ऑफिसच्या गारव्यातून बाहेर येत लिफ्टसमोर उभं राहिलं की जरा बरं वाटतं, मन शरीराच्या आधीच बारमध्ये जाउन पोहोचलेलं असतं. खाली पार्किंगमध्ये येताना मी रोज विचार करतो, प्रत्येक वेळी बाहेर पडणं हे असं आधी खाली खोल खड्यात जाउन मगच असतं का ? कारण, आमच्या ऑफिसचं पार्किग मायनस ९ला आहे. गाडी घेउन वर येताना प्रत्येक वळणावर गाडी घसरायची भीती वाटते, पण घसरलो कधीच नाही, बहुतेक त्या भीतीमुळंच माझा वेग आपोआप कमी होतो. बाहेर आल्यावर लगेच सिक्युरिटीसमोर थांबावं लागतं, रोज नेमका इथं येउन थांबलो की मंद्याच्या फोन येतो. तो सिक्युरिटीवाला बॅग उचकत असतो अन मंद्याची बोंबाबोंब चालू असते. केबिनमध्ये ती लेडी गार्ड असेल तर मी फोन उचलतच नाही, 'जिगर मा बडी आग है, पर्यंत रिंगटोन वाजू देतो, तो बाहेरचा काळा ठोकळा अन ती लेडी गार्ड वैतागून जातात, संध्याकाळची स्रुरुवात मजेत होते.
मी आज सगळ्यांना सांगितलं, उद्याचा शुक्रवार शेवटचा. त्यानंतर मी दोन वर्षे येणार नाही. प्रोजेक्टला बदली झाली आहे माझी. सगळ्यांना खूप हेवा वाटतोय, तोंडावरून दिसतंय तसं. आज सगळे मिळून मला त्यांच्या पेगमधला एक चमचा दारू माझ्या ग्लासात टाकून कॉकटेल करून देतात. एक लार्ज विथ सोडा, बॉटम्स अप. पाच मिनिटं काही सुचत नाही, मग हळूहळू नॉर्मल होतो. तशी मला कधी चढत नाही दारू, पण हे पाच वेगळ्या वेगळ्या एकत्र करून म्हणून थोडा त्रास झाला. सगळ्यांचा निरोप घेऊन मी लवकर निघतो, प्रवासाची तयारी करायची आहे, मेडिकल टेस्ट करून घ्यायच्या आहेत, तीन लसी टोचून घ्यायच्या आहेत. हे सगळं आवरून घरी पोहोचायला अकरा वाजतात. दरवाजा उघडून मी आत येतो, लाईट सकाळी अॅहटो मोडला टाकले होते, ते चालू बंद होत राहतात माझ्या मागं मागं. दोन तासांत बॅगा भरून होतात. मग दोन्ही गाड्यांच्या किल्ल्या घेऊन मी खाली जातो, इथं पण खड्यात जावं लागतं मायनस ३ला. स्कॉर्पचं कव्हर काढतो, आतून पल्सरचं कव्हर काढतो. स्कॉर्पचं कव्हर पल्सरच्या बॅगमध्ये ठेवतो, तिच्या बॅटरीच्या वायर काढून ठेवतो, कव्हर घालतो. मग ठोंगा, म्हणजे स्कॉर्पिओ चालू करून चेक करतो. ठोंगा महिन्यातून दोन वेळाच बाहेर निघतो.
आज शनिवार, ऑफिसमधून अर्धे डिटेल घ्यायचे आहेत, ते मिळणार संध्याकाळी साडेचार वाजता, आणि त्यासाठी ठोंगा घेऊन जावं लागेल. अर्धे डिटेल उद्या मिळणार, अर्धे १४० किलोमीटरचा प्रवास झाल्यावर. नेहमीचं आहे हे. यावेळी हॉटेल आणि पोरी वेगळ्या आहेत, असं ऐकून आहे, पाहू या. नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो, कामं केली, रिपोर्ट छापले, पैसे घेतले, प्रोजेक्ट करन्सी. बरोबर साडेचार वाजता मायनस ९ला आलो. ठोंगा वॉशिग एरियात घातला, बाहेर आलो तेव्हा आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग आहे. मग सरळ घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो. उद्या सकाळी अकराच्या सुमारास निघेन. खरं तर लवकर निघणार होतो, पण सात वाजता शाल्मली येणार आहे. मग दोन तास तरी जातीलच, म्हणून अकरा वाजता. अकरा वाजता निघालो की हॉटेलला पोहोचायला तीन वाजतील. मग तिथंच मुक्काम होईल, पहाटे तीन वाजता निघेन आणि सात वाजता साईटवर. कार्यक्रम पक्का आहे. उद्या सकाळी शाल्मली येईल, तिची वाट बघत झोप लागली आज थोडी लवकरच.
