
साहित्य: एक अष्टमांश टीस्पून काळी मिरीपूड, एक अष्टमांश टीस्पून ओवा, १ टीस्पून काश्मिरी मिरचीचे तिखट, १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट, २ टेबलस्पून तेल, ८ टेबलस्पून हरभरा डाळीचे पीठ (बेसन), ५ टेबलस्पून पाणी, मीठ चवीनुसार, १ चिमूट इनो (सोडा), तळणीसाठी तेल, सोर्या व जाड शेवेची ताटली, झारा.
कृती: मिक्सरच्या लहान भांड्यात मिरीपूड, ओवा, तिखट, टोमॅटो पेस्ट, तेल, मीठ असे घालून अर्धा मिनिट फिरवावे. त्यात ५ टेस्पून पाणी घालून पुन्हा दोन मिनिटे फिरवावे. मिश्रण पांढरे होऊ लागेल. एका पातेलीत काढून घ्यावे. आता चिमूट सोडा त्या मिश्रणात कालवून बेसन घालण्यास सुरुवात करावी. हाताने अथवा चमच्याने बेसन कालवत राहावे. सैलसर पीठ तयार होईल. आपल्याला ते तसेच असायला हवे आहे. तळणी तापत घालावी. तेल चांगले तापल्यावर आंच मध्यम करून ठेवावी. जाड शेवेची ताटली सोर्यात लावावी. आतून तेलाचा हात फिरवावा. आता चमच्याने सोर्यात पीठ घालावे. सोर्याला बंद करून तेलात गोल फिरवून शेवेचे फूल तयार करावे. एका बाजूने तळले गेल्यावर उलटून दुसरी बाजू तळून घ्यावी. तेलातून शेव बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावी. आता हाताने ते फूल मोडून हव्या त्या लांबीचे तुकडे करावेत. तिखट, आंबट चवीची चटकदार, कुरकुरीत शेव तयार.
सूचना:
१) तिखटाचे प्रमाण बेताने घेतले आहे. हवे असल्यास जास्त घालावे.
२) सोर्या तेलात न बुडवता वरून पीठ तेलात सोडायचे आहे.
३) वरील पाककृतीत मी रंग घातलेला नाही. हवा असल्यास खाण्याचा लाल रंग किंचित घालावा.
४) ही शेव जाड असल्यास चांगली लागते.
