूंना पूजनीय म्हणून झालेल्या इतिहासातील गोहत्येस केवळ "उपयुक्त पशूस मारले" इतके कस्पटासमान देखील मानले नव्हते, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

असो... लिहावे तितके थोडेच आहे. पण या सर्व सुधारकी आणि विज्ञाननिष्ठ लिखाणात एक गोष्ट दिसून आली. एकतर स्वत: पण पालन करणे, दुसरे म्हणजे त्यांनी जी काही आवाहने दिली ती सामान्य माणसांस न देता त्यावेळेस हिंदू धर्माचे जे काही संस्थांत्मक ढुढ्ढाचार्य होते त्यांना दिली. सनातन्यांवर विखारी टिका केली तरी शेवटी सनातनीबंधू असे म्हणत गोंजारत सुधारण्याचा प्रयत्न देखील केला.

असे म्हणतात की सावरकरांना कल्पना होती की आपण टोकाची भुमिका घेतली तर लोकं थोडीफार मध्यापर्यंत येतील.. त्यांनी ज्या बंद्या मोडल्या पाहीजेत असे म्हणले त्यातील सर्व बंद्या मोडल्या आहेत. ते होण्यास किती वेळ लागला आहे आणि आजही काय अवस्था आहे, हा एक मोठा चर्चेचा विषय आहे.

तरी देखील हा प्रश्न पुरेसा सुटला नाहीच... सावरकरांसारखे परखड आज भरपूर आहेत. तरी देखील, अंधश्रद्धा आहेच, धर्मांधता आहेच.. मग हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे का अजून काही? का हम नही सुधरेंगे म्हणत स्वतःपुरते बदलून बाकी जग गेले खड्ड्यात असे म्हणायचे?