सकाळी साडेसहा जाग आली, उठून आवरलं, बरोबर सात वाजता दरवाजा वाजला. शाल्मलीच ही, कधीच बेल वाजवत नाही. दरवाजा उघडून आत येताच तिच्या ओल्या केसांचा वास घरभर पसरला. पुढचा तास फार छान गेला. दोघांनी मिळून चहा, पोहे केले, घरातल्या माझ्या आवडीच्या गोष्टी काढून तिच्या आवडीच्या गोष्टी वर काढून ठेवल्या. आता दोन वर्षे तिच्या मनासारखं होणार सगळं, पुन्हा मी गेल्यावर तिला हे सगळं जमणार नाही, म्हणून. मग दहा ते साडेदहा आम्ही गॅलरीत बसून होतो. अलार्म वाजला तसा उठून आवरलं. एकटाच मायनस ३ला आलो. शाल्मलीला पूजा करायची होती. ठोंगा काढला, शहरातली गर्दी मलाही आवडत नाही अन ठोंग्यालाही. ती संपली की पाचवा गिअर, अठराशे आरपीएम, पंच्याहत्तरचा स्पीड. पहिला घाट लागेपर्यंत तरी.
साडेचार वाजल्यानंतर जे पहिलं हॉटेल दिसलं, तिथं गाडी घातली, दहा सेकंद इंजिन बंद केलं, सिस्टिमनं सर्व काही अपडेट झाल्याचं कळवलं. बाहेर पडून हॉटेलमध्ये गेलो, रूम बुक केली आणि आत जाऊन झोपलो. जेवण वगैरे करायचं नव्हतंच. पहाटे अलार्म वाजला, उठून आवरलं. चेक आउट करून निघालो. आज एकूण नऊ तास प्रवास करायचा आहे. ही साईट नवीनच आहे, आजचा प्रवास तसा नवीनच भागातून आहे, बर्या पैकी निर्मनुष्यसुद्धा. कंटाळवाणं होणार आहे सगळं. या नोकरीत आलो ते पैसा, घर, गाडी मिळणार म्हणून. पहिले सहा महिने फार छान गेले. पण जेव्हापासून साईट सुरू झाल्या, तेव्हापासून त्रास आहे खरं तर. ही माझी दुसरीच साईट, पहिली एक महिन्यासाठीच होती ट्रायल बेसिसवर. वर्षभराने त्याचे रिझल्ट आल्यावर मग इथं दोन वर्षासाठी पाठवत आहेत. शाल्मलीला जेव्हा हे समजलं, तेव्हा तिनं स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती. पण मिळणारा पैसा, सुरक्षितता ह्यांच्या जिवावर तिला समजावता आलं होतं. दिवसभर गाडी चालवून साडेपाचच्या सुमारास साईटच्या गेटसमोर उभा आहे, सगळ्या चेकिंगला वगैरे अर्धा तास गेला. मग आत आलो, आता सगळंच सिस्टिमच्या हवाली इथून पुढं.
गेले आठ दिवस नुसता माझ्या रूममध्ये बसून आहे. जेवणखाण वेळेवर मिळतंय, ठरल्या वेळेला बाहेर फिरायला मिळतंय, ठरलंय तेवढंच मग पुन्हा रूममध्ये. प्रत्यक्ष काम काहीच दिलेलं नाही अजून. सिस्टिमवर वेटिंग लिस्ट चेक केली. अजून तीन दिवस मला कुणी भेटणार नाही. प्रचंड कंटाळा आलेला आहे. पहिल्यांदा साईटवर गेलो होतो ते आठवतं पुन्हा एकदा, म्हणजे गेल्या आठ दिवसांत दररोज दोन वेळा आठवून झालेलं आहे. आता पुन्हा आठवंतय, बॉसनं घेतलेलं ब्रेन स्टॉर्मिंग, झालेले वाद आणि मग दोन दिवसांनी दिलेला होकार, नंतर शाल्मलीचा गोंधळ आणि बरंच काही. ही कंपनी जॉइन करतानाच लक्षात आलेलं होतं की काहीतरी घोळ आहे; पण पैसा, घर आणि गाडी डोळ्यासमोर नाचत होते. अशा वेळी नेहमी करतो ते केलं, बॅगमधून एक इंजेक्शन काढलं आणि टोचून घेतलं. या ऑषधाचा प्रभाव पुढचे दोन दिवस टिकेल. मग एकच दिवस वाट बघणं आणि त्यानंतर काम सुरू.
आज दुपारी माझा पार्टनर येणार आहे. नंबर ८९३७, वय वर्षे २९. आज सकाळीच आलेल्या मेसेजमध्ये होतं तसं. बरोबर तीन वाजता रूमचा दरवाजा उघडला, तेव्हा जॉब नंबर ८९३७ समोर उभी होती. चेहर्यावर प्रसन्न हसू, केसांचा बांधलेला पोनी आणि त्याला न शोभणारं बंगाली कुंकू कपाळावर. 'हाय, मी प्रवीण' 'हाय, मी मीना, आत येऊ?' दोनच वाक्यं बोललो, पण खूप जवळची ओळख आहे असं वाटलं. पुढची दोन वर्षे तरी एकत्र काढायची आहेत, किंवा रिझल्ट मिळेपर्यंत. दोघं आत येऊन रूममागच्या लॅबमध्ये गेलो . “थोडा वेळ गप्पा मारू या का, आपण अहेड ऑफ स्केड्युल आहोत बरंच” तिला विचारलं. कपडे बदलत पडद्यामागनं तिनं उत्तर दिलं, “मी तेच करणार आहे. तुझी कितवी साईट आहे?” मला बरंच हायसं वाटलं “दुसरी, तुझी?” पडदा बाजूला करत ती म्हणाली, “चौथी, यू आर टू ज्युनियर टू मी. किती रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत आजपर्यंत, काय पर्सेंटेज?” तिनं सोफ्यावर अंग टाकत विचारलं. “काही घेणार, नव्वद टक्के आहेत रिझल्ट, निदान माझ्याकडून तरी.” पार्टनर आल्यावर रूममधल्या सर्व सर्विस ओपन होतात, त्यानुसार बार उघडलेला होता. “आतातरी फक्त सोडा दे. तीन क्यूब टाक त्यात.” दोघांचे ग्लास तयार करून टिपॉयवर ठेवले, तेव्हा तिचा चेहरा फुललेला होता, बंगाली कुंकू पुसल्यानं कपाळ थोडं जास्तच मोठं दिसत होतं.
'तर मि. प्रवीण, येत्या महिनाभरात आपल्याला ही दोन पझल्स सोडवायची आहेत, मला वाटतं तुम्ही माझ्या शरीरापेक्षा या कोड्यांवर जास्त लक्ष द्यावं. कसं सुरू करायचं आपण? आधी एक पूर्ण करायचं की दोन्ही पॅरलली करत जायची?” तिच्या आवाजात सिनियरनेस जाणवत होता. मी माझी नजर तिच्यावरून काढून समोरच्या टिपॉयच्या स्क्रीनवर नेली. दोन प्लॅन आणि दोन ड्रॉइंग उघडी होती स्क्रीनवर. मला एका ड्रॉईंगमधलं बरंचसं समजलं. प्लॅनमधली गावं, रस्ते ओळखीचे वाटत होते, पण दुस-याचा काही पत्ता लागेना. “मलासुद्धा काहीच समजत नाही यातलं. प्लॅन ए आहे तो पूर्ण शहरातला पाणीपुरवठा विषयुक्त करून मरणाचं थैमान घालायचा आहे, पण दुसरा काय आहे ते समजत नाहीये. तुला कळलं का काही यातलं?” मीनानं संवादाला सुरुवात केली. “ग्रेट, मला प्लॅन बी समजलाय संपूर्ण. सगळ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी गाड्या अडवून एक प्रचंड ट्रॅफिक जाम घडवून आणायचा आणि मग मेमॅवेच्या साहाय्यानं धुळधाण उडवून द्यायची. वुई कॉम्प्लिमेंट इच अदर.” उगा जवळीक दाखवायची म्हणून मी बोललो. “मेमॅवे म्हणजे काय ? समथिंग केमिकल ऑर हाऊ?” मीनानं मूलभूत प्रश्न विचारला. “मेमॅवे म्हणजे मेगा मॅग्नेटिक व्हेव - मेमॅव्हे, पण उच्चार मेमॅवे असाच केला जातो.
“चल, तू माझ्या क्षेत्रातल्या प्लॅनवर काम करायला सुरुवात कर, मी तुझ्या फील्ड्मध्ये दिवे लावतो, म्हणजे दोन्ही प्लॅनच्या सगळ्या बाबी चेक होतील आणि व्यवस्थित होतील. व्हॉट से पार्टनर?” मी माझा नेहमीचा गेम प्लॅन टाकला. असं केलं की ‘ते माझं फिल्डच नाहीय’ या सबबीखाली मला माझ्या चुका लपवता येतात. तिनं होकार दिला. माझी व्होड्का आणि तिचा सोडा संपला होता. आता तिनंच उठून विचारलं “अजून एक घेणार का?” माझा होकार आहे असं समजून ती बारकडं गेली. काचेचा दरवाजा उघडणार तेवढ्यात सिस्टिमचा बायकी आवाज आला “रूट ३ रूमचे अल्कोहोल कंझम्शन लिमिट संपले आहेत.” आणि त्यामागं एक जिवंत बायकी आवाज “ओ शिट मॅन, धिस इज अनफेअर” हातातला ग्लास तिनं फोडून टाकला. पुन्हा येऊन ती सोफ्यावर बसली. दोन्ही हात डोक्याच्या मागं धरून, मी तिच्याकडं न पाहायचा अयशस्वी प्रयत्न केला. ते जास्त वेळ जमलं नाही आणि तिच्यदेखील लगेच लक्षात आलं. डोळे बंद असूनदेखील “तुझी पहिली साईट डेडबॉडीजवरून व्हायरस उचलायची होती ना?” मला सिनियर असल्यानं तिला माझी हिस्ट्री माहीत होती, तो चान्स मला नव्हता. “हो, पहिली साईट एवढी बेकार लागली मला.” मी माझी निराशा स्पष्ट केली. “मग त्या वेळी स्त्रियांच्या प्रेतांकडं पाहताना, त्यांच्यावरून व्हायरस उचलताना ज्या भावनेनं वागला असशील ना, त्याच भावनेनं वाग आताही माझ्याबरोबर. पुरुषाबरोबर राहायची वेळ आली तर माझी रिअॅाक्शन प्रेतापेक्षा जास्त वेगळी नसते हे लक्षात घे, उगा नंतर अपेक्षाभंग नको.” तिचं स्पष्ट बोलणं मला लागलं. “म्हणजे तू इथून बाहेर गेल्यावर माझ्यामागं भूत होऊन लागणार नाहीस ना, माझ्या इच्छा पूर्ण कर म्हणून? त्यापेक्षा आताच काय ते मागून घे. प्रेतंदेखील काही कमी डिमांडिंग नसतात.” माझ्या विनोदाच्या ढ क्वालिटीवर तिला हसूदेखील आलं नाही, ती उठून रूममधल्या तिच्या बेडवर गेली, बाजूचा लेसर ट्रॅप चालू केला अन झोपली, अगदी प्रेतासारखी.
आज दोनशे दिवस झालेत, केमिकल इंजिनियरिंग आमच्या इंजिनियरिंगपेक्षा फार कमी अवघड नसतं याची पूर्ण कल्पना मला आली आहे. त्यत मीनाबरोबर झालेल्या करारानुसार, वर्किंग टाईममधला फक्त एकच तास एकमेकांच्या शंका निरसनासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं फार अवघड होतं, प्रत्येक वेळी माहिती सिस्ट्मिमधून घ्यावी लागते. मिळत नाही, समजत नाही असं नाही, पण तिच्याकडून ऐकायला बरं वाटतं, आणि मी सिस्टिमवरुन माहिती करून घेऊन तिला पुन्हा मुद्दाम विचारतो आहे, हे तिच्या लक्षात येतं. तिच्या शिक्षणाची नक्की कल्पना नाही, पण फार नसावं. जेवढं मला अडतं त्यापेक्षा तिला जास्त अडतं, आणि स्पेशली मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये ती जाम फसते. तो टेस्ला तिला प्रत्येक वेळी घुमव घुमव घुमवतो आणि जोरात आदळतो खाली, आणि तो तर आपला खास दोस्त! याचा बराच फायदा घेतो मी, तिच्या शंका अर्धवटच क्लिअर करतो. मग पुढच्या शंकानिरसनच्या तासात ती पुन्हा तेच घेऊन बसते, सिनियर असली तरी लाजत नाही, कळत नाही हे सांगायला. माझं तसं नाहीये, बहुधा पुरुषी अहंकार मध्ये येतो अजूनदेखील. तिच्या प्रत्येक उत्तरात काहीतरी खुसपट काढतो, तिचं बोलणं मध्येच तोडतो, तिला आवडत नाही ते खरं तर. पण पुरुष असल्याचा कंड कुठंतरी शमला पाहिजे ना.
“प्रवीण, हे बघ म्हणजे हा मेमॅवेचा संपूर्ण प्लॅन झाला नाही अजून, पण एका शहराच्या गेल्या एकोणीस महिन्यातल्या ट्रॅफिकचा स्टडी करून मी एक ट्रॅफिक होल्ड प्लॅन बनवलाय. पहिल्या होल्डपासून शेवटचा होल्ड येईपर्यंत बारा मिनिटं जातील, आणि त्यानंतर मेमॅवेला तू म्हणतो तसं अर्धा तास लागेल होत्याचं नव्हतं करायला, किमान ७०% सक्सेस रेशो दिसतो आहे. आपल्याला काय पाहिजे, रेशो मिनिमम ९५% ना, मग अजून बरंच काम करावं लागेल.” एक दिवस मीनानं एक वॉक थ्रू दाखवला रूममधल्या स्क्रीनवर. समोर टिपॉयच्या स्क्रीनवर माझं काम चालू होतं. मला वर पहायला दोन मिनिटं गेली. तिनं पुन्हा पहिल्यापासून दाखवलं, “गुड ना ,ब-यापैकी जमलंय ना रे, आणि हेच अल्गोरिथम वापरून कोणत्याही शहराला यात फिट बसवता येईल असं करायचं आहे मला ते. आता उरलेलं २५% तू जमव.” तिला प्लॅन पुन्हा एकदा रनथ्रू करायला लावला, त्या वेळी मी टिपॉयवर लिहित होतो वर बघता बघता. रन थ्रू संपल्यावर तिच्या ते लक्षात आलं. शेजारी येऊन बसत ती म्हणाली, “काय काय लिहिलं आहेस माझ्या विद्यार्थ्यानं, बघू?” मी तिची व्हायवा घ्यायला सुरुवात केली. एक तासभर आम्ही बोलत होतो. तिनं टिपॉयच्या तिच्या बाजूला ब-याच नोट्स काढ्ल्या. आमचं बोलणं संपलं, तशा त्या बोटातल्या रिंगवर पिकप केल्या अन तिच्या बेडवर जाऊन बसली, लेसर ट्रॅप चालू केला.
आज सहाशे पन्नास दिवस संपले प्रोजेक्टचे. मीना आणि मी, बाकीच्या दोन्ही टीमपेक्षा खूप पुढं आहोत, म्हणजे सातशे दहा दिवसांचे टारगेट आम्ही साठ दिवस आधीच पूर्ण केलंय. सध्या आम्ही प्लॅन २ आणि प्लॅन ३ बनवतोय, पहिले प्लँन फेल झाले तरची तयारी, अर्थात आम्हाला ते डिटेल वर्कआउट करायचे नाहीत, पुढच्या सिनियर टीम आमच्या स्क्रॅचवर काम करून फायनल करतील आणि आताही सिस्टिम त्यावर पॅरलली काम करत आहेच. आमचे ओरिजनल प्लॅन सध्या रूट १९ला चेक होत आहेत, त्यापुढं अजुन एक रूट, तो क्लिअर केला मी प्रमोशन, मी मास डिस्ट्रक्शनवरून पर्सनल हंटिंगला जाईन आणि मीना इनर किलिंगला. तिच्या पहिल्या दोन साईट पर्सनल हंटिंगच्या होत्या, त्यामुळं तिला ती एक स्टेप टाळता येईल, असं वाटतंय. उद्या पहाटे पाचपासून रूट १९बरोबर मिटिंगला बसायचं आहे. डार्क मिटिंग, या प्रकाराचा मला अनुभव नाही, म्हणजे रूममध्ये फक्त स्क्रीनच दिसतो, पलीकडं कोण आहे तुम्ही पाहू शकत नाही आणि तेसुद्धा तुम्हाला पाहू शकत नाहीत. फार भयाण प्रकार आहे हा. मीनाला विचारलं तर ती काही स्पष्ट बोलली नाही याबद्दल. आज संध्याकाळी ती आमची गाडी घेऊन बाहेर गेली आहे कुठंतरी. बहुधा लांब गेली असेल, कारण आज गाडी हवी म्हणून तिनं गेला आठवडाभराचा कोटा सेव्ह केला होता तिचा आणि मलासुद्धा एक दिवस रूममध्येच बसवून ठेवलं होतं.
पहाटे पाच ते दुपारी एक, रूट १९ची मेगामॅरेथॉन मिटिंग संपली, आमची दोन्ही प्रोजेक्ट रूट १९नं अॅाडमिन क्लिअर केली, आता ती फायनान्स क्लिअरसाठी रूट २०ला जातील, तिथं साधारण ५० दिवस लागतात, आणि त्यानंतर हातात येईल डायरेक्ट डी डेट आणि प्रमोशन लेटर. डी डेटच्या आदल्या दिवशी आम्हाला इथून सोडलं जाईल. पुढचे ५० दिवस फार निवांत नाही जाणार, पण फार टेन्शन नसेल आम्हाला. आता निम्मा दिवस गाडी वापरायची परवानगी आहे, प्रोजेक्टच्या रूट १६पर्यंत आम्ही बिनघोर फिरू शकतो. रूममधला बार चोवीस तास खुला होणार उद्यापासून. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाल्मलीबरोबर दररोज ३०० सेकंद बोलू शकतो. हो, म्हणजे पाच मिनिटंच, पण ३०० म्हटलं की खूप जास्त वाटतं. जवळस दोन वर्षानी, धाकट्या बहिणीबरोबर बोलताना काय बोलू आणि काय नको, असं होणार आहे मला. अर्थात, आमचं बोलणं ट्रॅक होणार, रेकॉर्ड होणार आणि सेन्सॉरदेखील, तरीही खूप खूप छान वाटतंय मला. एका वेळी २० लाख लोकांना कसं मारता येईल, याचाच गेल्या सहाशे पन्नास दिवसात विचार करत होतो. मीना तिचे ३०० सेकंद कुणाबरोबर बोलेल, काय माहीत? असेल तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड वगैरे, नाहीतर मुलगा आणि नवरासुद्धा असेल. अजून साठच दिवस... मलादेखील तिची हिस्ट्री चेक करायची ऑथोरिटी मिळेल आणि मग कळेल मला सगळं.
उद्या सातशे दिवस पूर्ण होणार. आज आम्ही दोघं बाहेर गेलो होतो रूट १३ला. तिथं, आमच्या प्रोजेक्टवर एक ग्रुप चर्चा करत होता. आम्हीसुद्धा जाऊन उभे राहिलो झालं, काही कमी पडलंय का पाहायला. अर्थात इथं कुणीच कुणाला ओळखत नाही, त्यामुळं ते लोक बिनधास्त बोलत होते. काही पॉइंटस मिळाले आहेत.
रात्री बसून पुन्हा अपडेट करून घेऊ ते. गेले पन्नास दिवस मीना दररोज पाच मिनिटं पुढचा वेळ देते, पहिला दिवस ००:००ला बोललो, दुस-या दिवशी ००:०५ला, असं करून तिचा प्रत्येक वेळचा मूड समजला मला. एकदम मस्त आयडिया दिली तिनं. सगळ्या घराला नवीन रंग दिला आहे तिनं, टाइल्स बदलल्या आहेत, अजून बरंच काही. माझ्यासाठी दोन-तीन मुली पाहून ठेवल्यात. आईबाबांची कसर भरून काढते आहे. हे सगळं मी मीनालासुद्धा सांगितलं. ती कुणाशी बोलते ते कळलंच नाही. दररोज दुपारी एक वाजता मला रूमच्या बाहेर जायला सांगते. काही कळलंच नाही त्यामु़ळं. उद्या दिवसभरात कधीही रूममधले स्पीकर सुरू होतील आणि आम्हाला गुड न्यूज मिळेल. आणि मग अर्धा दिवस फोन, पूर्ण दिवस गाडी आणि रूट १८पर्यंत प्रवासपरवानगी. मीनाही कुठं गेलीच नाही आज दिवसभर. नुसती बेडवर पडून आहे. सकाळीच तिनं चार पेग व्होड्का घेतली आहे, त्याबरोबर तीन बाटल्या सोडा. एवढं डायल्यूट करून कसं काय घशाखाली जातं, कोण जाणे. असते एखाद्याची आवड. कोण सांगणार काय ते?
डोक्याचा भुगा झालाय, डी डे अजून एक महिन्यानं आहे, मेमॅवेचा प्लॅन फायनल झाला आहे, मला आणि मीनाला प्रमोशन मिळालं आहे. अजून पगारही वाढला आहे, पण फोन बंद झालेत. आता प्लॅन यशस्वी किंवा अयशस्वी होईपर्यंत आम्हाला बाहेर कुणाशी संपर्क साधता येणार नाही. पण प्रत्येक सिनेमाला असतो जसा क्लायमॅक्स असतो इथं पण आहे; आमचा प्लॅन ज्या शहरात ट्राय करणार आहेत, तिथं मीनाच्या आईबाबांचं घर आहे. जसाजसा आमच्या प्लॅनवर शहराचा प्लॅन लॅप होत गेला, तसं तसं तिला रडू आवरेनासं झालं. आम्ही नेहमीप्रमाणे अंधारात होतो डार्क मिटिंगच्या, पण रूममधली आर्द्रता लिमिटच्या बाहेर गेल्याचं आणि अनावश्यक आवाज येत असल्याचं सिस्टिमनं रूट २०ला कळवलं तसं, एक क्षण आमची रूम प्रकाशानं झगझगून गेली. मीनानं प्रयत्न करूनदेखील तिला डोळ्यातलं पाणी पुसता आलं नाही. मिटिंग संपल्यावर ती लगेच निघून गेली गाडी घेऊन. कधी परत येईल... माहीत नाही. मला आता तिची दया येते आहे. इथं पूर्वी झालं आहे तसं ती बहुधा रूट २०ला जायचा प्रयत्न करेल आणि मरून जाईल. इथं आत्महत्या करायचा तो एकमेव मार्ग आहे, बाकी कोणत्याही मार्गानं तुम्ही स्वताला संपवू शकत नाही. मी पण तसंच केलं असतं का आमच्या शहराचा प्लॅन लॅप केला असता तर? २० लाख लोकांना एकत्र मारायचा आमचा प्लॅन निवडला गेला म्हणून कालपर्यंत मीना आनंदात होती, आणि आज तिला दु:ख आहे ते त्या मरणा-या वीस लाखांचं नाही, तर त्यातल्या दोघांचं. का, तर ती तिची आपली आहेत म्हणून.
त्या बिनओळखी एकोणीस लाख नव्याण्ण्व हजार नऊशे अठ्याण्णव लोकांच्या मरणानं आम्हाला काही फरक पडत नव्हता, पण या दोघांच्या जाण्यानं पडत होता. त्या वीस लाखांचं मरणं आमच्या देशासाठी फार गरजेचं आहे. दर सहा महिन्यांत असे रँडम निवड करूरुन वीस लाख लोक मारले जातात, त्याशिवाय बाकीच्यांना जगणंच शक्य नाही, असा एक निष्कर्ष काढलेला आहे सिस्टिमनं. मरणाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यांना वाचवणं शक्य आहे, पण त्यासाठी त्यांची गरज आम्हाला सिस्टिमला सिद्ध करून दाखवता आली पाहिजे. अजून तीस दिवस उरले आहेत. काहीतरी करणं भाग आहे, काय ते कळत नाहीये. मीनानं आत्महत्या केली नाही, ती रात्री परत आली. कुठं गेली होती ते विचारलं, काही बोलली नाही. मी माझ्या बेडकडं जात होतो तेव्हा माझ्या मागं आली, मला घट्ट पकडलं मागून आणि सोफ्यावर आणून ढकललं. मला काहीच समजेना. आज तिनं पुन्हा ते बंगाली कुंकू लावलं होतं. दोन वर्षात तिची पोनी जाऊन केस चांगले खांद्याच्या खालपर्यंत आले आहेत, कधी लक्षात आलं नव्हतं, पण आज आलं. पण माझ्याकडं पाहताना भेसूर वाटली नाही. उलट कुणावर तरी उपकार करत असल्याची भावना डोळ्यात दिसत होती.
“तुला ड्राय बनवू का कॉकटेल?” तिनं विचारलं. “आज एंजॉय करायचं आहे आपल्या जवळच्या कुणाचं तरी मरण. आज मी प्रेतासारखं नाही, तर मित्रासारखं वागणार आहे तुझ्याबरोबर.” व्होड्काचे दोन ग्लास हातात घेऊन येत ती बोलत होती. “तुला काय वाटलं असतं रे, तुझ्या बहिणीच्या घराखाली मेमॅवेचा जनरेटर लावला असता तर, त्या एका न दिसणा-या वलयानं तुझ्या घराची वीट न वीट हादरवून तोडली असती, एखाद्या बीमच्या खाली तुझी बहीण चिरडली असती, तुझी आवडती पल्सार, किती तुकडे होऊन पडली असती का तिला आग लागेल रे लगेच. ....” बराच वेळ ती बडबडत होती. काही काही कल्पना तर एवढ्या भयंकर होत्या की मला खरंच भीती वाटायला लागली. शाल्मलीबद्दल हे ऐकवेना. जेव्हा ती थांबली, तेव्हा तिला सांगितलं, “असं काही होणार नाही माझ्या घराला. माझा अंदाज खरा ठरला मेमॅवेचा, गेल्या महिन्यात मी दररोज पाच मिनिटं शाल्मलीला समजावलं आहे त्याबद्दल आमच्या कोडमध्ये. आता माझं घर मेमॅवेप्रुफ झालं आहे. तुझी घाणेरडी स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत. शाल्मलीला पाणी पिणं बंद कर हे सांगणं मला शक्य नव्हतं. म्हणून मग मीच पहिल्यापासून पाण्यात विष घालायच्या प्लॅनमध्ये फॉल्ट ठेवत गेलो. आणि शेवटी मला हवं ते मिळवलं. तुला माझ्या क्षेत्रात एवढं तज्ज्ञ व्हायचं होतं की तू प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत गेलीस आणि मग माझ्या ट्रॅपमध्ये अडकत गेलीस. आता यामधून मी तुला सोडवू शकतो, पण एका अटीवर.”
“माझं शरीर हवंय तुला, पण मिळणार नाही अजिबात. अगदी माझ्या आईबाबांच्या बदल्यातदेखील नाही.” तिच्या बोलण्यात निर्धार होता, “आणि तू असं काहीतरी करशील, याची मला कल्पना होतीच. अरे, तुझी सिनियर आहे मी. या खेळाचे, सिस्टिमचे नियम तुझ्यापेक्षा जास्त माहीत आहेत मला. आपले फोन बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी मी शाल्मलीला निरोप दिला आहे, आपण लग्न करणार आहोत आणि तयारीसाठी तिला माझ्या घरी जायला सांगितलं आहे. पाच-सहा दिवसांनी ती तिकडे जाणार आहे.” मंदशी हसत ती खाली बसली. “आणि मी तर तुला यातून सोडवूही शकत नाही. सॉरी ज्युनियर.” माझं डोकं अजिबातच कामातून गेलं. तिला जीवे मारावं असा विचार करून मी उठलो, पण ती माझ्यापेक्षा चपळ निघाली, मी तिला पकडेपर्यंत ती तिच्या बेडवर पोहोचली अन लेसर ट्रॅप सुरू केला. हताश होऊन मी तिथंच खाली बसलो. सगळं हरलो होतो मी. “आणि आता ऐका आजच्या परिस्थितीला अनुरूप गाणं. याची निवड कळवलीय श्री. प्रवीण यांनी.” रेडिओवरच्या निवेदिकेसारखा आवाज तिनं काढला आणि मग गाणं म्हणायला लागली, “तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा| तुज कंठी मज अंगठी, आणखी गोफ कोणाला| हेऽऽ हेऽऽ तुझ्या गळा माझा गळा ' .........
